जनरल कासीम सुलेमानी दहशतवादी होता?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 08:16 PM2020-01-04T20:16:56+5:302020-01-04T20:22:39+5:30

एकेकाळी आयसीसविरोधात स्वत:चा जीव धोक्यात घालून लढणा-या या शिपायाचे अमेरिकेच्या दृष्टीनेही आता महत्त्व उरले नव्हते...!

General Qasim Sulaimani was a terrorist? | जनरल कासीम सुलेमानी दहशतवादी होता?

जनरल कासीम सुलेमानी दहशतवादी होता?

Next

- राजू नायक

कासीम सुलेमानी- इराणी राज्यक्रांती सुरक्षा दलाचे प्रमुख- ज्याला शुक्रवारी अमेरिकी फौजांच्या हल्ल्यात मरण आले हा अतिरेकी होता का, याची सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे. सुलेमानी इराणच्या अधिकृत लष्करात नव्हता; परंतु इराणमधला अत्यंत प्रभावशाली व्यक्ती गणला जाई, आयातोल्ला खोमेनींचा तर तो निकटचा होता. सुलेमानी इराक, अफगाणिस्तान व आसपासच्या मध्यपूर्व प्रदेशातील लष्करी कारवायांमध्ये सामील होता. त्याने दिल्लीपासून लंडनपर्यंत दहशतवादी हल्ल्यात भाग घेतला होता, असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

पाच मुलांचा बाप असलेला ६१ वर्षीय सुलेमानी राजकीय नेत्यांबद्दल नेहमीच तिरस्कार बाळगी, स्वत: कधीही प्रसार माध्यमांना सामोरे गेला नाही; तसेच तो धार्मिक पंडित नव्हता किंवा त्याने धर्माचे शिक्षणही घेतले नव्हते. उलट, तो एक सामान्य मजूर होता. शहा सरकारकडून घेतलेल्या सात हजार रुपयांच्या परतफेडीसाठी त्याला काबाडकष्ट करावे लागले; त्यानंतर १९७९ मध्ये शहा सरकार उलथवून टाकण्याच्या चळवळीतही तो सहभागी झाल्याची माहिती मिळत नाही. परंतु इस्लामी राज्यक्रांतीनंतर तो इराणी क्रांतिकारी रक्षकांच्या दलात सामील झाला व १९८०-८८ मधील इराण-इराक युद्धात तो लढला होता.

धाडसी व अचूक निर्णय, नेतृत्वातील धडाडी व करिष्मा या जोरावर तो १९९८ मध्ये दलाचा प्रमुख निवडला गेला व देशाबाहेर ज्या ज्या कारवाया झाल्या, त्यात त्याने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्याचे या दलातील स्थान कमांडर मोहम्मद अली जाफरी यांच्याहीपेक्षा श्रेष्ठ मानण्यात येई. क्रांतिकारी सुरक्षा दलाची कामगिरी काहीशी सीआयएप्रमाणे होती, ज्यांनी इराकी युद्धात कुर्र्दीश लोकांची साथ केली व इस्लामी राज्यक्रांतीचा संदेश पोहोचविणे, येथे उलथापालथी घडवून आणणे आदी कारवाया केल्या. त्यांनी लेबनॉनमध्ये हेजबुलला प्रशिक्षण दिले व इराकी सत्तेला शह देऊ पाहणाऱ्या जगभरातील शक्तींना नामोहरम करणे हे त्यांचे उद्दिष्ट राहिले. स्वाभाविकच सीआयएचेही उद्दिष्ट हेच असल्याने त्यांना या दलाचा व प्रामुख्याने सुलेमानीचा तिरस्कार वाटत असे.

सुलेमानीचे नाव अनेक हल्ल्यांत घेतले गेले, ज्यात त्याचे प्रामुख्याने इस्रायल व ज्यू विरोधी लक्ष्य होते. अर्जेंटिनातील ब्युनोस आयर्समध्ये ज्यू समाजावर १९९४ मध्ये झालेले हल्ले, २०१२ मधील बल्गेरियातील हल्ला, २००२ मध्ये पॅलेस्टिनला पाठविलेली शस्त्रसज्ज नौका व नुकताच इस्रायलच्या संरक्षण तळावर केलेला अयशस्वी हल्ला या प्रकरणांत सुलेमानीचे नाव घेतले जाते. त्याला प्रत्युत्तर देताना इस्रायलने सीरियात गेल्या वर्षभरात सुलेमानीने उभारलेल्या लष्करी तळाचा नाश करून टाकला आहे.

अमेरिकेबरोबर त्याचे संबंध नव्हते असे नव्हे. अमेरिका अशा लोकांची आपल्या उद्दिष्टांसाठी मदत घेत आली आहे; त्यामुळे २०१० मध्ये इराकचा अंतरिम पंतप्रधान निवडण्यात सुलेमानीने त्यांना साहाय्य केले होते. अमेरिकेच्याच सल्ल्यावरून इराकच्या बंडखोर लष्कराने इराकमधील अमेरिकी तळांवर चालू असलेले हल्ले सुलेमानीने थांबविण्यास लावले होते. शिवाय २००१च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात फौजा घुसविल्या, त्यावेळी सुलेमानीच्याच विनंतीवरून इराणी अधिकाऱ्यांनी अमेरिकेला तालिबानच्या छुप्या ठिकाणांचा नकाशा बनवून दिला होता.

यापूर्वी दोन वेळा अमेरिकेला सुलेमानीला यमसदनी पाठविण्याची संधी प्राप्त झाली होती. परंतु सुलेमानीची जोपर्यंत त्यांना मदत होत होती, तोपर्यंत ती स्वीकारण्याचे अमेरिकनांचे धोरण होते. इराकमधील आयसीसविरोधात लढण्यासाठी प्रामुख्याने ते सुलेमानीची मदत घेत आले. सुलेमानी या काळात इराणचा राष्ट्रीय नायक बनला व खोमेनींनी त्याला ‘राज्यक्रांतीचा जिताजागता हुतात्मा’ संबोधले होते. परंतु २०१५ पासून सुलेमानीची युद्धनीती चुकत गेली. आयसीसच्या विरोधात त्याच्या दृष्टिकोनाला विरोध झाला. इराकी कुर्दीश सरकारलाही त्याला दूर ठेवावेसे वाटले. सीरियातील त्याचे अनेक अंदाज चुकले होते. सीरियातील लष्करी फौजा त्याचे ऐकेनासे झाल्या. एकेकाळी आयसीसविरोधात स्वत:चा जीव धोक्यात घालून लढणा-या या शिपायाचे अमेरिकेच्या दृष्टीनेही आता महत्त्व उरले नव्हते...!

Web Title: General Qasim Sulaimani was a terrorist?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.