सद्बुद्धी दे गणनायका !
By admin | Published: September 5, 2016 05:19 AM2016-09-05T05:19:26+5:302016-09-05T05:19:26+5:30
‘कार्यारंभी श्रीगणेश’ अशी ख्याती असलेल्या श्रीगणेशाचे आगमन आज साऱ्या महाराष्ट्रातच नव्हे तर मराठी माणूस जेथे जेथे आहे
‘कार्यारंभी श्रीगणेश’ अशी ख्याती असलेल्या श्रीगणेशाचे आगमन आज साऱ्या महाराष्ट्रातच नव्हे तर मराठी माणूस जेथे जेथे आहे त्या प्रत्येक गावात आणि तेथील मराठी घरात अत्यंत धूमधडाक्यात होत आहे. प्रत्येक राज्याची विशेष अशी ओळख असते. महाराष्ट्राची ओळख गणेशोत्सव ही आहे. एके काळी व्यक्तिगत असलेली ही ओळख लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक केली. त्यामागे सामाजिक जागृती हे उद्दिष्ट होते. धार्मिक कार्यक्रमात इंग्रज सरकार हस्तक्षेप करू शकणार नाही हे ओळखून त्यांनी या उत्सवाचा उपयोग सामाजिक जागृतीसाठी करण्यास सुरुवात केली. अशा कार्यक्रमातून होणाऱ्या वैचारिक प्रबोधनातून समाजात स्वातंत्र्याविषयीची ओढ वाढीस लागली आणि परकीय सत्तेविरुद्धचा तिटकारा पराकोटीस पोहचला, हा इतिहास आहे. श्री गणेशाचे एकदंत, चतुर्हस्त हे स्वरूप अनादीकाळापासून चालत आलेले आहे आणि ते त्यांच्या भक्तांना भुरळ घालीत आले आहे. चित्रकारांनाही या रूपाने वेड लावले असून मकबुल फिदा हुसेन यांनाही गणेशाच्या प्रतिमेला आपल्या चित्रकल्पनेतून साकारण्याचा मोह आवरता आला नव्हता. ही गणेश प्रतिमा दूरदूरच्या राष्ट्रातही कशी पोचली हा संशोधकांसाठी कायम संशोधनाचा विषय ठरला आहे. भारतातही आसेतू हिमाचल श्रीगणेशाचे मूर्तरूप सर्व मंदिरात ठळकपणे पाहावयास मिळते. श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी गणेशवंदना केली. कारण त्या दैवताचे पूजन कार्य सिद्धीस नेण्यासाठी उपकारक ठरत असते अशी धारणा भारतीयांच्या मनात फार पूर्वीपासून कायम अंकित झालेली आहे. ‘देवा तूचि गणेशु, सकलमती प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु, अवधारिजो’ या तऱ्हेचे आवाहन श्री ज्ञानेश्वरांनी करण्यामागे हीच भूमिका असल्याचे दिसून येते. आज सार्वजनिक गणेशोत्सवाला जे उत्सवी रूप प्राप्त झाले आहे, तशा रूपाची अपेक्षा लोकमान्य टिळकांनीही केली नसेल. प्रबोधनाच्या जागी मनोरंजनाचे आगमन झाल्यापासून गणेशमूर्तीची स्थापना केल्यानंतर कोणताही विधिनिषेध न बाळगता डीजेच्या तालावर जे संगीत सादर करण्यात येते त्यामुळे गणेश पूजनामागील पावित्र्य लोपले आहे. दिव्यांची रोषणाई, देखाव्यांची भव्यता यालाच जे अधिक महत्त्व आले आहे ते गणेशोत्सव साजरा करण्याच्या संकल्पनेला तडा देणारे ठरले आहे. श्रीगणेशाची स्थापना हा इव्हेन्ट झाल्यामुळे, त्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचा उपयोग आत्मप्रसिद्धीसाठी करून घेण्याचा मोह राजकीय नेत्यांना व्हावा हे स्वाभाविकच होते. त्या मोहापायी स्वत:चा प्रचार करण्यासाठी गणेशोत्सवाचा उपयोग राजकीय नेत्यांकडून होऊ लागला आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमांसाठी पैशाची होणारी बेलगाम उधळण ही स्वत:ची व्होट बँक मजबूत करण्यासाठी राजकीय नेत्यांकडून होऊ लागली आहे. ते गणेशोत्सवाचे प्रायोजकत्व पत्करू लागल्यामुळे प्रायोजकांकडून अधिकाधिक रक्कम मिळविण्याचा प्रयत्न गणेशोत्सव मंडळांकडून होऊ लागला आहे. या राजकीय नेत्यांना आवरा असे म्हणण्याची वेळ श्रीगणेशावर आली आहे. श्रीगणेश ही बुद्धिदात्री देवता आहे. श्री व्यासांनी महाभारताचे जे लेखन केले ते श्रीगणेशाकरवी केले अशी आख्यायिका आहे. ‘बुद्धीचा साक्षी ईश्वर, तेथे कर्माचा प्रसार’, या संकल्पनेतून श्रीगणेशाकडे महाभारताचे लेखकत्व सोपविले असावे. त्यामुळेच चांगली बुद्धी दे असे श्रीगणेशाला साकडे घालण्यात येते. आजची समाजाची सैराट अवस्था बघता साऱ्या सामाजाला सद्बुद्धी दे असे गणेशाला साकडे घालण्याची वेळ आली आहे. सत्ताधीशांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांचीच बुद्धी भ्रष्ट झाली आहे की काय असे वाटू लागले आहे. लहान मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर त्यांच्या होणाऱ्या हत्या, आॅनर किलिंगच्या नावाने समाजाचा आणि कुटुंबाचा मानसन्मान राखण्यासाठी केले जाणारे खून, समाजापुढे ज्यांचे आदर्श असतात अशा सत्ताधीशांकडून सत्तेचा होणारा दुरुपयोग, जनहिताच्या नावाखाली लहान लहान गोष्टीत होणारा न्यायालयीन हस्तक्षेप आणि न्यायाधीशांकडून लोकप्रतिनिधींवर ओढले जाणारे कोरडे, नोकरशहांकडून केला जाणारा न्यायालयीन निर्णयांचा उपमर्द, सत्ताधीशांकडून विरोधकांची केली जाणारी गळचेपी, अशी बुद्धिभ्रष्टतेची अनेक उदाहरणे सांगता येतील. निकोप समाजव्यवस्थेसाठी हे सर्व प्रकार घातक आहेत. या सर्वांना चांगली बुद्धी दे असे गणरायाला आवाहन करण्याची वेळ आली आहे. वास्तविक लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची जी फलश्रुती सांगितली आहे त्यात ‘ज्या योगाने आपले परस्पर संबंध निकटतर होत जातील त्या त्या गोष्टी करणे हे आपले कर्तव्य ठरते. त्यादृष्टीने गणेशोत्सवाकडे बघितले तर समाजमन अधिक सुसंस्कृत होण्यासाठी, विकृतीपासून दूर होत सत्कृतीकडे जाण्यासाठी बुद्धिदात्या श्रीगणेशाने सर्वांना सद्बुद्धी द्यावी. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सारा समाज एकजूट झाला तर बलशाली भारताचे स्वप्न प्रत्यक्ष उतरण्यास वेळ लागणार नाही.