सोशल मीडियाचे भूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 03:12 AM2017-11-04T03:12:51+5:302017-11-04T03:13:03+5:30
काही वर्षांत सर्वसामान्यांच्या हातांमध्ये सहजपणे मोबाईल आले आणि इंटरनेट अतिशय स्वस्त झाले. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा माध्यमांतून लोक स्वत:हून व्यक्त होत आहेत.
काही वर्षांत सर्वसामान्यांच्या हातांमध्ये सहजपणे मोबाईल आले आणि इंटरनेट अतिशय स्वस्त झाले. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा माध्यमांतून लोक स्वत:हून व्यक्त होत आहेत. एकेकाळी प्रसार माध्यमेच लोकांशी संवाद साधत. पण सोशल मीडियाद्वारे प्रत्येक जण इतरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असतो. भाजपाने २0१४ साली याच माध्यमांचा चाणाक्षपणे वापर करून, काँग्रेसविरोधी वातावरण तयार केले आणि त्यात यशही आले. आता काँग्रेस पक्षही पूर्ण ताकदीनिशी सोशल मीडियात उतरला असून, तो भाजपाविरोधी वातावरण तयार करू पाहत आहे. त्यामुळेच अस्वस्थ झालेले भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका, असे सांगण्याची वेळ आली. हे माध्यम कधी कुणाला साथ देईल आणि कुणाला गाळात घालेल, हे सांगता येत नाही. राजकीय पक्षांचा मुद्दा बाजूला ठेवला तरी या सोशल मीडियाने अनेकांना वेडे केले, ही वस्तुस्थिती आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक जण त्यावर कुणी काय मजकूर टाकला आहे, हे पाहत असतात. आपल्याला आवडलेला, कुणाची प्रशंसा करणारा, प्रसंगी आपणास न आवडणाºया व्यक्तीची बदनामी करणारा मजकूर दुसºयांना वा ग्रुपवर टाकत असतात. तसे करताना शंभरपैकी नव्याण्णव टक्के लोक त्याची सत्यासत्यताही तपासत नाही. त्यामुळेच एड्स, कॅन्सरवर इलाज, वडापाव खाल्ल्याने एड्सची लागण होण्याची शक्यता असा मजकूर नामवंत डॉक्टरांच्या नावाने खपवला जातो. खोटानाटा मजकूर सरसकट पसरवला जातो. त्यातून तणाव निर्माण होऊ शकतो, भावना दुखावू शकतात, धार्मिक विद्वेष वाढू शकतो, बदनामी होते, याचाही विचार होत नाही. आपल्या अंगणातील कचरा दुसºयाच्या अंगणात टाकून देण्याचाच हा प्रकार. हा बेजबाबदारपणा आहे. उत्तर प्रदेशात अशा दोन घटना घडल्या. एकाने पंतप्रधान मोदी यांच्या ‘अच्छे दिन’ची टवाळी करणारी चित्रफित व्हॉट्सअॅपवर टाकली. दुसºयाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर तो सामनाच फिक्स होता आणि स्वत:च्या पराभवासाठी भारतीय संघाने पैसे घेतले, असा मजकूर टाकला. असा मजकूर टाकणे अतिशय गैर आहे. पण पोलिसांनी या प्रकरणांत खूप घाई केली. क्रिकेटचा सामना फिक्स असल्याचा मजकूर टाकणाºयावर पोलिसांनी देशद्रोहाचा व धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करून तुरुंगात डांबले. मोदींवर भाष्य करणाºयावरही गुन्हा दाखल केला. राजकीय नेत्यांवरील टीका वा टवाळीकडे पोलीस बदनामी म्हणून पाहणार असतील, तर काँग्रेस, राहुल गांधी, सोनिया गांधी यांना देशद्रोही म्हणवणाºयांवर कारवाई केल्याचे एकही उदाहरण दिसत नाही. काहींवरील टीका मान्य आणि काहींवरील अमान्य अशी दुहेरी भूमिका चुकीची आहे. पोलीस नेहमीच राजकीय नेतृत्वाच्या कलेने चालतात. ‘साहेब’ सांगतील, तसे वागतात. कित्येकदा साहेबाने न सांगताही त्यांची परस्पर सेन्सॉरशिप सुरू होते. या प्रकरणातील दोघे न्यायालयात निर्दोष सुटतीलही. पण तोपर्यंत मनस्ताप तर नशिबी आलाच. म्हणूनच आपल्या मानगुटीवर बसलेले सोशल मीडियाचे भूत आपण स्वत:हूनच खाली उतरवायला हवे. ते काम इतर कुणी करणार नाही. त्यासाठी आपल्याकडे आलेला मजकूर पुढे सरकवताना त्याची सत्यासत्यता पडताळून पाहायलाच हवी. अन्यथा अशा प्रकरणांत निष्कारण त्रास होऊ शकेल. मुळात व्यक्त होण्याच्या या माध्यमावर बंधने असू नयेत. पण त्याबरोबरच आपण स्वत:वर बंधने घालून न घेतल्यास सोशल मीडियाचे भूत उच्छाद घातल्याशिवाय राहणार नाही.