आधी वंदू तुज मोरया - आजच 'ज्येष्ठा गौरी आवाहन ' आहे, दिवसभरात केव्हाही गौरी आणाव्यात

By दा. कृ. सोमण | Published: August 29, 2017 07:00 AM2017-08-29T07:00:00+5:302017-08-29T07:00:00+5:30

आज भाद्रपद शुक्ल अष्टमी , मंगळवार  ,  चंद्र रात्री १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्रात आहे. त्यामुळे आजच 'ज्येष्ठा गौरी आवाहन ' आहे. आज दिवसभर केव्हाही गौरी आणाव्यात.  वेळ उत्तम आहे. भाद्रपद  शुक्ल पक्षात चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरी आणाव्यात.

Gauri can be brought any time today | आधी वंदू तुज मोरया - आजच 'ज्येष्ठा गौरी आवाहन ' आहे, दिवसभरात केव्हाही गौरी आणाव्यात

आधी वंदू तुज मोरया - आजच 'ज्येष्ठा गौरी आवाहन ' आहे, दिवसभरात केव्हाही गौरी आणाव्यात

googlenewsNext
ठळक मुद्देप्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या परंपरेप्रमाणे गौराईचे आगमन होत असतेकाही कुटुंबात मुखवट्यांच्या गौरी आणल्या जातात. काही कुटुंबात गौरींच्या मूर्ती पेटीत ठेवलेल्या असतात.ज्येष्ठा गौर म्हणजे साक्षात गणेशाची आई पार्वतीच असते. ती लक्ष्मीच असते.  ज्येष्ठा गौरींचा थाट  काही वेगळाच असतो.

