गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंदलहरी प्रगट केली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 08:44 AM2020-08-11T08:44:57+5:302020-08-11T08:45:29+5:30
गीतेच्या तत्त्वबोधाने ज्ञानेश्वरी नटली की ज्ञानेश्वरीचे सिद्धांत - दृष्टांत आणि भाषा सौंदर्याने गीता नटली. कुणी कुणाला अलंकारिले हे समजत नाही; पण या दोन्ही ग्रंथांमुळे ज्ञानवंत, साधक, रसिक, भक्त आणि सामान्यजनही तृप्तीच्या आनंदाने नटले हे निश्चित.
- डॉ. रामचंद्र देखणे, संत साहित्याचे अभ्यासक
सुंदर अनुबंध मांडणारा संत नामदेवांचा अभंग प्रसिद्ध आहे,
ज्ञानराज माझी योग्यांची माउली
जेणे निगमवल्ली प्रगट केली।
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी
ब्रह्मानंदलहरी प्रगट केली।
नामदेव महाराज म्हणतात, ज्ञानेश्वरी ही गीतेची केवळ टीका नाही, गीतेचे केवळ भाष्य नाही, तर प्रत्यक्ष गीताच ज्ञानेश्वरीचा अलंकार लेवून नटली आहे. ज्ञानेश्वरीचा अलंकार घेऊन गीताच शोभिवंत झाली आहे. गीता शब्दाचा अर्थच गायिलेला प्रबोध, तर भगवद्गीता म्हणजे भगवंताने गायिलेला, सांगितलेला बोध होय. स्वत: भगवान श्रीकृष्णाने पार्थाला उपदेशिलेली गीता ही अद्वैतज्ञानरूपी अमृताचा वर्षाव करणारी आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या निमित्ताने ब्रह्मरसाचे पारणे घातले; पण त्याहीपेक्षा सर्वांना भक्तीचा अधिकार देऊन, त्या ब्रह्मरसाचा आस्वाद, ‘स्त्रीशुद्रादि प्रतिभे सामाविले’ अशा सर्वांना प्राप्त करून देणारी गीता, ही ‘ब्रह्मविद्या कृपाळू’ ठरली. गीता हे चिंतन आहे. गीता हा तत्त्वबोध आहे, गीता ही ब्रह्मविद्या आहे, गीता हे शास्त्र आहे, गीता हे काव्य आहे, गीता हा संवाद आहे आणि गीता हे दर्शनही. गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ‘ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे’ असे वर्णन केले आहे. गीता हे कोणत्या प्रकारचे शास्त्र आहे? शास्त्राचे दोन प्रकार सांगितले जातात. पहिला प्रकार म्हणजे प्रयोगप्रधान शास्त्र आणि दुसरा विचारप्रधान शास्त्र. विचारप्रधान शास्त्रात प्रयोग कमी असतात; पण प्रयोगशास्त्राच्या कक्षेपलीकडील जीवनदृष्टीचे अनेक प्रश्न सोडविण्याचे काम विचारप्रधान शास्त्र करत असते. नीती, अध्यात्म, तर्क ही विचारप्रधान शास्त्रे आहेत. अध्यात्म हा नीतीचा पाया आहे. गीतेच्या संवादातील अर्जुनाचा प्रश्न हा नीतिविषयक होता; पण त्यास उत्तर देताना भगवंताने शास्त्र निर्माण केले. जीवनातील धर्माधर्म, कर्तव्याकर्तव्य या महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार करणारे गीता हे जीवनशास्त्र आहे. अध्यात्माच्या पायावर उभे राहिलेले ते नीतिशास्त्र आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये शास्त्रालाही कलेच्या अंगाने उभे केले आहे. शास्त्र आणि कला मिळून जीवनसौंदर्य खुलते. श्रीकृष्णाने स्वत: गीता सांगितली. अकराव्या अध्यायात ज्ञानदेव म्हणतात;
बाप बाप ग्रंथ गीता
जो वेदी प्रतिपाद्य देवता
तो श्रीकृष्ण वक्ता।
द्वये ग्रंथी।।
धन्य धन्य ती गीता की, वेदीच्या प्रतिपालनाचा विषय असणारा भगवान श्रीकृष्ण, तो या ग्रंथाचा वक्ता असून, तो सामान्यातल्या सामान्यांनाही योगदर्शन घडवितो आहे. गीतेत भगवंताला श्रीकृष्णाने सिद्धांताबरोबर त्याचा विनियोग शिकविण्याची कलाही सांगितली आहे, म्हणून प्रत्येक अध्याय हा योग आहे.
