नौटंकी नेत्यांची जबरदस्त अदाकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 02:32 AM2017-12-14T02:32:42+5:302017-12-14T02:32:53+5:30
हॉलिवूडच्या एका फिल्म कंपनीला अभिनेते हवे होते, तेव्हा कुणीतरी सांगितलं की, ‘नौटंकी करणारे एक से एक अॅक्टर सध्या नागपुरात ठाण मांडून बसलेत.’ मग काय.. हॉलिवूड टीम नागपुरात पोहोचली.
- सचिन जवळकोटे
हॉलिवूडच्या एका फिल्म कंपनीला अभिनेते हवे होते, तेव्हा कुणीतरी सांगितलं की, ‘नौटंकी करणारे एक से एक अॅक्टर सध्या नागपुरात ठाण मांडून बसलेत.’ मग काय.. हॉलिवूड टीम नागपुरात पोहोचली. सुरुवातीला विखे-पाटलांना भेटली. ते अॅक्टिंगसाठी एका अटीवर तयार झाले, ‘मी सरकारवर टीका करेन; पण काही ठराविक नेत्यांवर करणार नाही.’ टीम ‘शिक्षणात पर्यटन’ शोधणा-या विनोदरावांना भेटली. मात्र, त्यांनीही थंडगार भिलारमध्ये शूटिंग करण्याच्या अटीवरच होकार दिला.
टीम धनंजयरावांना भेटली. ते ‘सकाळी कार्यक्रमांच्या, दुपारी भाषणांच्या अन् संध्याकाळी स्वत:च्या कार्यकर्तृत्व गौरवाच्या प्रेसनोट रोजच्या रोज कशा वेळेवर पोहोचल्या पाहिजेत,’ हे आपल्या पीएंना समजावण्यात गुंतले होते. एवढा ‘बिझी कलाकार’ आपल्याला परवडणारा नाही, हे ओळखून टीम देवेंद्रपंतांकडं गेली. मात्र, ‘’मी आॅलरेडी पाच वर्षांच्या मुदतीचा करार केलाय, त्यातली सव्वा तीन वर्षे संपलीत. अजून पावणेदोन वर्षाची अॅक्टिंग संपली की मग तुमचा विचार करू,’ असं त्यांनी नेहमीच्या स्टाईलनं जोरजोरात सांगितलं. तेव्हा ‘साध्या वाक्यालाही खच्चून ओरडणारा अॅक्टर आपला पिक्चर सुपरहिट करणार,’ याची टीमला खात्री पटली. त्याच आनंदात टीम सोलापुरात पोहोचली. तिथं शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसोबत चक्क काँग्रेसच्या तिकिटाची चर्चा करण्यात सुशीलकुमार रमले होते. त्यामुळं ‘काँग्रेसचा उमेदवार सेनेचे कार्यकर्ते ठरवतात की पुरुषोत्तमांची भूमिका काय असावी, हे सुशीलकुमार फिक्स करतात,’ याचा विचार करत टीम बारामतीत पोहोचली. तिथं ‘हल्लाबोल’ शब्द लिहिलेला केक कापण्यात थोरले काका मश्गुल होते. त्यांना पिक्चरविषयी विचारलं तेव्हा त्यांनी अत्यंत विनम्रपणे नकार दिला, ‘माझ्याऐवजी हा रोल तुम्ही आमच्या धाकट्या दादांना द्या. माझा वारसा शेवटी त्यांनाच चालवायचाय,’ असं काकांनी सांगताच दादा जणू हवेत तरंगू लागले. मात्र, पुढच्याच वाक्यानं ते झटक्यात जमिनीवर आले.. कारण काका पुढं बोलले, ‘कारण कितीही केलं तरी अॅक्टिंगमध्ये ते माझ्यापेक्षा काकणभर सरस आहेत म्हटलं.’ टीम बेशुद्ध पडली, हे सांगणे न लगे.