सर्वंकष प्रयत्नांंतूनच गंगा वाचेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 05:35 AM2019-02-07T05:35:56+5:302019-02-07T05:36:32+5:30

राज्यकर्ते आता गंगेवरही आपले वर्चस्व सिद्ध करू पाहत आहेत. परिणामी गंगा एका धर्माची धार्मिक नदी मानली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या कारणांमुळे उर्वरित धर्माचे लोक गंगेपासून दुरावले जात आहेत.

Ganga will be saved with everyone efforts | सर्वंकष प्रयत्नांंतूनच गंगा वाचेल

सर्वंकष प्रयत्नांंतूनच गंगा वाचेल

Next

- डॉ. राजेंद्र सिंह, जलपुरुष

राज्यकर्ते आता गंगेवरही आपले वर्चस्व सिद्ध करू पाहत आहेत. परिणामी गंगा एका धर्माची धार्मिक नदी मानली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या कारणांमुळे उर्वरित धर्माचे लोक गंगेपासून दुरावले जात आहेत. मुळात गंगा सर्वांचीच आहे. मात्र, सरकारी प्रचारात केवळ स्नान करणे पुण्य मानले जात आहे. प्रचार-प्रसार करत काही धर्मांना गंगेपासून तोडण्याचे धोरण आखले जात आहे. गंगेचा संपर्क जंगलाशी तुटला आहे आणि घाणेरडे नाले आणि उद्योगांच्या मनमानी कारभारामुळे गंगेतले अतिक्रमण आणि प्रदूषण वाढत आहे.

गंगेच्या स्वच्छतेसाठी आंदोलन छेडू पाहत असलेल्या सत्याग्रहींना राष्ट्रविरोधी म्हणून संबोधले जात आहे. गंगेलगत वस्ती आणि उद्योग स्थापन करण्यासाठी सरकार सवलत देत आहे. परिणामी गंगेचे पात्र कमी होत आहे. पूरक्षेत्र कमी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे जेव्हा गंगेचे राष्ट्रीयकरण झाले तेव्हा या सर्व क्षेत्रांना वनजमिनीचा दर्जा देत संरक्षित करण्यात आले होते.

गंगेचे आईप्रमाणे संरक्षण होणे गरजेचे होते. मात्र, गंगा उत्त्पन्नाचे साधन झाले आहे. हे उत्त्पन्नाचे साधन गंगेच्या मुलामुलींसाठी नाही तर उद्योजकांच्या उद्योगासाठी आहे. हे सरकार गंगेशी अप्रमाणिक आहे. गंगेवरील प्रेमाचा केवळ देखावा केला जात आहे. याच देखाव्यामुळे गंगेची प्रकृती बिघडली आहे. आता प्रकृती बिघडण्याचा वेग आणखी वाढला आहे. हे थांबवायचे असेल तर सांघिक रूपाने उपाययोजना करण्याची गरज आहे. मूळ रोग शोधून उपचार करण्याची गरज आहे.

आजघडीला गंगेची प्रकृती सुधारण्यासाठी कित्येक चिकित्सक तयार केले जात आहेत. मात्र, त्यांना रोगाचे मूळ समजत नसल्याचे चित्र आहे. आपल्या परीने रोगाचा इलाज करण्याचे काम सुरू असून, सरकारकडून मनमानी पद्धतीने याचा खर्च वसूल केला जात आहे.
अशा प्रकारच्या उपाययोजनांमुळे गंगेची प्रकृती आणखी ढासळत आहे. गंगेची प्रकृती आणखीच ढासळत असून, सरकारी खजिनाही रिकामा होत आहे. गंगा शुद्ध करण्याच्या नावाखाली आपण तिची प्रकृती आणखी ढासळवत आहोत. यासाठी अघोरी उपाय थांबवले पाहिजेत आणि नव्याने पुन्हा उपाययोजना आखल्या पाहिजेत. ‘नमामी गंगा’ नावाखाली सुरू असलेला भ्रष्टाचार आणखी थांबवला पाहिजे आणि संसदेत ठोस कायदा बनविला पाहिजेत. हा मुद्दा २९ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या आणि १२ जानेवारी २०१९ पर्यंत चाललेल्या सभा, संमेलनातून मांडत मंजूर करण्यात आला आहे. २०११ साली गंगेच्या भक्तांनी कायद्याच्या मसुद्या संदर्भातील प्रती भारत सरकारला दिल्या होत्या. तेव्हापासून आजपर्यंत असे अनेक मसुदे तयार करण्यात आले. मात्र, सरकारची योजना मात्र ‘गंगा नमामी’सारख्या योजना आखत उत्त्पन्न कमविण्याचे साधन आहे.

