भाजपाची 'मेगा भरती' : गळतीदारांची एकजूट व्हावी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 04:05 AM2019-08-02T04:05:56+5:302019-08-02T04:08:42+5:30
कर्नाटकात एवढे बदल झाले, पण त्याचा परिणाम वरवरचा दिसला आहे. तामिळनाडूत द्रमुक व अण्णाद्रमुक अजून आपली माणसे राखून आहेत.
राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे नाहीत. पिचड, सचिन अहिर, मनोहर नाईक गेले. चित्रा वाघ गेल्या. साताऱ्याचे शिवेंद्रराजे गेले. त्याआधी मोहिते पाटील पिता-पुत्र गेले आणि त्यांच्याही सोबत अनेकांनी राष्ट्रवादीची साथ सोडली. गणेश नाईक जाण्याच्या मार्गावर आहेत. तो पक्ष आता जवळजवळ पवार कुटुंबाएवढा आणि त्यांच्या अस्मितांएवढाच राहिला आहे. मात्र याही स्थितीत पवारांचे इरादे बुलंद आहेत. काँग्रेस पक्षासोबत विधानसभेच्या २४० जागांबाबतचा आपला समझोता झाला असून, उर्वरित जागा समविचारी पक्षांना देण्याची भाषा त्यांनी केली आहे. पक्षाचे मोठे बुरुज ढासळल्यानंतर व त्यांच्या बाजूने नवी कुमक येण्याची चिन्हे दिसत नसतानाही ते असे बोलत असतील तर त्यांचा आत्मविश्वास मजबूत आहे, एवढेच आपल्याला म्हणता येईल. दक्षिणेत तेलगू देसमचा पराभव झाला, पण तो पक्ष शाबूत आहे. केरळात डावे जिंकले, पण तेथील काँग्रेस ठाम आहे.
कर्नाटकात एवढे बदल झाले, पण त्याचा परिणाम वरवरचा दिसला आहे. तामिळनाडूत द्रमुक व अण्णाद्रमुक अजून आपली माणसे राखून आहेत. बंगालात भाजपने मुसंडी मारली, पण ममता ठाम आहेत आणि त्यांचा पक्षही तसाच आहे. काँग्रेसला धक्का बसला. त्याचे काही चौके-छक्के उडाले, पण त्याचीही फार पडझड झाली नाही. भाजपच्या विजयाचे कारण त्याने आपला धर्माशी जोडलेला संबंध हे आहे. बाकीचे पक्ष स्वत:ला सेक्युलर म्हणवितात, पण त्याविषयीच्या त्यांच्या निष्ठा अजून मजबूत नाहीत. सेक्युलॅरिझम हा धर्मविरोधी विचार नाही. तो धर्मात शिरलेल्या अनिष्ट बाबींविरुद्ध जाणारा विचार आहे. धर्मातील ज्या बाबी नीती, न्याय व माणुसकीसारख्या मूल्यांचा आदर राखणाºया आहेत त्या सेक्युलर विचारांनाही मान्य आहेत. पण विचार वा धर्म याहून हितसंबंध वा स्वार्थ झाले की लोक स्वार्थाच्या दिशेने जातात. सत्ता स्वार्थ साधणारी वा जपणारी असते. तिचे आकर्षणही मोठे असते. त्यापुढे विचारांची मातब्बरी ज्यांना टिकविता येते त्यांना निष्ठावान व विवेकी म्हणावे लागते. ज्यांना तसे होता येत नाही, त्यांना दिशाहीनता हीच वाट असल्याचे वाटू लागते. ते मग फारसा विचार न करता सत्तेच्या मागे जातात. भाजप हा संघनिर्मित पक्ष आहे. त्यात संघाची मातब्बरी मोठी आहे. पक्षात संघातून आलेले व बाहेरून आलेले अशी वर्गवारी आहे. बाहेरून येणाऱ्यांचा मान थोडे दिवस टिकतो. ‘मग आम्हाला कुणीही विचारत नाही’ हे एका भाजपमध्ये गेलेल्या काँग्रेसच्या आमदाराचे म्हणणे आहे. जी माणसे पराभवातही खंबीर राहतात त्यांना जनताही मान देते. पण या मानापेक्षा सत्तेचे अल्पकाळ मिळणारे हारतुरे ज्यांना मोठे वाटतात त्यांची बात वेगळी आहे. एक गोष्ट मात्र खरी, धर्माचे नाव घेऊन का होईना, भाजपने आपली ताकद वाढविली आहे. त्या पक्षाला तोंड द्यायचे तर आपल्या मूल्यांना धरूनच पुढे जाण्याची गरज आहे.
जनतेला विकास हवा, स्थैर्य हवे, नोकºया हव्या, जीवनावश्यक वस्तू मिळायला हव्या आणि त्याच वेळी तिला सन्मानाची वागणूक हवी. आजच्या गळतीदार पक्षांनी तेवढे केले तरी त्यांचा मान वाढणार आहे. काँग्रेस पक्षाने परवा महाराष्ट्रातील पदाधिकाºयांची नावे जाहीर केली. त्या पदाधिकाºयांनी आपापली मोठी छायाचित्रे गावोगाव लावली. पण प्रत्यक्ष जनसंपर्काकडे अजून त्यांचे लक्ष जायचे राहिले आहे. आत्मसंतुष्ट व अहंकारी नेते लोकांना आवडत नाहीत. या पुढाºयांचा जनसंपर्कही फारसा नाही. ही अनोळखी माणसे जनतेत कशी जातील आणि तिला आपल्या बाजूने कशी वळवतील. काँग्रेसला अध्यक्ष सापडत नाही आणि या पदाधिकाºयांना लोक गवसत नाहीत. या स्थितीत हा पक्ष त्यांच्या तेवढ्याच तुटक्या व गळतीदार पक्षांसोबत विधानसभेच्या निवडणुकांना कसा सामोरा जाईल? दरवेळी राजस्थान, मध्य प्रदेश वा छत्तीसगड घडत नाही. त्यावेळी पक्षाध्यक्ष पदावर असलेले राहुल गांधी आता त्या पदावर नाहीत. त्यामुळे येथील निवडणूक कार्यकर्त्यांना स्वबळावरच लढवावी लागेल. त्यासाठी त्यांना स्वार्थ व हितसंबंध बाजूला सारून पक्षासाठी एकत्र यावे लागेल. लोकशाही टिकवायची तर हा त्याग आवश्यक असाच आहे.
सेक्युलॅरिझम हा धर्मविरोधी विचार नाही. तो धर्मात शिरलेल्या अनिष्ट बाबींविरुद्ध जाणारा विचार आहे. धर्मातील ज्या बाबी नीती, न्याय व माणुसकीसारख्या मूल्यांचा आदर राखणाºया आहेत त्या सेक्युलर विचारांनाही मान्य आहेत.