मुलांच्या खेळण्यांतला लिंगभाव हा ‘पोरखेळ’ नव्हे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 05:28 AM2021-10-21T05:28:27+5:302021-10-21T05:28:40+5:30

मुलग्यांची खेळणी वेगळी आणि मुलींची खेळणी वेगळी, अशी वाटणी जगभरातच आहे. ‘लेगो’ या कंपनीनं निदान आपल्यापुरता तरी हा भेदभाव संपवायचं ठरवलं आहे.

gender is not a childs play in childrens toys | मुलांच्या खेळण्यांतला लिंगभाव हा ‘पोरखेळ’ नव्हे!

मुलांच्या खेळण्यांतला लिंगभाव हा ‘पोरखेळ’ नव्हे!

googlenewsNext

- गौरी पटवर्धन, लेखक, मुक्त पत्रकार

मुलींचे खेळ म्हणजे बाहुली, भातुकली, घर-घर, शाळा-शाळा... मुलांचे खेळ म्हणजे बंदुका, गाड्या, बॅटबॉल, लढाई-लढाई मुलींच्या खेळण्यांचे रंग गुलाबी, जांभळा, लेमन येलो, पीच, स्काय ब्लू… मुलांच्या खेळण्यांचे रंग लाल, काळा, डार्क निळा, पिवळा, केशरी खेळण्याच्या वयातल्या लहान मुला-मुलींना अशी विभागणी खरंच करून हवी असते का, याचा अजिबात विचार न करता समाज नावाच्या सर्वसमावेशक सत्तेने वर्षानुवर्षे परस्पर अशी विभागणी करून टाकलेली आहे. काळ आणि देश बदलला की, त्यातले तपशील बदलतात. पण मुद्दा मात्र तोच राहतो, की मुलांनी मुलांचे खेळ खेळावेत आणि मुलींनी मुलींचे!

ज्यावेळी जगभरातला बव्हंशी समाज थोड्याफार फरकाने असा विचार करतो, त्यावेळी त्यांना पुरवठा करणारी बाजारपेठ तरी मागे का राहील? बाजारपेठेला तर असे वेगवेगळे खेळ, वेगवेगळे रंग, वेगवेगळे प्रिंट्स असणारी खेळणी बनवण्यामध्ये दुप्पट रस असतो.

लेगो नावाच्या डॅनिश खेळण्यांच्या कंपनीच्या असं लक्षात आलं, की २०११ साली त्यांचे ९० टक्के ग्राहक मुलगे होते. मुलींना आपल्या खेळण्यांकडे कसं आकर्षित करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी २०१२ साली सर्वेक्षण केले. त्यात त्यांनी काही मुलांना आणि काही मुलींना किल्ले खेळायला दिले. त्यावर मुलांनी ताबडतोब त्यातले सैनिक, घोडे आणि हत्यारं उचलली आणि त्यांनी लढाई लढाई खेळायला सुरुवात केली. मात्र, मुलींना त्या खेळण्यात विशेष रस वाटला नाही. कारण त्या किल्ल्याच्या आत आणि आजूबाजुला काहीच नव्हतं. मुलींची ही प्रतिक्रिया आणि अपेक्षा बघून लेगो कंपनीने त्यानंतर लेगो फ्रेंड्स नावाचं एक नवीन कलेक्शन फक्त मुलींना डोळ्यासमोर ठेवून बाजारात आणलं. त्यात पॉप स्टारचं घर, लिमोझिन, कपकेक कॅफे, सुपरमार्केट अशा सगळ्या गोष्टी होत्या. त्या कलेक्शनने व्यवसाय चांगला केला. मात्र, त्यावेळी त्यांच्यावर लिंगाधारित भेदभाव मुलांच्या डोक्यात घालण्याबद्दल प्रचंड टीकाही झाली.

अर्थात लेगोने ही खेळणी बाजारात आणण्याच्या पूर्वीपासून बार्बी या बाहुलीबद्दल जगभरातून अनेक वर्षे टीका होत आली आहे. बार्बीच्या शरीराचं प्रमाण बघितलं, तरी त्या टीकेचं कारण लक्षात येतं. बार्बी जर का एखाद्या खऱ्या मुलीच्या आकाराची बनवली, तर तिच्या शरीराचं प्रमाण कसं असेल? तर उंची ५ फूट ९ इंच, छाती ३९ इंच, कंबर १८ इंच, नितंब ३३ इंच आणि ३ साईझचे शूज! आता अशा शरीराची मुलगी प्रत्यक्षात असू शकते का? असावी का? असं असणं निरोगी व्यक्तिला शक्य आहे का? तर नाही. मग अशा प्रमाणाची बाहुली घेऊन खेळतांना मुली तेच प्रमाण मनातल्या मनात योग्य मानायला शिकणार नाहीत का? सौंदर्याचे असले अघोरी मापदंड मुलींच्या मनात कशाला भरवायचे? बार्बीबद्दल तर वंशश्रेष्ठत्त्वापासून अनेक आरोप केले गेलेले आहेत. त्यामुळे बार्बीमध्ये काही बदलही झालेले आहेत.

तसेच बदल आता लेगोनेही त्यांच्या खेळण्यांमध्ये करण्याचं ठरवलं आहे. त्यांनी त्यांच्या खेळण्यांमधून लिंगाधारित भेदभाव करणं बंद करण्याचं जाहीर केलं आहे आणि हा निर्णय घेण्यामागेही त्यांनी केलेल्या एका सर्वेक्षणाचाच  दाखला दिलेला आहे. 

विविध देशांतल्या ६ ते १४ वयोगटातल्या ७००० मुलं आणि त्यांच्या पालकांना काय वाटतं, याचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यांना काही इंटरेस्टिंग निरीक्षणं हाती लागली आहेत.

१. बहुसंख्य मुलींना आणि बऱ्याच मुलांना असं वाटतं, की मुलं आणि मुलींसाठी वेगवेगळे खेळ असण्याची आवश्यकता नाही.
२. ८२ टक्के मुली आणि ७१ टक्के मुलग्यांना असं वाटतं, की मुलींनी फुटबॉल खेळायला आणि मुलांनी नाचाची प्रॅक्टिस करायला काही हरकत नाही. 
३. मुलींना मुलांचे समजले गेलेले खेळ खेळायचे आहेत. मात्र, समाज अजून त्यासाठी पुरेसा तयार नाही.
४. त्यातल्या त्यात मुलींनी पुरुषी खेळ खेळण्याला विरोध कमी आहे. मात्र, मुलग्यांनी बायकी खेळ खेळायला घेतले तर त्यांच्या पालकांना काळजी वाटते. 
५. मुलामुलींसाठी वेगवेगळे खेळ असण्यापेक्षा सारखेच खेळ असावेत असंच मुलांना वाटतं...

म्हणूनच लेगोने त्यांच्या खेळण्यांमधला लिंगभाव संपवण्याचं ठरवलं आहे. कारण कितीही झालं तरी ती एक व्यावसायिक कंपनी आहे. लहान मुलं-मुली हे त्यांचे खरे ग्राहक आहेत आणि आपल्या ग्राहकांची मागणी असेल त्याप्रमाणे पुरवठा करणं, हा त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. त्यामुळेच या निर्णयाचं स्वागत करतांना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, हा पूर्णतः व्यावसायिक निर्णय आहे.

बाजारात जे विकलं जातं ते कंपन्या बनवतात आणि कंपन्या जे बनवतात ते बाजारात विकलं जातं हे खरं असलं तरी समाजाच्या दबावामुळे बाजारपेठेत बदल घडतात, हेच सत्य आहे.

समाज म्हणून आपली जबाबदारी आहे, की आपल्या मुलांपर्यंत येणारं प्रत्येक खेळणं, प्रत्येक विचार हा त्यांना माणूसपणाकडे नेणारा असला पाहिजे. आपल्या मुली केवळ बाईपणाच्या चौकटीत आणि मुलगे पुरुषपणाच्या चौकटीत अडकून मोठेपणी गुदमरायला नको असतील, तर अशाच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल घडवून आणले पाहिजेत. मग तो शब्दशः पोरखेळ का असेना!

Web Title: gender is not a childs play in childrens toys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.