ज्ञानेश्वर माउली गीतेचे वर्णन करण्यासाठी खूप हळवे होतात. ज्ञानदेव म्हणतात,
तैशी ब्रह्मविद्या रावो।
सकल शास्त्रांचा विसंवता ठावो।
गीता ही ब्रह्मविद्येची सम्राज्ञी आहे. सकल शास्त्रांचे विश्रांतीस्थान आहे. अशी ब्रह्मविद्या ज्ञानेश्वरीच्या रूपात माझ्या गुरुंनी माझ्याकडून गाऊन घेतली आणि गीतेचे हे प्राकृत मराठी रूप मला उभे करता आले. भगवद्गीता ही भगवंताची तत्त्वमूर्ती तव ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाङ्मयमूर्ती होय. काव्य, भाषासौष्ठव, प्रासादिकता, सिद्धांत, व्यावहारिक दृष्टांत, तत्त्वचिंतन आणि स्पष्टता या सर्वच भूमिकेतून ज्ञानेश्वरी हा गं्रथ महाराज सारस्वतात आणि मराठी लोकजीवनात शिखरावर जाऊन बसला आहे. ज्ञानदेवांनी रसालंकारसंपन्न भाषेने साहित्यिकांना, साहित्य सोनियाच्या खाणी उघडून अंतरंग अधिकारी जिज्ञासूंना, भक्तिवैराग्य कवनाने वारकऱ्यांना, अष्टांग योगाच्या निरूपणाने योग्यांना आणि व्यावहारिक दृष्टांच्या माध्यमातून प्रापंचिकांनासुद्धा ‘शब्द जैसे कल्लोळ। अमृताचे’ अमृतवाणीचा उत्कट आविष्कार घडविला आहे. नवरसांचे सागर भरवीत, साहित्य सोनियाच्या खाणी उघडवीत, विवेकवल्लीची लावणी करीत विश्वैक्यधाम्याचा प्रसार चंद्रमा म्हणून, प्रतिमेचे पूर्णत्व घेऊनच ज्ञानेश्वरी प्रकटली. ज्ञानेश्वरीच्या चिंतनाने, अभ्यासाने तृप्तीची अपरोधानुभूती घेणारे ज्ञानवंत हे जसे ज्ञानेश्वरीमय झाले, तसेच ज्ञानेश्वरीच्या श्रद्धेमुळे तिची पारायणे करून जीवन परिवर्तित करणारे सामान्य जनही समाधानाच्या तृप्तीचा अनुभव घेतात. केवळ विचारशास्त्र नाही, तर प्रयोगशास्त्राच्या अंगानेही गीता - ज्ञानेश्वरीचा स्पर्श होतो तो असा. दोन्ही ग्रंथांची गोडी अवीट अशीच आहे. दोघांच्याही विचारतत्त्वाने जनविश्व उजळून निघाले आहे. ज्ञानदेवाच्याच रूपकाच्या आधारे म्हणावेसे वाटते -
अंगापेनि सुंदरपणे।
लेणिया अंगपि होय लेणे।
तेथ अलंकारिले कवण कवणे
हे निर्वचेना।
गीतेच्या तत्त्वबोधाने ज्ञानेश्वरी नटली की ज्ञानेश्वरीचे सिद्धांत - दृष्टांत आणि भाषा सौंदर्याने गीता नटली. कुणी कुणाला अलंकारिले हे समजत नाही; पण या दोन्ही ग्रंथांमुळे ज्ञानवंत, साधक, रसिक, भक्त आणि सामान्यजनही तृप्तीच्या आनंदाने नटले हे निश्चित.