आईचा मान गंगेला मिळावा, अशी गंगेची इच्छा आहे. तिला उत्त्पन्नही नको आणि उपचारही नकोत. गंगेत खोदकाम करू नका. बांध बांधू नका. घाणेरड्या नाल्यांचे पाणी गंगेत सोडू नका. गंगेचे पाणी प्रदूषित करत पुन्हा गंगाजलाची चिकित्सा करणे म्हणजे गंगेचा अपमान आहे. उद्योग आणि शहरांमधील प्रदूषित पाणी गंगेत मिसळू नका. असे केले तर गंगा नक्कीच स्वच्छ होईल. गंगेला नैसर्गिक ठेवा. तिचा सन्मान करा. तिचे संरक्षण करा; हाच योग्य उपाय आहे. गंगेच्या किनारी शेती होती. संस्कृती होती; तेव्हा गंगेची प्रकृती ठीक होती. आता शेतीचा उद्योग झाला आहे. शेतीमधील रसायने गंगेच्या पाण्याला प्रदूषित करत आहेत.

गंगेच्या सत्याग्रहींची हत्या होत आहे. त्यांचे अपहरण होत आहे. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. गंगेत नाल्याचे पाणी आणि औद्योगिक रसायने मिसळली जात आहेत. पर्यावरण रक्षणावरच घाला घातला जात आहे. विकासाच्या नावाखाली गंगेचे शोषण केले जात आहे. नावाड्यांचे रोजगार हरवले आहेत. हे लोक डुबत्याला आधार देत होते. पहिल्यांदा सरकार यांना संरक्षण देत होते. आता सरकार नावाड्यांना प्राधान्य देत नाही. मोठ्या कंपन्या सरकारचे संरक्षण घेत आहेत. सरकारी यंत्रांचा उपयोग उद्योगांच्या हितासाठी केला जात
आहे.

पुलांच्या चुकीच्या संरचनेमुळे गंगेचा प्रवाह बदलत आहेत. परिणामी लगतच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. गावांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाकडे पाहिलेही जात नाही. सरकारी कारखाने आपली राख गरम पाण्यात मिसळून नदीत टाकत आहे. परिणामी गंगेतील जैवविविधता नष्ट होत आहे.

सातत्याने होत असलेला विकास नदीवर घाला घालत आहे. गंगेकिनारी होत असलेल्या बांधकामांमुळे पाण्याची पातळी वाढत आहे. परिणामी लगतचा परिसर पाण्याखाली जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कारखान्यांचे रसायनमिश्रित सांडपाणी गंगेत सोडले जात असल्याने जैवविविधता नष्ट होत आहे. मात्र, याकडे कोणीच लक्ष देत नसून, गंगेला वाचवायचे असल्यास ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

एकंदर वरवरचे उपाय करून चालणार नाही तर जलतज्ज्ञांचे म्हणणे लक्षात घ्यावे लागेल. नुसते लक्षात नाही तर समजावून घ्यावे लागेल आणि त्यानुसार उपाय करावे लागतील तरच गंगा साफ होईल.

Web Title: Ganga will be saved with everyone efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी