लसवंत व्हा मुलांनो... लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 09:00 AM2021-12-27T09:00:34+5:302021-12-27T09:00:56+5:30

Corona Vaccination : पंतप्रधानांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचा लेखाजोखा देशापुढे मांडला, हे बरे झाले. कारण, दुसऱ्या लाटेवेळी आपली यंत्रणा, केंद्र व राज्यांमधील सरकारे गाफील राहिली.

Get vaccinated children ... Emergency use of vaccines for children between the ages of 12 and 18 | लसवंत व्हा मुलांनो... लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी

लसवंत व्हा मुलांनो... लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी

Next

वर्षातील अखेरची मन की बात प्रसारित होण्याआधी केवळ दहा तास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री आपण देशाला संबोधित करणार असल्याचे जाहीर केले. तेव्हा बहुतेकांना अंदाज होताच की, ओमायक्रॉन या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटसंदर्भात काहीतरी महत्त्वाची घोषणा होईल. कारण, त्याच्या तासाभराआधीच देशाच्या औषध महानियंत्रकांनी १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्याची बातमी आली होती.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याच्या आधीच सभा, मेळावे, सरकारी व राजकीय कार्यक्रमांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे सर्रास उल्लंघन देश अनुभवतो आहे. ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या चारशेच्या घरात जाताच नाताळ व नववर्ष स्वागतावेळी होणाऱ्या गर्दीला आवर घालण्यासाठी अनेक राज्यांनी रात्रीच्या व्यवहारांवर नव्याने निर्बंध घातले आहेत. तरीदेखील अन्य काही देशांप्रमाणेच महिनाभरात भारतात गंभीर परिस्थिती उद्भवू शकते, अशी भीती आहेच.

जनतेला दिलासा देण्याची गरज ओळखून पंतप्रधानांनी येत्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि १० जानेवारीपासून मधुमेह, उच्च रक्तदाब वगैरे सहव्याधी असलेल्या साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी तसेच  फ्रंटलाईन वर्कर्सना दक्षता म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस देण्यात येईल, अशी घोषणा केली. एकशे चाळीस कोटींच्या आपल्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात हे सर्व घटक मिळून जवळपास २५ कोटी लोकांना या लसीकरणाचा लाभ मिळेल.

१५ ते १८ वर्षे गटाची लोकसंख्या दहा कोटींच्या आसपास आहे. ६० वर्षांवरील १२ कोटी ४ लाख लोकांना आतापर्यंत किमान एक मात्रा दिली गेली आहे व त्यापैकी ९ कोटी २१ लाखांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. अशाचप्रकारे १ कोटी ३ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना किमान पहिली व त्यातील ९६ लाखांना दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. किमान एक मात्रा घेतलेल्या फ्रंटलाईन वर्कर्सची संख्या १ कोटी ८३ लाख आहे, तर त्यातील १ कोटी ६८ लाख जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यंदाच्या वर्षाच्या प्रारंभी १६ जानेवारीला भारतात लसीकरणाला सुरुवात झाली व आतापर्यंत १४१ कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

५७ कोटी ७० लाख म्हणजे पात्र लोकसंख्येच्या ४१.८ टक्के लोकांना दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. जगातील अन्य देशांशी तुलना करता हे प्रमाण कमी आहे खरे. परंतु, त्याची कारणे मुळात उशिरा लसीकरणाला सुरुवात, लस उत्पादक कंपन्या आधीच्या पुरवठ्याला बांधील असणे, परिणामी लसींचा तुटवडा आदी आहेत. त्याच्या खोलात न जाता  नव्या वयोगटाला लस देण्याच्या आणि संवेदनशील घटकांना दक्षता मात्रा देण्याच्या सरकारच्या घोषणेचे स्वागत करायला हवे. कदाचित लवकरच १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांनाही लसीकरणाची घोषणा केली जाईल व शाळा उघडल्या जात असल्यामुळे पालकांच्या मनात निर्माण झालेली चिंता दूर होण्यास मदत होईल.

यासोबतच पंतप्रधानांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचा लेखाजोखा देशापुढे मांडला, हे बरे झाले. कारण, दुसऱ्या लाटेवेळी आपली यंत्रणा, केंद्र व राज्यांमधील सरकारे गाफील राहिली. धोका ओळखण्यात आपण कमी पडलो. लाट येताच भांबावून गेलो. परिणामी लाखो लोकांचे जीव गेले. इस्पितळांमध्ये पुरेसे बेड नसल्याने,  ऑक्सिजनअभावी माणसे तडफडून मेल्याचे पाहणे नशिबी आले. या पृष्ठभूमीवर, आता देशात विलगीकरणात वापरण्यासाठी अठरा लाख खाटा, पाच लाख ऑक्सिजन पुरवठायुक्त खाटा, अतिदक्षता विभागांमध्ये एक लाख चाळीस हजार खाटा, तसेच आता केवळ लहान मुलांनाच लसीकरणाचे कवच लाभणे बाकी असल्याने त्यांच्यासाठी साधारण व अतिदक्षता मिळून नव्वद हजार खाटांची सज्जता महत्त्वाची आहे.

याशिवाय ऑक्सिजनचे चार लाख सिलिंडर सज्ज आहेत आणि विषाणू संक्रमणाच्या महासंकटात माणसांचे प्राण वाचविणारा प्राणवायू उपलब्ध करणाऱ्या यंत्रांचे तीन हजार युनिट उपलब्ध आहेत, हे  महत्त्वाचे. हे सगळे पाहता जवळपास पावणेदोन वर्षे महामारीच्या तणावात काढलेल्या सामान्यांची चिंता कमी होईल. विनाकारण घाबरून जाण्याची गरज राहणार नाही. घराबाहेर पडले की तोंडाला मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, गरज नसताना गर्दीत न मिसळणे, एवढी दक्षता घेतली तर चार दिवसांवर आलेल्या नव्या वर्षात आपले जगणे अधिक सुसह्य होईल.

Web Title: Get vaccinated children ... Emergency use of vaccines for children between the ages of 12 and 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.