गेटवे आॅफ वेस्ट
By admin | Published: April 20, 2016 02:55 AM2016-04-20T02:55:14+5:302016-04-20T02:55:14+5:30
‘स्ट्रिंग आॅफ पर्ल’ सारख्या योजनांच्या माध्यमातून भारताला घेरण्याच्या रणनीतीवर चीन वेगाने काम करीत असताना, इराणमधील चाबहार बंदरासंदर्भातील महत्त्वपूर्ण करार
‘स्ट्रिंग आॅफ पर्ल’ सारख्या योजनांच्या माध्यमातून भारताला घेरण्याच्या रणनीतीवर चीन वेगाने काम करीत असताना, इराणमधील चाबहार बंदरासंदर्भातील महत्त्वपूर्ण करार त्वरेने पूर्णत्वास नेण्यावर, इराण व अफगाणिस्तानसोबत सहमती घडवून, भारतानेही पाकिस्तान-चीन जोडगोळीला सडेतोड उत्तर दिले आहे. भारताच्या पराराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या तेहरान दौऱ्यादरम्यान, इराण व अफगाणिस्तानने चाबहार बंदर करार वेगाने पूर्णत्वास नेण्यास मान्यता दिली. पाकिस्तानातील ग्वादार बंदराच्या विकासाच्या माध्यमातून अरबी समुद्र व हिंदी महासागरात थेट प्रवेश मिळविण्याच्या चीनच्या मनसुब्यांना चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी भारताला हा करार करणे अत्यावश्यक होते. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत मध्य आशिया व युरोपातील देशांशी भारताचा खुश्कीच्या मार्गाने व्यापार चालत असे. भारताला स्वातंत्र्य मिळतानाच जगाच्या नकाशावर पाकिस्तानचा उदय झाला आणि त्या देशाने जन्मापासूनच भारताशी उभा दावा मांडला. परिणामी भारताचा पश्चिमेकडील देशांसोबतचा भूमार्गाने होणारा संपर्कच संपुष्टात आला. त्यामुळेच अफगाणिस्तानसारखा मित्रही भारतापासून दुरावला. आग्नेय इराणमधील चाबहार बंदराच्या विकासामुळे भारताचा पश्चिमेकडील देशांसोबतचा संपर्क पुन्हा घनिष्ट होण्यास भरीव मदत होणार आहे. विशेषत: भारताचा अफगाणिस्तानसोबतचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढून, चारही बाजूंनी जमिनीने वेढलेल्या त्या देशाचे पाकिस्तानवरील परावलंबित्व बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. त्याशिवाय या प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरलाही चालना मिळणार आहे. भारत, रशिया, इराण, युरोप आणि मध्य आशिया दरम्यान रस्ते, रेल्वे आणि समुद्र मार्गे मालवाहतूक करण्यासाठी या कॉरिडॉरची कल्पना मांडण्यात आली आहे. चाबहार बंदराच्या विकासामुळे भारतातून इराणला होणारी लोह खनिज, साखर व तांदळाची निर्यात वाढणार आहे. त्यामुळे एका अर्थाने चाबहार बंदर हे भारतासाठी ‘गेटवे आॅफ वेस्ट’ ठरणार आहे. त्याशिवाय भारताच्या खनिज तेलाच्या वाहतूक खर्चातही मोठी बचत होणार आहे. भारताला युरिया व सुका मेवाही बराच स्वस्त दरात मिळू शकणार आहे. या व्यापारी लाभांशिवाय चाबहारचे राजकीय महत्त्वही मोठे आहे. अफगाणिस्तानचे पाकिस्तानवरील परावलंबित्व कमी झाल्यामुळे त्या देशातील कट्टरपंथी विचारधारेच्या प्रसारास अटकाव होण्यासही मदत होईल. भारतासाठी ती मोठी उपलब्धी असेल. ग्वादार बंदराच्या माध्यमातून अरबी समुद्र व हिंद महासागरात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या चीनच्या मनसुब्यावर पाणी फिरण्यास तर चाबहारचा मोठा हातभार लागेलच; पण त्यामुळे भारताला पश्चिमी अरबी समुद्रात पाय रोवता येतील. अशा रितीने चाबहारचा विकास भारतासाठी अनेक मार्गांनी मोठाच उपयुक्त ठरणार आहे.