                               " गौराई माझी लाडाची लाडाची ग ऽऽ....
                                  अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग ऽऽ....."
                        आज भाद्रपद शुक्ल अष्टमी , मंगळवार  ,  चंद्र रात्री १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्रात आहे. त्यामुळे आजच 'ज्येष्ठा गौरी आवाहन ' आहे. आज दिवसभर केव्हाही गौरी आणाव्यात.  वेळ उत्तम आहे. भाद्रपद  शुक्ल पक्षात चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरी आणाव्यात. चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरी पूजाव्यात आणि चंद्र मूळ नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरींचे विसर्जन करावे असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या परंपरेप्रमाणे गौराईचे आगमन होत असते. काही कुटुंबात खड्यांच्या गौरी आणतात. काही कुटुंबात मुखवट्यांच्या गौरी आणल्या जातात. काही कुटुंबात गौरींच्या मूर्ती पेटीत ठेवलेल्या असतात त्या आज बाहेर काढल्या जातात. वस्त्रालंकारांनी त्या सजविल्या जातात तर काही कुटुंबात तेरड्यासारख्या वनस्पतींच्या गौरी आणल्या जातात. ज्येष्ठा गौर म्हणजे साक्षात गणेशाची आई पार्वतीच असते. ती लक्ष्मीच असते.  ज्येष्ठा गौरींचा थाट  काही वेगळाच असतो. कारण पार्वती आपला पुत्र श्रीगणपती यांचे स्वागत व पूजन कसे चालले आहे.हेच पहायला जणू ती येत असते. ती केवळ गणपती व स्कंध यांचीच माता नसते तर ती सार्या चराचर सृष्टीची आई असते.
           गौराईच्या आगमनाबरोबर त्या कुटुंबातील सासरी गेलेली कन्याही आपल्या मुलाबाळांसह माहेरी माहेरपणाचा आनंद घेण्यासाठी येत असते. गौराईच्या स्वागताबरोबरच त्या कुटुंबातील माता आपल्या लेकीचे स्वागत करण्यासाठी आतुर झालेली असते. सासरहून माहेरी आलेल्या मुलीचे आणि आईचे नाते हे खूप हृदयस्पर्शी असते. मातेला आपल्या माहेरी आलेल्या मुलीला तिच्या खुशालीसंबंधी  खूप काही विचारायचे असते, आणि माहेरी आलेल्या मुलीला आपल्या जन्मदात्या आईला खूप काही सांगायचे असते.आपले मामंजी कसे आहेत , सासुबाई कशा  आहेत, दीर कसे आहेत , नणंदा कशा आहेत आणि प्रत्यक्ष पतिराज कित्ती प्रेम करतात हे सारे सांगायचे असते. लहान असताना घरात बागडणारी आपली मुलगी आता आई बनून माहेरी आलेली असते. आपल्याकडे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती.त्यावेळी मुलींना सासर आणि माहेर यांत खूप फरक जाणवत होता. सासरी जबाबदारीची राहणी आणि माहेरी लाभणारा मोकळेपणा हा फरक होता. माहेराची आई, बाबा, बहीण, भाऊ ही नाती आणि सासरची सासू , सासरे,दीर नणंद आणि पतिराज ही नाती यांत खूप वेगळेपणा होता. ' ती ' आई आणि ' त्या ' आई यांच्याशी असणारे नातेही वेगळे होते . सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीत राहणार्या मुलीना त्यावेळच्या या माता आणि माहेरी आलेल्या कन्येच्या भेटीबद्दल व त्यांच्या संवादाबद्दल काही विशेष वाटणार नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या 'राजा- राणीच्या ' कुटुंबात राहणार्या मुलीना माहेर आणि सासर यांत फरकच जाणवत नाही. त्यावेळी दूरध्वनी किंवा मोबाईल नव्हते आई- मुलीची प्रत्यक्ष भेट गौराईच्या या सणाच्या निमित्ताने होत होती. म्हणून पूर्वी या दोन्ही गौराईंच्या आगमनाला - गौरी आवाहनाला एक विशेष असे महत्व होते. लोकमतच्या वाचकांमधील ज्येष्ठ गृहिणीना माझे हे म्हणणे नक्कीच पटले असेल.
                                            आई- वडिलांची सेवा
           आपण कधी कधी बोलताना सहजपणे म्हणतो की " पुराणातली वांगी पुराणात ! " इथे ' वांगी ' या शब्दाऐवजी   ' वानगी ' म्हणजे ' उदाहरण ' हा शब्दच योग्य आहे. कधी कधी पुराणातली ही ' वानगी ' मोठा संदेश देत असतात. आता हेच पहाना !
           पद्मपुराणातील ही कथा तशी साधी सरळ आहे. पण सध्याच्या परिस्थितीत ती एक मोठा संदेश देत असते.          पद्मपुराणामधील एकसष्टाव्या  अध्यातील ही कथा आहे. ही कथा महर्षी व्यासानी संजयाला सांगितलेली आहे. शंकर - पार्वती यांना स्कंद आणि गणेश अशी मुले होती. एके दिवशी सर्व देवांनी श्रद्धेने अमृतापासून तयार केलेला एक दिव्य मोदक पार्वतीला दिला.तो पाहून पार्वतीची दोन्ही मुले त्या मोदकासाठी माता पार्वतीकडे हट्ट करू लागली.  तेव्हा पार्वती त्या दोन्ही मुलांना म्हणाली -" हा अमृताचा मोदक खूप महत्वाचा आहे. हा मोदक खाणारा अमर होऊन सर्व विद्या, शास्त्र, कला यामध्ये निपुण होईल. परंतु हा मी तुमच्यापैकी एकालाच देणार आहे. जो धार्मिक भावनेने सिद्धी प्राप्त करून प्रथम माझ्यापाशी येईल त्यालाच मी हा मोदक देणार आहे. "  हे ऐकून स्कंद मोरावर विराजमान होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी निघाला.  गणेशाने मात्र आई वडिलांची पूजा केली आणि त्यांना नमस्कार करून प्रदक्षिणा घातली. स्कंद येण्यापूर्वीच तो पार्वतीपुढे हजर झाला.  तीर्थयात्रा आटोपून स्कंद आपल्यालाच  मोदक मिळणार या आशेने पार्वतीपाशी आला. तेथे गणेशाला पाहून तो चकित झाला. मग दोघेही मोदकासाठी पार्वतीकडे हट्ट करू लागले. पार्वतीने गणेशाला शाबासकी दिली.तिने  त्याच्या बुद्धीचातुर्याचे कौतुक केले आणि म्हणाली --" आई-वडिलांच्या पूजेचे ( सेवेचे ) पुण्य व सिद्धी ही इतर कुठल्याही सिद्धीपेक्षा महान व श्रेष्ठ आहे. त्यामुळे मी हा मोदक गणेशालाच देणार आहे. "
            मोदक देताना शंकर - पार्वतीनी गणेशास वर दिला की, " तुला यज्ञयागात , वेदशास्त्र स्तवनात , नित्यपूजा विधानात अग्रक्रम मिळेल." अमृताचा मोदक मिळवणारा, आई- वडिलांची सेवा करणारा , अग्रपूजेचा मान मिळविणारा गणेश हा लहानांपासून थोरांपर्यंत, गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत  सर्वांनाच प्रिय व जवळचा वाटू लागला.
सध्या काही मुले आपल्या वृद्ध माता-पित्याचा नीट सांभाळ करीत नाहीत. त्याना वृद्धाश्रमात धाडतात अशा मुलांसाठी ही कथा खूप मार्गदर्शक ठरेल. आपणास जन्म देणारे, लालन पालन करून शिक्षण देणारे व लहानाचे मोठे करणारे, आपणास खूप जपणारे, सदैव आपल्या पाठीशी उभे राहून आपले शुभचिंतन करणारे आपले माता-पिता हे मुलांना देवासमान आदरणीय वाटले पाहिजेत.
                                            गणेशाचे वाहन उंदीर !
   गणपती आकाराने मोठा आणि त्याचे वाहन छोटा उंदीर हे कसे ? असा प्रश्न नेहमी विचारला जातो. गणेशपुराणात ' आखुवाहन ' असा उल्लेख आहे. ' आखु ' या संस्कृत शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ माया , भ्रम , चोर आणि दुसरा अर्थ उंदीर ! माया म्हणजे विश्वाचा भ्रामक प्रसारा व मोह ! ज्ञानप्राप्तीसाठी त्यांवर विजय मिळविणे त्याला नियंत्रणात ठेवणे महत्वाचे असते. गणेशाने मोह मायेला वाहन बनवून , त्यांवर नियंत्रण ठेऊन ज्ञानप्राप्ती केली. असा एक अर्थ निघतो.  भारत हा शेतीप्रधान देश आहे. उंदीर हा शेतातील धान्याची नासाडी करतो. गणेशाने त्यांवर आरूढ होऊन त्याला नियंत्रणात ठेवले आहे. असाही अर्थ काढला जातो. तसेच उंदीर हे काळाचे प्रतिक मानले जाते. गणपती हा उंदीररूपी काळावर आरूढ झाला आहे असेही मानले जाते.  काही विद्वानांच्या मते मूषक म्हणजे अंधार !  गणपती हा अंकारावर आरूढ होऊन सर्वत्र प्रकाश आणतो असेही मानले जाते.
                     आज गणेश स्थापनेपासूनचा पाचवा दिवस आहे . आपल्यात चांगला बदल होण्यासाठी त्याला प्रार्थना करूया.
   सुख येणे न येणे आपल्या हातात नसते. पण सुखी रहायचे की नाही हे आपल्या हातात असते. दु:ख येणे न येणे आपल्या हातात नसते. पण दु:खी व्हायचे की नाही हे आपल्याच हातात असते. जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे आपल्या हातात आहे त्याचा विचार आपण करूया.
(दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक आहेत. त्यांचा ई-मेल आयडी dakrusoman@gmail.com )

Web Title: Gauri can be brought any time today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.