देवाक्षरांची देणगी! कॅनव्हासवर अक्षरांची किमया उमटविणारा अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 03:20 AM2017-10-01T03:20:18+5:302017-10-01T03:20:22+5:30

‘अ आ इ..’ ही अक्षरे गिरविताना भविष्यात याच अक्षरांच्या दुनियेत रममाण होईन याची कल्पना नसलेल्या अवलिया कलाकाराने एका वैशिष्ट्यपूर्ण कलेची कास धरली आहे.

Gift of the Lies! Avalia is the prototype of the characters on the canvas | देवाक्षरांची देणगी! कॅनव्हासवर अक्षरांची किमया उमटविणारा अवलिया

देवाक्षरांची देणगी! कॅनव्हासवर अक्षरांची किमया उमटविणारा अवलिया

Next

- स्नेहा मोरे

‘अ आ इ..’ ही अक्षरे गिरविताना भविष्यात याच अक्षरांच्या दुनियेत रममाण होईन याची कल्पना नसलेल्या अवलिया कलाकाराने एका वैशिष्ट्यपूर्ण कलेची कास धरली आहे. अक्षरांना विविध डिझाइन्सचा साज चढविणारे जैन कमल हे आता याच अक्षरांना ‘देवत्व’ देत आहेत. दिवसभर चिंतन करून करून त्यानंतर रात्रभर कॅनव्हासवर अक्षरांची किमया उमटविणा-या या कलाकृतींच्या काही सर्जनशील नवकलाकृती रसिकांच्या भेटीला येत आहेत. १ ते १४ आॅक्टोबर या कालावधीत मुंबईच्या कुलाबा येथील ताज महाल पॅलेसच्या कलादालनात ‘नमोअरिहंताणं’ हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ८ या वेळेत रसिकांसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

