मुलींनी आत्मसन्मान जपावा
By Admin | Published: December 8, 2014 12:22 AM2014-12-08T00:22:54+5:302014-12-08T00:22:54+5:30
माझ्या दोन जुळ्या मुली जेव्हा जन्माला आल्या, तेव्हा देवाने (तो असेल तर) माझ्यावर मुलींचा सांभाळ करण्याची अतिरिक्त जबाबदारी सोपवली, असे मला वाटते
देवयानी खोब्रागडे
(भारतीय परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ अधिकारी)-
माझ्या दोन जुळ्या मुली जेव्हा जन्माला आल्या, तेव्हा देवाने (तो असेल तर) माझ्यावर मुलींचा सांभाळ करण्याची अतिरिक्त जबाबदारी सोपवली, असे मला वाटते. त्यांच्या माध्यमातून दोन सुंदर, आत्मविश्वास असलेल्या स्त्रिया निर्माण करण्याची कामगिरी मला बजावायची होती. त्या जगत असताना शरीराने आणि मनानेही सुखी असाव्यात, असा प्रयत्न मला करायचा होता. मी माझ्याकडे सोपवलेल्या कामाबद्दल कृतज्ञ होते.
मुलींचे या तऱ्हेने संगोपन करणे, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. रोहटक येथील दोन तरुणींनी आत्मसन्मान जपण्यासाठी जो लढा दिला, तो मी टी.व्ही.वर बघितल्यावर त्याचा व्हिडीओ मी माझ्या आठ वर्षे वयाच्या मुलींना दाखवला. एखाद्या माणसाने छेडखानी केली, तर त्यांनी याच तऱ्हेचे वर्तन करायला हवे, हे मी मुलींना समजावून सांगितले. माझ्या मुलींनी अलीकडे तायक्वान्दोचे कोणते धडे गिरवले, हे मी जाणून घेतले. या धड्याचा वापर त्या करू शकतील, असेही त्यांना सांगितले. आपल्याशी कुणा मुलाने गैरवर्तन केले, तर आम्ही त्याच्यावर ब्लॅकबेल्टचा वापर करू, असे त्यांनी सांगितल्यावर मला त्यांचा अभिमान वाटला. (तरुण मुलांवरही कसे अत्याचार होतात, हेही मी त्यांना समजावून सांगितले.)
आमच्यातील या तऱ्हेचा संवाद प्रथमच होत होता, असे नव्हते. त्या मुली चार वर्षांच्या होत्या, तेव्हा मी त्यांना माझ्या बहिणीला एका माणसाने वाटेत अडविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती कशी किंचाळली होती, तसेच मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एका गुंडाने तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने त्यास हातातल्या छत्रीने कसा मार
दिला होता, याची माहिती दिली होती. रोहटकच्या त्या मुलींनी किंवा माझ्या बहिणीसारख्या मुलींनी त्यांना
त्रास देणाऱ्या मुलांचा धैर्याने मुकाबला केला असला, तरी पुरुष जेव्हा त्यांची मानखंडना करतात, तेव्हा
त्यांना स्वत:ला लाज वाटते व मनात अपराधीपणाची भावना बळावते.
माझी आई मला सांगायची, की आपली छाती दुपट्ट्याने घट्ट झाकायची, रस्त्याने चालताना खाली बघून चालायचे, कुणाचे लक्ष वेधले जाईल, असे ताठपणे चालायचे नाही! असा उपदेश अनेक मुलींनासुद्धा त्यांच्या आया करीत असतील; पण एवढा उपदेश देऊनही त्याचा फारसा उपयोग होत नसे. मुले आणि माणसे लहान मूल समजून मला हाताळायची. रिक्षातून नेणारा रिक्षावालादेखील मला स्पर्श करायचा. माझ्यासोबत रिक्षातून शाळेत जाणारा मुलगा माझ्या छातीला चिमटे काढायचा. सिनेमागृहात माझ्या मागे बसलेल्या अनोळखी इसमाने किंवा बसमधून प्रवास करताना सहप्रवाशाने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक घटना घडल्या, ज्यांच्या आठवणी मी विसरून जाण्याचा प्रयत्न केला. माझ्या देहावर हे न स्वीकारण्याजोगे अत्याचार झाले, तेव्हा मी त्याबद्दल स्वत:लाच दोष दिला, माझ्याबद्दल, माझ्या दिसण्याबद्दल. त्यामुळे अभिमानाची भावना काही निर्माण झाली नाही.
