निरामय कामजीवनावरील साहित्याचे जनक : डॉ. विठ्ठल प्रभू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:24 AM2019-03-04T05:24:44+5:302019-03-04T05:25:08+5:30

उघड चर्चा करणे गैर होते अशा काळात मराठीत साहित्यनिर्मिती करून समाजातील न विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे कार्य डॉ. विठ्ठल प्रभू यांनी केले.

Generator of material on non-living work: Dr. Vitthal Prabhu | निरामय कामजीवनावरील साहित्याचे जनक : डॉ. विठ्ठल प्रभू

निरामय कामजीवनावरील साहित्याचे जनक : डॉ. विठ्ठल प्रभू

Next

- राजेंद्र बर्वे
ज्या काळात काम समस्येसंदर्भात बोलणेही अवघड होते, त्याबद्दल उघड चर्चा करणे गैर होते अशा काळात मराठीत साहित्यनिर्मिती करून समाजातील न विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे कार्य डॉ. विठ्ठल प्रभू यांनी केले. सहसा खुलेपणाने बोलल्या न जाणाऱ्या कामजीवनाबाबतच्या समस्यांबाबत योग्य, सहज-सोप्या शब्दांत समुपदेशन करून, कामजीवनाबाबतच्या विविध समस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे काम डॉ. विठ्ठल प्रभू यांनी आपल्या जीवनप्रवासात करून खऱ्या अर्थाने नव्या समाजाच्या उभारणीला हातभार लावला आहे.
मुंबईतील दादरसारख्या मध्यवर्ती भागात ते वाढले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तेथेच त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. १९८० च्या काळात ज्या वेळी समाज सुशिक्षित असूनही लैंगिकता, कामजीवन, गुप्तरोगसारख्या विषयांवर बोलण्यास टाळत असे त्या वेळी जनरल प्रॅक्टिस करणारे डॉ. विठ्ठल प्रभू यांनी ही अडचण समजून घेतली. तरुण पिढीला कामविज्ञानाची माहिती देणे गरजेचे आहे, असे त्यांना त्यांच्या बोलण्यातून जाणवले. मग त्यांनी कामविज्ञानाचा सखोल अभ्यास सुरू केला. त्या काळात डॉ. प्रभूंनी या सगळ्या विषयावर लिहिणे म्हणजे मोठी क्रांती आहे. स्त्री-पुरुषांच्या कामजीवनातील गरजा, लैंगिकतेमुळे उद्भवणारे सामाजिक प्रश्न असे अनेक मुद्दे समोर आले. त्यातूनच मग निरामय कामजीवन हे पुस्तक साकारले. यौवनात पदार्पण, विवाहपूर्व मार्गदर्शन, विवाह, कामक्रिया, विवाहाची अपूर्तता, लैंगिक आगळीक, गर्भधारणा, संततिनियमन, एड्स, गुप्तरोग, जनननिवृत्ती थोडक्यात - कुमारावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंतची कामजीवनाची संपूर्ण माहिती सोप्या, सरळ, सुबोध भाषेत विवेचन करणारे हे एकमेव संग्राह्य पुस्तक म्हणजे डॉ. विठ्ठल प्रभू यांचे निरामय कामजीवन आहे.
त्या वेळी विवाह पूज्य, मातृत्व पूज्य मानले जायचे पण यातील दुवा म्हणजे कामजीवन हे अश्लील मानले जात होते. अशा वेळी लैंगिक जीवनाबाबत खोटारडेपणा चालायचा असे म्हणण्यास हरकत नाही. आजही परिस्थिती बदलली नसली तरी, गैरसमज दूर झाले नसले तरी माहिती उपलब्ध असण्याची भरपूर साधने आहेत. त्यामुळे डॉ. प्रभू यांनी अशा काळात याविषयी पुस्तक लिहिले आहे हे आपल्याला कळले तर त्याचे महत्त्व आपल्याला कळू शकणार आहे. स्त्रियांविषयी उपभोगाची वस्तू म्हणून जसे त्या काळी पहिले जात होते तसे ते आजही पहिले जातेच यात वाद नाही. मात्र ते फक्त तसे नाही हे समजावण्याचा, प्रबोधन करण्याचा विडा डॉ. प्रभू यांनी उचलला आणि साहित्यनिर्मिती केली.
सकस, सुबोध, वैज्ञानिक आणि सोप्या शब्दांत लोकांना माहिती मिळण्याचे साधन उपलब्ध नसल्याने लोकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत होती. मात्र कोणताही आडपडदा न ठेवता, कौटुंबिक वाचन होईल असे पुस्तक लिहिणे म्हणजे समाजामध्ये मोठा बदल होता. अत्यंत सोप्या शब्दांत, शास्त्रोक्त मांडणीद्वारे त्यांनी लैंगिक शिक्षण जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. या माध्यमातून त्यांनी समुपदेशनाचे कामही केले. डॉ. प्रभू यांनी लिहिलेली कामजीवनावरील पुस्तके ही आधीच्या कामजीवनावरील पुस्तकांच्या तुलनेत उत्कृष्ट गणली गेली. निरामय कामजीवन या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९८२ मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर सध्या बाजारात ३४ वी आवृत्ती आहे. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही झाला, टीकाही झाली. मात्र त्यांच्या लिखाणावरून त्यांची वृत्ती कळून येते की त्यांना निरोगी, स्वच्छपणा, आनंदी पण माहितीपूर्ण जीवनासाठी आवश्यक माहिती त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायची होती.
डॉ. प्रभू हे कौन्सिल आॅफ सेक्स एज्युकेशन अ‍ॅण्ड पेरेंटहूड (इंटरनॅशनल) या संस्थेचे मानद अध्यक्ष होते. फॅमिली प्लानिंग असोसिएशन आॅफ इंडियाच्या सेक्स एज्युकेशन, कौन्सिलिंग, रिसर्च, थेरपी केंद्राचे ते मानद सल्लागारही होते. यानंतर उमलत्या कळ्यांचे प्रश्न, प्रश्नोत्तरी कामजीवन, तारुण्याच्या उंबरठ्यावर, माझं बाळ, विवाहेच्छू आणि नवविवाहितांसाठी विवाह मार्गदर्शन, प्राथमिक उपचार, लैंगिकता शिक्षण, यौवन विवाह आणि कामजीवन, आरोग्य दक्षता अशी त्यांची पुस्तके गाजली. लैंगिकता, शिक्षण, आरोग्य या विषयांवर त्यांनी सुमारे ३५ पुस्तके लिहिली. त्यांच्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. त्याव्यतिरिक्त त्यांनी दोन ललित पुस्तके लिहिली. स्नेहबंध आणि गोष्ट एका डॉक्टरची ही दोन पुस्तके त्यांच्या साहित्यनिर्मितीचा महत्त्वाचा हिस्सा आहेत. स्नेहबंध हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक असून यात पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी अशा दिग्गजांचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे. गोष्ट एका डॉक्टरची हे त्यांचे आत्मचरित्र असून त्यामध्ये त्यांनी वैद्यकीय शिक्षणाचा आपला प्रवास रेखाटला आहे. समुपदेशनाद्वारे सोप्या शब्दांत लैंगिक शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केले.

Web Title: Generator of material on non-living work: Dr. Vitthal Prabhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.