सज्ज व्हा, पण...

By admin | Published: May 9, 2016 02:52 AM2016-05-09T02:52:02+5:302016-05-09T02:52:02+5:30

कोणाचे काहीही होऊ द्या त्याच्याशी आपले काहीही देणे-घेणे नाही याच अविर्भावात बहुतांशी राजकीय पक्ष आणि त्यांची नेतेमंडळी वागत असतात. परिस्थितीनुरूप निर्णय घेणे

Get ready, but ... | सज्ज व्हा, पण...

सज्ज व्हा, पण...

Next

कोणाचे काहीही होऊ द्या त्याच्याशी आपले काहीही देणे-घेणे नाही याच अविर्भावात बहुतांशी राजकीय पक्ष आणि त्यांची नेतेमंडळी वागत असतात. परिस्थितीनुरूप निर्णय घेणे वा तसे पाऊल उचलणे हे सगळ्यांनाच जमते असेही नाही, पण जो काळासोबत चालतो तोच यशस्वी होत असतो आणि जनतेच्या मनातही त्याच्याविषयीच जागा तयार होत असते. राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे, त्यासोबतच पाणीटंचाईचा प्रश्न गहन झालेला आहे. दुष्काळाच्या वेदना सहन न झाल्याने एक-दोन दिवसाआड शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचे सत्र सुरू आहे. हंडाभर पाण्यासाठी माणसा-माणसांत वैर निर्माण होत आहे. अशा मन सुन्न करणाऱ्या वातावरणात केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे; तर सर्वसामान्य माणसांना धीर देण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी काही सकारात्मक योजना राबविण्याची गरज आहे. पाणी नसलेल्या भागातील नागरिकांची तहान कशी भागेल याचा विचार होणे गरजेचे आहे. अपवाद वगळता ज्या तुलनेत हे प्रयत्न व्हायला हवेत तसे न होता राजकारणी मंडळी आपली सिंहासने कशी शाबूत राहतील याचीच चिंता बाळगताना दिसत आहे. लोणावळा येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक नुकतीच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पार पडली. ‘अनेक विकासयोजना राबविल्याने भाजपाबद्दल लोकांचे चांगले मत आहे, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणूकांसाठी सज्ज व्हा’ असे आवाहन दानवे यांनी केले. हा झाला त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक भाग, पण अशाप्रकारचे आवाहन करतानाच राज्यातील दुष्काळग्रस्त भागांसाठी आणि पाणीटंचाई असलेल्या भागासाठी त्या-त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी तातडीने काही योजना राबवाव्यात असे फर्मानही सोडले असते, तर दानवे आणि त्यांच्या पक्षाविषयी एक आस्थेचा संदेश जनतेपर्यंत पोहचला असता. पण तसे न करता केवळ निवडणूक सज्जतेचा संदेश देणे म्हणजे रोम जळत असताना फिडल वाजविण्यासारखा प्रकार म्हणायला हवा.

 

Web Title: Get ready, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.