गंगा, यमुना अन् माणुसकी
By admin | Published: March 23, 2017 11:14 PM2017-03-23T23:14:38+5:302017-03-23T23:14:38+5:30
गंगा आणि यमुना या दोन केवळ नद्या नाहीत, तो संस्कृतीचा प्रवाह असल्याने भारतीयांसाठी त्या पूजनीय आहेत. तीर्थ म्हणून त्यांचे स्थान आहे.
गंगा आणि यमुना या दोन केवळ नद्या नाहीत, तो संस्कृतीचा प्रवाह असल्याने भारतीयांसाठी त्या पूजनीय आहेत. तीर्थ म्हणून त्यांचे स्थान आहे. एकदा तरी गंगास्नान करावे, गंगातीरी वास्तव्य असावे अशी मनोकामना करणारे कोट्यवधी लोक या देशात आहेत. या दोन्ही नद्या सांस्कृतिक अस्मिता असल्या, तरी त्या प्रदूषित करण्याचा अक्षम्य गुन्हा आम्ही पिढ्यान्पिढ्या करीत आहोत. एकीकडे त्यांना पूजनीय मानायचे आणि त्याचवेळी गंगेची गटार करायची, ही दोन्ही कामे मानभावीपणे निष्ठेने आपण करीत असतो. नद्यांची ही हेळसांड फक्त या दोन नद्यांपुरती नाही, तर देशातील सर्व नद्या, ओढे, ओहोळ मानवाने प्रदूषित केले. त्यामुळे एकाही नदीचे पाणी शुद्ध नाही. गंगेच्या शुद्धीकरणाची मोहीम राजीव गांधी यांच्या काळात सुरू झाली आणि आतासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यासाठी ‘नमामि गंगे’ हा विशेष कार्यक्रम हाती घेतला. एवढे प्रयत्न होऊनही गंगा आणि यमुनेमधील प्रदूषण काही कमी झालेले नाही. सर्व सरकारी प्रयत्नांकडे जनतेने दुर्लक्ष केल्यामुळे सरकारी यंत्रणेने हात टेकले. अखेर उत्तराखंड उच्च न्यायालयाने पुढाकार घेऊन अखेरचा प्रयत्न म्हणून या दोन्ही नद्यांना जिवंत व्यक्तीचा दर्जा दिला. ही देशातील पहिलीच घटना आहे. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीस इजा पोहोचविणाऱ्यास, त्याला अपमानित केल्यास, त्याच्या जीवितास धोका निर्माण केल्यास कायद्यानुसार ज्या कलमाखाली गुन्हा नोंदविला जातो तसाच गुन्हा या दोन नद्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्यांविरुद्ध दाखल केला जाईल. गेल्याच आठवड्यात न्यूझीलंडमध्ये व्हांगानुई या नदीला असाच दर्जा देण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वी मोहम्मद सलीम नावाच्या इसमाने यासंबंधी याचिका दाखल केली होती, त्यावर उच्च न्यायालयाने हा निकाल दिला. लाखो भारतीयांच्या मनात या नद्यांविषयी पवित्र भावना असल्यामुळे त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्यांना जिवंत व्यक्तीचा दर्जा देणे आवश्यक असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ‘नमामी गंगा’ प्रकल्पाचे संचालक, उत्तराखंडचे मुख्य सचिव आणि अॅडव्होकेट जनरल अशा तीन अधिकाऱ्यांकडे गंगा आणि यमुनेचे पालकत्व सोपविण्यात आले. त्यांना या पाल्यांची सर्वच काळजी घ्यायची आहे. नद्या स्वच्छ राखण्याची जबाबदारी आपली आहे हे सामान्य माणूस स्वीकारणार नाही तोपर्यंत कायदे अपुरे पडतील. गंगा आणि यमुना आता केवळ नद्या नसून व्यक्ती म्हणून त्यांना कायदेशीर अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यांना माणसाप्रमाणे वागण्याची माणुसकी आपण दाखवणार का? नाही तर गडूमध्ये आणलेले गंगाजल देव्हाऱ्यात ठेवून पूजणारे आपण तीच गंगा प्रदूषित करतो या ढोंगी अध्यात्माचा त्याग करणार का, हे प्रश्न कायम आहेत. कारण गंगा आणि यमुना आता आपल्यासारख्याच आहेत.