खड्ड्यांचे विघ्न दूर होवो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 01:20 AM2018-08-02T01:20:53+5:302018-08-02T01:21:17+5:30
अंदाजे चार वर्षे झाली असतील, उच्च न्यायालय खड्ड्यांविषयी महापालिका व राज्य शासनाचा कान वारंवार पिरगळत आहे़ एवढ्या वर्षांत एखादा कैदी सुधारला असता किंवा गंभीर आजार बराही झाला असता;
अंदाजे चार वर्षे झाली असतील, उच्च न्यायालय खड्ड्यांविषयी महापालिका व राज्य शासनाचा कान वारंवार पिरगळत आहे़ एवढ्या वर्षांत एखादा कैदी सुधारला असता किंवा गंभीर आजार बराही झाला असता; पण निगरगट्ट राजकारणी, सनदी अधिकारी व कंत्राटदार मात्र वारंवार टीका होऊनही सुधारायचे नाव घेत नाहीत, असे चित्र तूर्तास आहे़ कारण या चार वर्षांत ना खड्डे कमी झालेत, ना खड्ड्याने बळी जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे़ आता न्यायालयाने मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्यावरून शासनाला फटकारले आहे़ आम्हाला एक महिन्याची मुदत द्या, गणेशोत्सवाआधी महामार्गावरील खड्डे बुजविले जातील, अशी हमी शासनाने न्यायालयात दिली आहे़ त्यामुळे गणेशोत्सवास कोकणात जाणाºया चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल, अशी तूर्त अपेक्षा करायला हवी़ मात्र खड्ड्यांविषयी महापालिका व प्रशासन कधी गंभीर होणार हा संशोधनाचा विषय आहे़ खड्ड्यांमुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची प्रतिमा राज्यात व देशात मलिन होते़ मात्र डागाळलेल्या प्रतिमेचे कोणालाच सोयरसुतक दिसत नाही़ भ्रष्ट यंत्रणेची साखळी शेवटपर्यंत पोहोचली असल्याने त्याविषयी कोणालाच काहीही वाटत नाही़ राजकीय पाठबळ हा तर सर्वत्र चर्चेचा विषय आहे़ खड्ड्यांविषयी कंत्राट मिळविण्याचा मुद्दा उच्च न्यायालयात गेला तरी अधिकारी व राजकारण्यांच्या मर्जीतल्या कंत्राटदारालाच कंत्राट कसे मिळेल, याची पूर्ण व्यवस्था केली जाते़ मग कंत्राटदार दर्जेदार काम करतो का अथवा दर्जेदार साहित्य वापरतो का, हा विषय गौण ठरतो़ ही कार्यप्रणाली आता सुधारायला हवी़ परदेशातील शहरे कशी सुंदर आहेत़ तेथे कचरा प्रश्न कसा हाताळला जातो़ तेथील कार्यपद्धती कशी आहे, याचा अभ्यास करायला अधिकारी व राज्यकर्ते नागरिकांच्या पैशातून विदेशवारी करतात़ त्यातून आतापर्यंत काय निष्पन्न झाले, हेही तपासायला हवे़ खड्ड्यांच्या तक्रारींसाठी महापालिकेने विशेष अॅप तयार केले आहे़ मात्र या अॅपवर तक्रारी येण्याचे प्रमाण तसे कमीच आहे़ याचा अर्थ मुंबईकरांनाही जणू खात्री झाली आहे, की तक्रार करूनही खड्डे कायमचे बुजविले जाणार नाहीतच़ खड्डे बुजविण्यासाठी दर्जाहीन साहित्य वापरले गेल्याने रस्ते पुन्हा खराब होणार, याचीही सामान्यांना अगदी सखोल माहिती असते़ अलीकडे खड्ड्यांचा विषय कोणासाठी पैसे कमविण्याचे उत्तम साधन बनला आहे, तर कोणासाठी राजकारण करण्याचा मुद्दा़ यात भरडला जातोय तो सर्वसामान्य मुंबईकऱ या मुंबईकराला न्यायालयावाचून कोणाचाच आधार राहिलेला नाही़ कारण सध्या प्रत्येक परिवर्तन हे न्यायालयाच्या आदेशानेच होते़ न्यायालय खड्ड्यांविषयी गंभीर असल्याने या वर्षीचा गणेशोत्सवाचा प्रवास सुखाचा होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही़ विघ्नहर्ता गणेश या साºया यंत्रणांना सुबुद्धी देवो.