या बिचा-यांना काही द्या रे...
By admin | Published: May 11, 2015 05:23 AM2015-05-11T05:23:23+5:302015-05-11T05:23:23+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम परिषद आणि महादेवराव जानकरांचा पक्ष (काय बरे त्याचे नाव?) या तीन पक्षांना त्या रामदास आठवल्यांसारखे अजून सत्तेबाहेर उन्हात उभे रहावे लागत आहे.
राज्याची सत्ता हातात येऊन सहा महिने झाले तरी आपण मंत्रिमंडळाबाहेर, समन्वय समितीबाहेर आणि सरकारच्या सगळ्या पदांपासून दूरच राहिलो असल्याची खंत महायुतीतील अन्य पक्षांत, म्हणजे त्यांच्या नेत्यांत आहे. फडणवीसांच्या सरकारात त्यांच्या भाजपाखेरीज एकट्या शिवसेनेचाच समावेश आहे आणि तोही अगदी वळचणीखाली येणाऱ्या जागा त्यांना देऊन करून घेतला आहे. सेनेला केंद्रात केवळ एकच फुटकळ मंत्रिपद आणि राज्यात शिल्लक उरलेली काही पदे एवढ्यावर शिवसेनेने सगळा सन्मान गिळून आघाडी धर्माचा टिळा लावून घेतला आहे. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम परिषद आणि महादेवराव जानकरांचा पक्ष (काय बरे त्याचे नाव?) या तीन पक्षांना त्या रामदास आठवल्यांसारखे अजून सत्तेबाहेर उन्हात उभे रहावे लागत आहे. आम्ही तुम्हाला एवढी मदत केली तरी आमची अशी उपेक्षा का, असा प्रश्न घेऊन हे पक्ष आता एकत्र आले आहेत. उद्या मुंबईत होणाऱ्या त्यांच्या संतप्त सभेत सरकार पक्षाला ते त्यांच्या आतापर्यंतच्या उपेक्षेबाबतचा प्रश्न विचारणार आहेत. येत्या काही दिवसांत फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन त्यात भाजपाच्या सहा, सेनेच्या चार आणि इतर दोन अशा बारा मंत्र्यांचा समावेश व्हायचा आहे. याचवेळी सरकारच्या इतर समित्यांच्या अध्यक्षांची नावेही पक्की व्हायची आहेत. त्यामुळे पूर्वी नाही तर आता तरी आमचा विचार व्हावा ही या टांगलेल्या पक्षांची मागणी आहे. सत्ताधारी आघाडीत समन्वय राखण्यासाठी जी समिती नेमली गेली ती सरकारी नाही. पण त्याही समितीत या घटकांना कोणी घेतले नाही. एकेकाळी स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचा आवाज मोठा होता आणि शिवसंग्रामच्या विनायक मेट्यांची डरकाळीही मोठी होती. शेट्टींनी पवारांना जेरीला आणले होते आणि मेट्यांची राष्ट्रवादीतली वटही मोठी होती. पण नव्या सरकारने त्यांना गृहीत धरून मागे फिरविण्यापलीकडे काही केले नाही. त्यांना पदे नाहीत, मान नाही, निर्णयात स्थान नाही आणि ते सत्तेत असल्याचे आता कुणाला वाटतही नाही. ही अवस्था त्याही बिचाऱ्यांना सहन न होणारी व त्यांच्या जुन्या स्वाभिमानाला डिवचणारी आहे. या पक्षांची ताकद मोठी नसल्याने त्यांच्या बंडाची सरकारला भीती नाही. भाजपा व सेना यांचे संख्याबळ सरकारला तारू शकण्याएवढे मोठे आहे. त्यामुळे कुरकुर करणे, रुसवे-फुगवे दाखविणे याखेरीज त्यांना फारसे काही करताही येत नाही. त्यांच्या तशा दुबळेपणाची चांगली जाणीव असलेले सरकार त्यांची फारशी दखलही त्याचमुळे घेत नाही. आताचा त्यांचा ‘बैठकी’ पवित्रा त्यातून पुढे आला आहे. काहीच न केले तर आज सरकार विचारत नाही, उद्या लोकही विचारणार नाहीत हे त्यांचे भय आहे. लहान संघटनांची एक व्यथा आणखीही असते. त्यांच्यात असलेला अनुयायांचा वर्ग आपल्या पुढाऱ्याला एखादे वजनदार पद मिळेल या आशेवर त्याच्या मागे राहत असतो. मात्र तो पुढारीच असा महिनोन्महिने कुजताना दिसला की त्यांच्याही आशा मावळू लागतात व ते नवे पुढारी शोधू लागतात. आघाडीतील उपेक्षित पुढाऱ्यांना भेडसावणारी एक चिंता हीदेखील आहे. ज्या विरोधकांची त्यांनी साथ सोडली त्यांचा आनंद तर यामुळे वाढताच राहणार. ज्यांना सोडले ते आपले राहिले नाहीत आणि ज्यांना जवळ केले ते आपले म्हणत नाहीत ही खरोखरीच कमालीची केविलवाणी अवस्था आहे. ऊस उत्पादकांचे नेते शेट्टी यांचा अपवाद वगळला तर बाकीचे सारे कोणत्या ना कोणत्या भावनात्मक मुद्यावर आपले राजकारण चालविणारे आहेत. या माणसांचे आधार दुबळे असतात आणि त्यांची सोबतही विश्वासाची नसते. विचारांचे वा तत्त्वांचे राजकारण मागे पडून आता खूप काळ लोटला आहे. तत्त्वनिष्ठेच्या राजकारणाची जागा कार्यक्रमाच्या राजकारणाने घेऊनही खूप दिवस झाले आहेत. भावनांचे, एकेका महापुरुषाच्या नुसत्याच स्मरणाचे राजकारणही आता लोकांना हास्यास्पद वाटू लागले आहे. या स्थितीत कोणताही व्यापक कार्यक्रम हाती नसणारे, पक्ष प्रबळ नसणारे व प्रादेशिक नेतृत्वापासून दूर झालेले एकाकी लोक कशाचे आणि कुणाचे पुढारीपण करणार? त्यांचे राजकारण उद्या संपले तरी त्यामुळे कोणाला दु:ख व्हायचे आहे? खरेतर हा त्यांनी टिकून राहण्यासाठी चालविलेल्या गमजांचा भाग आहे. त्यामुळे त्याला कुरबुरीखेरीज दुसरा दर्जा नाही आणि राज्यानेही त्याला फार महत्त्व देण्याचे कारण नाही. नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये अशी एक म्हण आपल्यात आहे. महायुतीत सामील झालेल्या या धाकट्यांची कथा नुसती दयनीयच नाही तर हास्यास्पदही आहे. या मंडळीचे एक दु:ख आणखीही आहे आणि ते त्यांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे. सध्याच्या सत्ताधारी युतीला त्यांनी ज्यांच्याविरुद्ध जीवाच्या आकांताने जाऊन साथ दिली त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची म्हणजे शरद पवारांची मदत व सल्ला त्यांची सत्ताधारी महायुतीच घेत असल्याचे त्यांना अनेकवार पहावे लागले आहे. परिणामी, अरेरे, ज्यांच्याविरुद्ध आमची मदत घेतली आणि त्यांच्याशीच तुम्ही सल्लामसलत करता आहात याचे आम्हाला होणारे दु:ख मोठे आणि जास्तीचे अपमानित करणारे आहे हे तरी सरकारातल्या तुम्हाला जाणवते काय, हा त्या बिचाऱ्यांचा प्रश्न आहे.