सज्जन की, दुर्जन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 04:04 PM2018-12-28T16:04:18+5:302018-12-28T16:06:38+5:30

मानवी प्रवृत्ती दोन प्रकारात विभाजित केल्या जातात. सज्जन आणि दुर्जन. चांगले काम करणारा, चांगला स्वभाव असलेला, कुणाच्या अध्यात ना मध्यात असा तो सज्जन अशी बाळबोध व्याख्या करता येईल. दुर्जन व्यक्ती म्हणजे संतापी, क्रोधी, विघ्नसंतुष्ट, असंतुष्ट, शीघ्रकोपी, दुसऱ्याचे अहित करण्यात आणि पाहण्यात आनंद मानणारा, क्रूर अशी अनेक विशेषणे देऊन त्याचे वर्णन करता येईल. ढोबळमानाने ही स्वभाव वैशिष्टये पटकन लक्षात देखील येतात.

Gentlemen, the villain ... | सज्जन की, दुर्जन...

सज्जन की, दुर्जन...

Next

मिलिंद कुळकर्णी
मानवी प्रवृत्ती दोन प्रकारात विभाजित केल्या जातात. सज्जन आणि दुर्जन. चांगले काम करणारा, चांगला स्वभाव असलेला, कुणाच्या अध्यात ना मध्यात असा तो सज्जन अशी बाळबोध व्याख्या करता येईल. दुर्जन व्यक्ती म्हणजे संतापी, क्रोधी, विघ्नसंतुष्ट, असंतुष्ट, शीघ्रकोपी, दुसऱ्याचे अहित करण्यात आणि पाहण्यात आनंद मानणारा, क्रूर अशी अनेक विशेषणे देऊन त्याचे वर्णन करता येईल. ढोबळमानाने ही स्वभाव वैशिष्टये पटकन लक्षात देखील येतात.
धर्मसंस्थापक, धर्मग्रंथ, साधू, संत, विचारवंत यांनी सखोल व चिंतनीय असे विचारमंथन सज्जन व दुर्जन या व्यक्ती व स्वभाव विशेषांवर केलेले आहे. प्रत्येकाचा संदेश हा सज्जन व्हा, दुर्जन होऊ नका. सज्जनांचे संरक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन होते, असाच निष्कर्ष धर्मग्रंथ, कथा, कादंबºया, कविता, नाटक चित्रपटातून काढला जातो. सज्जनशक्ती वाढायला हवी, असाच त्यामागे दृष्टिकोन असतो.
पण मानवी स्वभाव किती गुंतागुंतीचा आहे, याची आपल्याला कल्पना आहे. एखाद्या कृती वा घटनेवरुन त्या माणसाची वा समूहाची विभागणी सज्जन वा दुर्जन अशा एका गटात करणे सोपे नसते. भूतदया हा सज्जन व्यक्तीच्या स्वभाव वैशिष्टयांमधील एक गुण. संत एकनाथ महाराजांनी तहानेअभावी तडफडणाºया गाढवाला सोवळ्याचा उपचार आड न येऊ देता पाणी पाजले, हे उदाहरण तर प्रसिध्द आहे. प्राणिमात्रांवर दया करा, असे ऋषीमुनींनी सांगितले आहे. बागेतील मुंग्यांसाठी साखर टाकणारे, कबुतरे आणि पक्ष्यांसाठी मूठभर धान्याचे दाणे नियमित टाकणारे, गोग्रासाविना म्हणजे गायीला भाकरीचा घास खाऊ घातल्याशिवाय जेवण न करणारे, मुक्या जनावरांची तहान भागविण्यासाठी हाळ, हौद बांधणारे लोक आपण पाहतो. हाच स्वभाववैशिष्टय असलेली माणसे मांसाहार करतात, पक्ष्यांची घरटी असलेल्या झाडांवर विकास कामांसाठी करवत चालवतात, गुराढोरांपासून पिकांना वाचविण्यासाठी शेताच्या कुंपणात वीज प्रवाह सोडतात...मग यांना सज्जन म्हणावे की, दुर्जन?
वसुधैव कुटुंबकम म्हणत भारतीय संस्कृतीच सर्वश्रेष्ठ असल्याबद्दल कंठशोष करणाºया विचारवंताचे कुटुंब विभक्त असते. आई-वडीलांपासून ती व्यक्ती वेगळी राहते, भाऊ-बहिणींमध्ये दुरावा असतो. बाप-लेकांमधील संवाद हरवलेला असतो.
जगाने समानतेचे तत्त्व मानले तर सारे भेदाभेद दूर होतील, असे सभा-संमेलनामधून उच्चरवाने सांगणारा प्रकाडपंडित स्वत: मात्र पत्नीला दुय्यम वागणूक देत असतो. घरगड्याला जनावरासारखी वागणूक देत असतो. मी सांगतो तेवढेच खरे, मी मांडतो तीच विचारसरणी, तत्त्वज्ञान योग्य, अन्य कचरापेटीत टाकण्यासारखे या विचारावर दृढ, कायम असतो.
कुत्र्याची नवजात पिल्ले थंडीत गारठू नये म्हणून घरातील रिकामे पोते आणून त्यांच्या अंगावर पांघरणारी व्यक्ती पुढे, त्याच कुत्र्यांना भटकी संबोधून दगड मारायला मागेपुढे पहात नाही.
हे सगळे पाहिल्यावर सांगा बरे, सज्जन आणि दुर्जन अशी विभागणी इतकी साधी सोपी आहे काय? एकाच व्यक्तीत या दोन्ही शक्ती अंतर्भूत आहे, जी प्रबळ ठरते ती व्यक्त होते. दुर्बळ शक्ती मागे हटते. प्रबळ होण्यासाठी वैचारिक प्रगल्भता, स्वेच्छा, सभोवतालचे वातावरण अशा गोष्टींचा परिणाम होतोच.
बहिणाबाई चौधरी या निरक्षर कवयित्रीने माणसाच्या स्वभावाचे किती व्यापक आणि खोलवर चिंतन केले आहे, याचा प्रत्यय आपल्याला येतो. अरे माणसा, माणसा...कधी होशील माणूस हा त्यांचा सवाल मार्मिक आणि तेवढाच विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे.

Web Title: Gentlemen, the villain ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.