भुतामुखी ब्रह्मज्ञान

By Admin | Published: October 14, 2015 10:22 PM2015-10-14T22:22:14+5:302015-10-14T22:22:14+5:30

भारतात आणि खरे तर मुंबई शहरात गेल्या आठवडाभरात ज्या दोन अप्रिय घटना घडल्या, त्यांच्यामुळे पाकिस्तान सरकारचे ‘कनवाळू’ मन फारच व्यथित झालेले दिसते.

Ghostly omnipresence | भुतामुखी ब्रह्मज्ञान

भुतामुखी ब्रह्मज्ञान

googlenewsNext

भारतात आणि खरे तर मुंबई शहरात गेल्या आठवडाभरात ज्या दोन अप्रिय घटना घडल्या, त्यांच्यामुळे पाकिस्तान सरकारचे ‘कनवाळू’ मन फारच व्यथित झालेले दिसते. आधी पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करणे संबंधित आयोजकांना भाग पडले आणि नंतर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमुद कसुरी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याआधी सदर सोहळ्याचे मुंबईतील यजमान सुधीन्द्र कुळकर्णी यांच्या तोंडाला काळे फासले गेले. प्रकाशन समारंभ मात्र पोलिसांच्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडला. पण दोन्ही कार्यक्रमांना जे गालबोट लागले त्याबद्दल पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने तीव्र चिंता व्यक्त करुन असा प्रकार पुन्हा होऊ नये अशी आशाही व्यक्त केली आहे. एकप्रकारे पाकिस्तानने भारताला सद्वर्तनाची, सहिष्णुतेची आणि संयमाची शिकवण देण्याचाच प्रयत्न केला आहे. जो देश आणि ज्या देशाचे सरकार प्रत्येक भारतीय वस्तुला पाकिस्तानात निषिद्ध मानते, त्या देशाने असे काही म्हणण्याचे धाडस करणे यालाच भुतामुखी ब्रह्मज्ञान म्हणायचे. अर्थात भारतीय परराष्ट्र विभागाने आपल्या शेजाऱ्याच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन त्याला प्रत्युत्तर देताना, सीमेपलीकडून घुसखोरी करणारे दहशतवादी आणि सीमेवर होणाऱ्या अतिरेकी कारवाया हाच भारताच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असून जोवर पाकिस्तान त्याला आळा घालीत नाही तोवर उभय देशांदरम्यान शांततेची चर्चा सुरुही होऊ शकत नाही असे म्हटले आहे. पण यात हेदेखील तितकेच खरे की मुंबईत झालेल्या प्रकारांवरुन पाकिस्तानला नाक वर करुन बोलण्याची संधी शिवसेनेने म्हणजे भारतानेच दिली आहे. सेनेने आजवर अनेक पाकी कलाकारांना विरोध केला असला तरी ज्या कलाकारांनी वा त्यांच्या येथील प्रायोजकांनी मातोश्रीपुढे गुळ-खोबरे ठेऊन उदबत्त्या पेटवल्या त्यांचे कार्यक्रम निर्वेध पार पडले आहेत. यात सिनेमे आहेत मालिका आहेत आणि बिग बॉससारखे रिअ‍ॅलिटी शोदेखील आहेत. अखेर राष्ट्रभक्तीदेखील ज्याच्या त्याच्या घराच्या उंबऱ्यापासूनच सुरु होत असते!

Web Title: Ghostly omnipresence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.