विविध वृत्तपत्रांच्या संपादकीय विभागात काम करून अक्षरांच्या दुनियेत लिलया वावरणारे जैन कमल आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून अक्षरांना ‘देवत्व’ देत आहेत. वृत्तपत्रसृष्टीत ५०हून अधिक वर्षे काम करण्याचा अनुभव असलेल्या जैन यांनी स्वत:ची ‘अक्षरलिपी’ शैली विकसित केलेली आहे. आजही आघाडीच्या मासिक आणि वृत्तपत्र समूहांमध्ये वापरण्यात येणारे फॉन्ट्स, त्यांतील डिझाइन्स आणि मासहेड्सचे डिझाइन्स ही जैन यांनी केलेली आहेत. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत अशा एक ना अनेक भाषांतील मंत्रांच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या कलाकृती या आता सकारात्मक ऊर्जेसाठी घराघरांत आणि कार्यालयात वापरल्या जाव्यात असा मानस जैन कमल यांनी व्यक्त केला.
वाराणसी येथील बनारस विश्व हिंदू विद्यापीठातून त्यांनी टायपोग्राफी आणि डिझाइनचे शिक्षण घेतले. त्यानंतर तब्बल ३०हून अधिक वर्षे त्यांनी या क्षेत्रात मुशाफिरी केली. वृत्तपत्र समूहांमध्ये काम केल्यानंतर आता ‘अक्षरब्रह्म’ची संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. शब्द आणि त्यांचे प्रकटीकरण ज्या भाषेतून होते ती भाषा ही जणू आपल्या शरीरातील रक्तच आहे, अशी ही जैन कमल यांची समजूत आहे. वेगवेगळ्या भाषांच्या माध्यमातून आपल्या लिपीचा वैशिष्ट्यपूर्ण असा ठसा उमटेल याचे चिंतन त्यांच्या मनात कायम सुरू असते. अक्षरांद्वारे वेगवेगळ्या भाषेचा जनधर्म साकार करण्याचा विशेष प्रयत्न त्यांनी आपल्या टायपोग्राफिक चित्रशैलीद्वारे केला आहे. हे सर्व साकारण्यासाठी जवळपास आठ वर्षे जनधर्माच्या चित्रपद्धतीचा अभ्यास केला आहे. आपण सध्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून आज जी अक्षरे टाइप करतो याद्वारे विश्वसंस्कृतीत परिवर्तन घडू शकते असा विश्वास जैन यांना आहे.
‘स्वस्तिक’, ‘ओम’ या भारतीय संस्कृतीच्या प्रतीकांच्या माध्यमातून त्यांनी सर्जनशील कलात्मक निर्मिती केली आहे. आपल्या कलाकृतींद्वारे या प्रतीकांत ‘नमोकार मंत्रा’चा समावेश केला आहे. त्यामुळे या कलाकृतींना एक वेगळ्या प्रकारची आध्यात्म अनुभूती प्राप्त झाल्याची माहिती जैन यांनी दिली. अशा प्रकारे दिवसा चिंतन करून रात्री या कलाकृतींना ‘जन्म’ देणे हाच जणू त्यांचा दिनक्रम झाला आहे. याप्रमाणेच, भगवान महावीरांच्या शरीरातील वेगवेगळ्या सांकेतिक परिभाषांचा वापर ते विविध लिपींमध्ये करतात. टायपोग्राफीतील शब्दांची त्यामागील अर्थाची भावना चित्राद्वारे ते आपल्या विशेष पद्धतीने अभिव्यक्त करतात. अशा भावना अनेक जैन मुनींनी व्यक्त केल्याचेही जैन कमल यांनी आवर्जून सांगितले.
जैन धर्मात २४ तीर्थंकर आहेत. त्यांचा आदर्श जतन करून जैन कमल यांनी आपल्या अक्षर शिल्पांच्या आधारे विश्वसंस्कृतीचे दर्शन घडवून आणण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या कलाकृतींतील प्रत्येक ‘स्ट्रोक’मधून त्याची परिणती आल्याशिवाय राहत नाही. जैन कमल यांच्या अभ्यासानुसार, ख्रिस्तजन्मापूर्वी जवळपास ३ हजार वर्षांपूर्वी जैनलिपी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांची ही वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन ‘अक्षरलिपी’ भारताची आंतरराष्ट्रीय कॅनव्हासला देणगी असल्याची समाधानकारक भावना जैन यांनी व्यक्त केली.
प्रसिद्ध संपादक बेहराम कॉन्ट्रॅक्टर यांच्यासह कामाच्या अनुभवातून जैन कमल यांनी इंग्रजी अक्षरांच्या ओव्हरलॅपिंगची एक वेगळी स्वतंत्र अक्षररेखा उदयास आणली. त्याविषयी मराठी भाषेतही प्रयोग केले. जैन कमल यांच्या एका कलाकृतीत गर्भावस्थेतील महिलेच्या गर्भात विविध चिन्हे रेखाटण्यात आली आहेत. या कलाकृतीकडे पाहताना जणू गर्भातील बालक हे अक्षरांच्या दुनियेतील ध्वनी अभिव्यक्त करीत असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे, काळाच्या ओघात कमी होणारे वृत्तपत्रांचे वाचन या मुद्द्याकडे लक्ष वेधताना जैन कमल यांनी अक्षरमाध्यमांतील रंगीत कागदांवर ओव्हरलॅप पद्धतीने अक्षरांचे पेंटिग्स केले आहे. ‘नमोकार मंत्र’ हा शांततेचा संदेश देणार आहे. या मंत्राची कलेशी सांगड घालत जागतिक शांततेसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जैन कमल यांनी आवर्जून सांगितले. नमोकार मंत्र कोणत्याही धर्मापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण जगाला प्रेम आणि शांतीचा संदेश देतो. त्यामुळे तो मंत्र कोणत्याही ठरावीक धर्मग्रंथातून तयार करण्यात आलेला नसून माझ्या भावविश्वातून त्याचा जन्म झाल्याचे जैन कमल यांनी सांगितले. याच नमोकार मंत्रावर आधारित मंत्राज् फॉर वर्ल्ड पीस, सर्कल आॅफ मंत्राज्, बर्थ आॅफ मंत्राज्, सर्कल आॅफ स्वस्तिक या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती रसिकांचे लक्ष आवर्जून वेधून घेतात.
जैन यांनी अक्षरांशी निर्माण केलेले नाते अद्वितीय आहे. त्यांच्यासह निरनिराळे प्रयोग करणे हा जणू त्यांचा श्वासच झालेला आहे. त्यांची प्रत्येक कलाकृती न्याहाळताना आपण वेगळ्याच जगात गेल्याची अनुभूती होते. शिवाय, या कलाकृतींचे केंद्रबिंदू असलेले मंत्र हे रसिकांच्या काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाहीत. काही काळ या कलाकृतींकडे पाहत राहिल्यास अवघ्या काही क्षणांतच ब्रह्मांडाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे जैन यांच्यासारखे प्रयोगशील कलाकार कलाविश्वात होणे नाही. त्यांनी कलाविश्वाला दिलेले ‘अक्षरलिपी’चे योगदान कायमच उल्लेखनीय राहील. भविष्यकाळात ही कला सकारात्मक ऊर्जेचे माध्यम व्हावे आणि यातून आयुष्यातील संकटांना सामोरे जाण्याची प्रेरणा मिळावी हा जैन यांनी व्यक्त केलेला विचार भविष्यकाळात नक्कीच प्रत्यक्षात उतरेल अशी आशा आहे.

Web Title: Gift of the Lies! Avalia is the prototype of the characters on the canvas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.