व्यसनमुक्तीचा ‘धडा’ गिरवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 05:19 AM2017-11-07T05:19:23+5:302017-11-07T05:19:31+5:30
विद्यार्थ्यांना व्यसन जडायला हवे पण ते भरपूर शिकण्याचे, शिक्षणातून स्वत:चे भवितव्य घडविण्याचे, परंतु दुर्दैवाने आज अनेक विद्यार्थी धूम्रपानाच्या धुरात आपल्या उज्ज्वल भवितव्याची राख होत आहे.
विद्यार्थ्यांना व्यसन जडायला हवे पण ते भरपूर शिकण्याचे, शिक्षणातून स्वत:चे भवितव्य घडविण्याचे, परंतु दुर्दैवाने आज अनेक विद्यार्थी धूम्रपानाच्या धुरात आपल्या उज्ज्वल भवितव्याची राख होत आहे. एका सर्वेक्षणानुसार मुंबईच्या पालिका शाळांतील २७ टक्के विद्यार्थी हे धूम्रपानाच्या आहारी गेले आहेत. वाढत चाललेल्या कर्करोग रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. बदलती जीवनशैली, नात्यांमध्ये अंतर, पालकांनी मुलांकडे केलेले दुर्लक्ष, अतिस्वातंत्र्य किंवा मुलांचे टोकाचे लाड, घरातील मोठ्यांनी मुलांसमोरच व्यसन करणे, आर्थिक दुर्बलता, व्यसनाच्या नशेत वडिलांकडून आईला होणारी मारहाण, अभ्यास जमत नाही किंवा नापास झाल्यामुळे, कमी गुण मिळत असल्याने आलेला तणाव, अशी अनेक कारणे मुलांना व्यसनाच्या जाळ्यात ओढण्यास कारणीभूत ठरत आहेत. चित्रपटातील तारे-तारका, त्यांचे वागणे, बोलणे याचे अनुकरण मुले करत असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, २००८ सालापासून देशभरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे, परंतु या नियमाची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. शाळेपासून १०० मीटरच्या आवारात पानाच्या टपºयांना परवानगी न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, पण याचेही सर्रास उल्लंघन होताना दिसते. पालिका शाळांतील मुलांमध्ये वाढत्या धूम्रपानासंदर्भात मुंबईतील माझगाव विभागातील खासगी रुग्णालयाने, मुंबईतल्या ३० शाळांमध्ये केलेल्या या सर्वेक्षणातील आणखी एक मुद्दा गांभीर्याने विचार करायला लावणारा आहे. तो म्हणजे, जी मुले धूम्रपानाच्या आहारी गेली आहेत, त्यांचे वय कोवळे आहे. पाचवी ते नववीत शिकणारी ही मुले आहेत. याचाच अर्थ, आता मुलांमध्ये व्यसन जडण्याचे वय १८, १६ वर्षांवरून ९ ते १२ वर्षांपर्यंत आले आहे. ही मुले मधल्या सुटीमध्ये किंवा शाळा सुटल्यानंतर सिगारेट ओढतात. मुलींनाही हे व्यसन जडले आहे. ही धोक्याची घंटा आहे. व्यसनांच्या दुष्परिणामांचे धडे घर, शाळा, समाज अशा सर्व स्तरांतून मुलांना गिरवायला लावायलाच हवेत. सिगारेट ओढण्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना ही सवय लागण्याच्या अगोदर त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवेत. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाºयांवर कठोरपणे कारवाई करायला हवी. शाळांच्या आसपास पानाच्या टपºया नाहीत, याकडे लक्ष द्यायला हवे, शिवाय शिक्षक, वडील, नातेवाईक यांनी आधी आपल्या व्यसनांवर नियंत्रण मिळवायला हवे, तेच जर धूम्रपान करीत असतील, तर धूम्रपान आरोग्यास अपायकारक आहे, हे ते कोणत्या तोंडाने मुलांना सांगणार आणि जरी त्यांनी हे मुलांना सांगितलेच, तरी त्यांना ते कसे पटणार? म्हणूनच मुलांमधील हे व्यसन सोडविण्यासाठी आधी आपण बदलायला हवे.