मंथनातून ‘अमृत’ यावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 07:09 PM2020-02-01T19:09:42+5:302020-02-01T19:10:10+5:30

मिलिंद कुलकर्णी पुराणात समुद्रमंथनाची कथा आहे. मंथनातून निघणारे अमृत देवांनी तर विष राक्षसांनी प्राशन केले होते. सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्तीचे ...

Get 'nectar' from churning! | मंथनातून ‘अमृत’ यावे!

मंथनातून ‘अमृत’ यावे!

Next

मिलिंद कुलकर्णी
पुराणात समुद्रमंथनाची कथा आहे. मंथनातून निघणारे अमृत देवांनी तर विष राक्षसांनी प्राशन केले होते. सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्तीचे निदर्शक म्हणून देव आणि दानवांना ओळखले जाते. लहानपणी ‘विषामृत’ हा खेळ खेळला जात असे. त्याची आठवण येण्याचे कारण म्हणजे जळगाव शहरातील ‘अमृत पाणीपुरवठा योजने’वरुन असेच समुद्रमंथन सध्या सुरु आहे.
केंद्र सरकार, राज्य सरकार व महापालिका यांचा सहभाग असलेली अमृत पाणीपुरवठा योजना गेल्या दोन वर्षांपासून शहरात राबवली जात आहे. मुदतीच्या आत ती पूर्ण झाली नाही आणि मुदतवाढ देण्यापूर्वी आकारलेला दंड मक्तेदार जैन इरिगेशन यांना मान्य नाही, असे त्रांगडे आहे. त्यालाही दोन महिने उलटले. परंतु, भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या ‘सुपारी’च्या आरोपावरुन अपेक्षेप्रमाणे गदारोळ उडाला.
महापालिका निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या; मात्र विधानसभा निवडणुकीत तब्बल ४७ हजार मते मिळविल्याने उत्साहित झालेल्या राष्टÑवादी काँग्रेस पक्षाने भाजपविरोधात लगेच शड्डू ठोकले. एका गटाने आमदारांच्या प्रतिमेला ‘बेलफूल’ वाहण्याचे प्रतिकात्मक आंदोलन केले. तर दुसऱ्या गटाने पत्रकार परिषद घेऊन आमदारांच्या राजीनाम्याची मागणी केली. भाजपचे नव्याने महानगर जिल्हाध्यक्ष झालेले दीपक सूर्यवंशी हे आमदारांच्या बचावासाठी पुढे आले आणि त्यांनी राष्टÑवादीला प्रतिटोला हाणला. जळगावकरांनी नाकारलेल्या पक्षाने विनाकारण वादात पडू नये, असा सल्ला दिला.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेच्या सदस्यांनीही आमदार आणि भाजपची खिल्ली उडवली.
मक्तेदार जैन इरिगेशननेही आपली भूमिका मांडत, हा तिढा सोडविण्यासाठी सर्व संबंधितांची एकत्रित बैठक बोलाविण्याची मागणी केली. ही योजना पूर्ण करण्याची इच्छा असल्याचा मनोदय देखील व्यक्त केला.
आमदारांच्या विधानानंतर हे सगळे मंथन झाले. जळगावकरांच्या हाती काय आले, अमृत की विष ? या प्रश्नाकडे राजकारणाच्या पलिकडे जाऊन पहाण्याची आवश्यकता आहे. शेजारील धुळे जिल्ह्यातील पाणी योजना पाच-सहा वर्षांनंतरही वादामुळे पूर्ण होऊ शकलेली नाही. तसे जळगावात होऊ नये, यासाठी सर्व संबंधितांनी पुढे यायला हवे. चर्चेतून मार्ग काढायला हवा. अन्यथा भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही. कारण जवळ असलेले वाघूर धरण यंदा ओसंडून वाहत आहे. जलसाठा चांगला असतानाही सध्या महापालिका नागरिकांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहे. पाईपलाईन फुटल्याने येणारा व्यत्यय हा वेगळाच आहे. पाणीपुरवठ्याची योजना जुनी झाल्याने एकाचवेळी संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणे महापालिकेला शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर अमृत पाणी योजना पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही योजना लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.
गेल्या पाच-दहा वर्षांत जळगावचा विकास खुंटलेला आहे, त्याला कारणीभूत पक्षीय राजकारण, एकमेकांचे पाय ओढण्याची वृत्ती, श्रेयासाठी चढाओढ, अभ्यासूपणा आणि कर्तव्यतत्परतेचा अभाव, व्यापक विचारापेक्षा तात्कालिक फायद्यासाठी संकुचित भूमिका हे घटक आहेत. घरकूल खटल्याचा निकाल लागला, परंतु, अपूर्णावस्थेत असलेली घरकुले पूर्ण व्हावी, यासाठी ना आमदार प्रयत्न करीत आहे, ना महापौर करीत आहे. शिवाजीनगर, पिंप्राळा, असोदा या उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे कायम आहे. राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरण संथ गतीने सुरु आहे. विमानतळावर नाईट लॅडिंगची सुविधा झाली असली तरी विमानसेवा रडतखडत सुरु आहे. प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
औद्योगिक विकास ठप्प झाला आहे. मंदीमुळे उद्योगांचा अस्तित्वासाठी संघर्ष सुरु असताना नव्या उद्योगांसाठी प्रोत्साहनपर वातावरण व अर्थसहाय्य, जागेची उपलब्धता यासंबंधी निर्णय होताना दिसत नाही. दहावी, बारावीनंतर मुले शिक्षणासाठी मुंबई, पुणे तर पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात जात आहेत. हे बदलवण्यासाठी पक्षभेद विसरुन प्रयत्नांची आवश्यकता आहे.
अमृत पाणीयोजनेचा विषय सोडविण्यासाठी शिवसेनेने पाणीपुरवठा मंत्री गुुलाबराव पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालून हा प्रश्न मार्गी लावायला हवा. राष्टÑवादीने अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करुन निधी कसा उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करायला हवे. जळगावकरांसाठी या मंथनातून अमृत निघावे, हीच अपेक्षा आहे.

Web Title: Get 'nectar' from churning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.