उदार की संधीसाधू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 05:54 AM2019-03-01T05:54:01+5:302019-03-01T05:54:06+5:30
इम्रान खान यांच्या उदार धोरणामुळे अभिनंदनची सुटका होणार असली तरी त्यानंतर दहशतवाद्यांना बळ पुरविण्याचे पाकिस्तान थांबविणार आहे काय, हा मुख्य प्रश्न आहे. तसे तोंडी आश्वासन पाकिस्तानने अनेक वेळा दिले असले तरी कारवाई कधीच केलेली नाही.
हवाई चकमकीत अनपेक्षितपणे पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेले भारताचे वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना भारतात परत पाठविले जाईल, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी केली. अभिनंदन यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणारी परराष्ट्र खात्याची यंत्रणा आणि अभिनंदनसाठी प्रार्थना करणारे कोट्यवधी भारतीय नागरिक यांना समाधान वाटावे अशी ही घोषणा आहे.
अभिनंदन यांची सुटका पाकिस्तानला करावी लागणार हे कालपासूनच लक्षात येत असले तरी सुटकेची घोषणा इतक्या तातडीने होणे अनपेक्षित आहे. कारण युद्धकैद्यांबाबत पाकिस्तानबरोबरचा अनुभव चांगला नाही. अनेक दिवस अतीव छळ सोसल्यानंतर यापूर्वीचे युद्धकैदी सुटले आहेत. अभिनंदन यांची सुटकाही काही दिवसांनंतर होईल असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री म्हणत होते. नंतर निर्णय फिरला व उद्याच सुटका होणार अशी घोषणा झाली. इम्रान खान यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत चालला होता. अमेरिका, चीनसारखी मित्रराष्ट्रेही खडे बोल सुनावीत होती. मुस्लीमबहुल राष्ट्रांकडूनही प्रतिसाद मिळत नव्हता. जगाच्या पाठीवर एकटा पडलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांची ही दिखाऊ उदारता आहे. पाकिस्तानच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळाले नाही, तर पाकिस्तान दिवाळखोरीत जाईल. केवळ द्वेषापोटी भारताच्या वैमानिकाला वाईट वागणूक दिली वा अडकवून ठेवले तर त्याचे घोर परिणाम होतील हे पाकिस्तानचे पंतप्रधान व या पंतप्रधानांना पडद्याआडून नाचविणारे तेथील लष्कर यांना पुरते माहीत आहे. पैसा उभा करण्यासाठी जगासमोर उजळ माथ्याने जायचे असेल तर भारतीय वैमानिकाला सोडणे सोईस्कर होईल हा संधीसाधू हिशेब त्यामागे आहे. अभिनंदनची सुटका ही भारतासाठी महत्त्वाची व समाधानाची असली तरी त्यामागचे संधीसाधू राजकारण दुर्लक्षित करता येणार नाही. आता पंचाईत मोदी सरकारची आहे.
मंगळवारच्या हवाई मुसंडीनंतर भारताची मान ताठ झाली होती. सर्व संकेतांना दूर सारून पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानच्या प्रचारसभेत गर्वाचे प्रदर्शन केले. भारतीय वायुदलाची कामगिरी अभिमान वाटावा अशीच होती यात शंका नाही. त्याबद्दल प्रत्येक देशवासी वायुदलाचे मनापासून कौतुकही करीत होता. पण एका कारवाईमुळे विजय मिळाला असे होत नाही. पाकिस्तान हा भारतद्वेषाने पछाडलेला प्रबळ शत्रू आहे. नव्या नव्या क्लृप्त्या शोधून भारताला जेरीस आणण्याचे मिशन त्या देशातील राज्यकर्त्यांनी घेतले आहे. एखाद-दुसऱ्या सर्जिकल स्ट्राइकने माघार घेणारा वा कारवाया थांबविणारा तो देश नाही. याचे प्रत्यंतर दुसऱ्याच दिवशी आले. बुधवारी पाकिस्तानने भारतीय लष्करी ठाण्यांवर उघड हल्ला केला. तो परतवून लावताना दुर्दैवाने अभिनंदन वर्धमानचे विमान कोसळले व तो पाकिस्तानच्या कैदेत पडला. विजयानंतर ठेच अशी भारताची अवस्था झाली. भारताच्या हवाई हल्ल्यामुळे नाचक्की झालेल्या पाकिस्तानी लष्कराला या एका दुर्दैवी घटनेमुळे जोम आला. भारताला कैचीत पकडण्यास एक कारण मिळाले. त्याच कारणाचा वापर करून भारताची आक्र मकता थांबविण्याची धडपड इम्रान खान करीत आहेत. तेव्हा अभिनंदनबाबतचे उदार धोरण व दहशतवाद्यांची सातत्याने होणारी घरभरणी या पाकिस्तानच्या दुटप्पी खेळाचा ताळमेळ कसा घालायचा, हा प्रश्न भारतापुढे आहे. यासाठी एकच मार्ग म्हणजे अभिनंदनची सुटका ही पाकिस्तानच्या उदारतेची कृती नसून भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विजय आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
युद्धाचे अनेक आयाम असतात व परराष्ट्र धोरण हे त्यातील एक मुख्य अस्त्र असते. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताने ते परिणामकारक रीतीने वापरले आणि म्हणून अभिनंदनची सुटका करण्याची वेळ पाकिस्तानवर आली हे लक्षात ठेवून जोपर्यंत दहशतवादी कारवाया बंद होत नाहीत आणि मसूद अजहरला ताब्यात देत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानसोबत शांततेचा व्यवहार होऊ शकत नाही अशी धोरणातील स्पष्टता भारताने ठेवली पाहिजे. मात्र वाटाघाटीचे दरवाजे बिलकूल बंद करूनही चालत नाही. सोयीनुसार ते किलकिले करावे लागतात. मोदी सरकारने याचेही भान ठेवायलाच हवे. तीच आजची गरज आहे.