आता मला वाटू लागले आहे, की रोहटकच्या मुलींनी जे वर्तन केले, तसे वर्तन करण्याबाबत मुलींना शिक्षण दिले गेले पाहिजे. त्यांच्या संगोपनाचा तो एक भाग असायला हवा. माणसे मुलींचे शत्रू आहेत, असे समजण्याचे कारण नाही. तसेच उठसूठ त्यांना मार देण्याचीही गरज नाही. प्रश्नाची सोडवणूक करण्याचा तो मार्ग नाही; पण रोहटकच्या मुलींच्या कृत्याने मुलांपर्यंत योग्य तो संदेश पोहोचवण्याचे काम नक्कीच केले आहे.
मीडियाकडून अशा मुलींचे उदात्तीकरण केले जाईलही; पण अशा घटना दररोज घडत असतात. त्यावर तोडगा असा, की आपण आपल्या तरुण मुलांना व मुलींना आपली शरीरे किती मूल्यवान आहेत, हे समजावून सांगितले पाहिजे. मुलींनी समाजात वावरताना कोणत्याही त्रासापासून मुक्त असायला हवे. देह किती सुंदरतेने भरलेला आहे, हेही आपण आपल्या मुलींना समजावून सांगायला हवे. शरीराचा एखादा भाग उघडा पडला, की ‘शेम शेम’ असे ओरडण्याची गरज नाही. आपल्या शरीराच्या काही विशिष्ट भागांविषयी लाज बाळगण्याचे कारण नाही, हेही आपण समजावून सांगायला हवे. तुमचे शरीर हे तुमचे आहे आणि तुम्ही त्याबद्दल अभिमान बाळगायला हवा, असे आपण मुलींना सांगायला हवे. त्या शरीराला त्यांच्या परवानगीशिवाय कुणालाही हात लावता येऊ नये, हेही त्यांच्या मनावर बिंबवायला हवे.
या तऱ्हेच्या घटना होऊ नये यासाठी हा मार्ग आहे, की आपण आपल्या मुलांना आणि मुलींना समन्यायाने वाढवले पाहिजे. त्यामुळे त्यांच्याकडे कुणी बघण्याची किंवा त्यांना स्पर्श करण्याची वेळच येणार नाही. ज्या सिनेमात तरुणींचा वापर निर्बुद्ध सेक्सच्या वस्तू म्हणून करण्यात येतो, असे सिनेमे त्यांनी बघू नयेत. ज्या जाहिरातींतून सेक्सचा वापर करण्यात येतो, अशा वस्तू त्यांनी वापरू नयेत. स्त्रियांविषयी सैल वक्तव्ये करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी महिला सुनावू लागल्या आहेत. त्याप्रमाणे मुलींना छळण्याचा प्रकार जेथे जेथे पाहावयास मिळेल, तेथे तेथे त्यांनी धावून जायला हवे. अशा कृत्यांचे कौतुक करायला हवे, जसे मी रोहटकच्या कन्यांच्या धाडसाचे करीत आहे.
मुले आणि मुली यांनी एकमेकांना राखी बांधून एकमेकांच्या संरक्षणाची हमी घ्यावी. माझ्या मुली एकमेकींना याच भावनेने राखी बांधत असतात. माझ्या पाच वर्षे वयाच्या जुळ्या मुली एकमेकींना बेटी म्हणून हाक मारायच्या, तेव्हा मला त्यांचा अभिमान वाटायचा. ‘हातात बांगड्या भरल्या आहेत का?’ हा वाक्प्रचार त्यांना उपमर्द करणारा वाटतो, याचे मला समाधान वाटते.
एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात मी माझ्या मुलींना घेऊन गेले होते. तेथील पालकांशी मी मुक्तपणे संवाद साधला. तेथे पुरुष मुलांसोबत क्रिकेट खेळत होते, बायका वरच्या मजल्यावर खाद्यपदार्थांकडे लक्ष पुरवीत होत्या आणि मुली साबणाचे फुगे उडवीत होत्या व बॅडमिंटन खेळत होत्या. त्यानंतर मुलांना बक्षिसे देण्याचा कार्यक्रम झाला, तेव्हा सहजच मुलांना अगोदर बक्षिसे देण्यात आली. त्यातून आपण मुलांना मुलींपेक्षा जास्त महत्त्व देतो, हा संदेश सहजच दिला गेला, हे मी त्या पालकांना सांगितले, तेव्हा ते त्यांना आवडले नाही. मला वाटते, आपल्या मुलांचे संगोपन करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवे. त्यांच्यात भेदभाव न करता त्यांच्या संबंधात सुधारणा घडवून आणायला हवी.