साहित्याचे किराणा घराणे!

By अतुल कुलकर्णी | Published: February 14, 2018 03:14 AM2018-02-14T03:14:19+5:302018-02-14T03:14:23+5:30

आमचा पोरगा बडोद्याला साहित्य संमेलनाला जाण्यासाठी हट्ट धरून बसलाय. त्याला तिथं कविता सादर करायच्या आहेत, असं म्हणतोय. विडंबन काव्य म्हणजे त्याच्या डाव्या हाताचा मळ आहे बघा... त्याच्या आईला मात्र हे पटत नाही.

Garment Structure of Literature! | साहित्याचे किराणा घराणे!

साहित्याचे किराणा घराणे!

googlenewsNext

प्रिय दादासाहेब,
आमचा पोरगा बडोद्याला साहित्य संमेलनाला जाण्यासाठी हट्ट धरून बसलाय. त्याला तिथं कविता सादर करायच्या आहेत, असं म्हणतोय. विडंबन काव्य म्हणजे त्याच्या डाव्या हाताचा मळ आहे बघा... त्याच्या आईला मात्र हे पटत नाही. मध्यंतरी तो म्हणाला, साहित्य संमेलनाला जायचं आहे. तर ती म्हणाली, मी यादी देते तेवढं साहित्य घेऊन ये येताना. ह्यांना पहाडी चिकन फार आवडतं. रविवारी बनवेन... त्यावर तो कळवळून म्हणाला, अगं आई, ते साहित्य वेगळं आणि माझं साहित्य वेगळं... तर ती पुन्हा कशी म्हणते, ते काही नाही, माझंच साहित्य वापरून बनवते मी, तुझं नंतर कधीतरी खा... यावरून वाद झाला आणि दोघांमध्ये खटके उडाले... ते असो, त्याने परवा मस्त विडंबन केलंय. तुम्ही वाचा...
राधा ही बेवडी... ह-याची, राधा ही बेवडी,
रंगात रंग तो लाल रंग,
पाहूनी नजर भिरभिरते...
पाहून रंग, घेऊन गंध, मग वाट कशाला बघते
या सात पेगांच्या लाटेवरती स्वार होऊनी जावे
राधा ही बेवडी... हºयाची, राधा ही बेवडी...
रंगीत रंगीत पाण्याने, ग्लास असे हे भरलेले
थंडगार ग्लासावरूनी, बर्फांचे ओघळ झरताना
हा दरवळणारा गंध व्हिस्कीचा
मनास बिलगुनी जाई...
हा उनाड बंड्या, पेग व्हिस्कीचे
फुकटातच ढोसूनी जाई...
आज इथे या बारतळी,
ग्लास व्हिस्कीचे खुणावती...
तिज सामोरी जाताना,
उगा पाऊले अडखळती...
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे,
काहीच समजत नाही...
राधा ही बेवडी... ह-याची, राधा ही बेवडी...
तुम्हाला सांगतो, दादासाहेब, आमच्या पोरानं कमाल केलीय. म्हणूनच म्हणतो, बडोद्याला त्याचं कविसंमेलन ठेवा. याच्या कवितांनी धमाल येईल बघा... परवा तर त्याने फार भारी कविता केली. सगळे जाम खूश झाले. चार ओळी सांगू का? वाचाच तुम्ही.
आज ढाब्यावरती पेग भरतो हरी,
बाबूराव जरा जपून; जा आपुल्या घरी...
सांगा त्या नारायणास काय जाहले...
खुर्ची वाचुनी असे किती फिरायचे...?
आहे की नाही... पूर्ण कविता आहे ही. म्हणून तुम्ही आमच्या पोरासाठी शब्द टाकाच दादासाहेब... सध्या शिवसेनेचे आणि भाजपाचे जागांच्या वरून जे काही चालू आहे त्यावर पण त्याने कविता केलीय दादासाहेब.
दिवस तुझे हे भांडायचे,
जागांच्या वाचुनी झुरायचे...
स्वप्नात गुंतत जाणे, सीएम ना भेटले राणे...
त्यांच्याही हृदयी झुरायचे,
खुर्चीच्या वाचुनी रुसायचे...
अंदाज आपुला घ्यावा,
मगच करावा दावा...
वाटेत उगवती काटे...
टोचुनी टोचुनी रडायचे...
माझ्या या पक्षाच्या दाराशी
थांब तू गड्या जरासे
जागांचे गोंधळ घालायचे...
जागांच्या वाचुनी झुरायचे...
फार प्रतिभावान आहे दादासाहेब आमचा पोरगा. त्याच्या आईजवळ राहिला तर किराणा साहित्याच्या पुढे जाणार नाही. म्हणून म्हणतो, त्याला एक संधी द्या...

Web Title: Garment Structure of Literature!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी