ये ‘हात’ हमें दे दो महाराजऽऽ
By सचिन जवळकोटे | Published: March 10, 2019 08:52 AM2019-03-10T08:52:03+5:302019-03-10T08:53:14+5:30
लगाव बत्ती
सचिन जवळकोटे
सोलापूरच्या राजकारणात असा बाका प्रसंग प्रथमच उद्भवला असावा. आजपावेतो एखाद्या नेत्याला उमेदवारी मिळावी म्हणून राडा करणारे कार्यकर्ते सोलापूरकरांनी पाहिलेले; मात्र एखाद्या व्यक्तीनं उमेदवारीच घेऊ नये म्हणून गदारोळ माजविण्याचं तंत्र प्रथमच अनुभवलेलं. तेही का?...तर केवळ महाराजांनी लोकांसमोर हात जोडू नये म्हणून. आता महाराजांचे ‘हात’ एवढे आपुलकीयुक्त कुणाला वाटू लागले? महाराजांचा ‘हात’गुण माहीत असणाºया विरोधकांनी नवा ‘हात’खंडा का दाखविला? याचा शोध घेणं अत्यंत गरजेचं...कारण याच्या उत्तरातच लपली असावी ‘हात’ की लकीर ! म्हणूनच...ये ‘हात’ हमें दे दो महाराज...
बारामतीत कपबशी फिरली...
...मग माढ्यात का नाही चालत ?
विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यासाठी माणदेशातले ‘महादेव’भाऊ सोलापुरी मुक्कामाला आलेले. सकाळी ‘सुभाषबापूं’च्या बंगल्यात नाष्टा करताना दोघांमध्ये चर्चा रंगलेली. ‘तुम्ही माढ्यात उभाराऽऽ कमळाच्या चिन्हावर तुम्हाला आम्ही निवडून आणू’ असं ‘बापू’ म्हणताच जानकरांनी तत्काळ प्रत्युत्तर दिलं, ‘कमळावर तुम्हीच उभारा, मीच तुमचा प्रचार करेन. गेल्यावेळी बारामतीत माझी कपबशी गराऽऽ गराऽऽ फिरली. गेल्याच्या गेल्यावेळी माढ्यातही वाजली; मग याचवेळी का ही कपबशी नको ? माढ्यात मी उभारलो तर कपबशी घेऊनच,’ असं स्पष्टपणे सांगत त्यांनी कपातला चहा संपविला. आता त्यावेळी ‘बापूं’च्या बशीतला चहा थंड झाला की नाही, याचं उत्तर यावेळी उपस्थित असणारे शिंदेंचे रामभाऊ देतील. तोपर्यंत लगाव बत्ती...
‘हात’घाईला आलेल्यांचा ‘हात’खंडा!
‘विचार करून उमेदवारीचा निर्णय घेऊ’ असे शेळगी परिसरात सांगणाºया महाराजांच्या घोषणेची अजूनही सोलापूरकर वाट पाहताहेत; मात्र निर्णय जाहीर करण्यापूर्वीच शुक्रवारी महाराज चक्क ‘सुभाषबापूं’सोबत ‘दक्षिण’मध्ये दिसले. व्यासपीठावर ‘बापूं’सोबत गप्पा मारण्यात रंगले. हात जोडून मतदारांसमोर चक्क हसले. याचा अर्थ, राजकारणातला पहिला नियम महाराजांनी आत्मसात केला, तो म्हणजे; ‘जे करायचं असतं ते कधीच बोलायचं नसतं.’ असो माळकवठ्याच्या स्टेजवर भाषण करताना हात जोडणारे महाराज पाहून उपस्थितांना आगामी निवडणुकीतलं चित्र स्पष्टपणे दिसलं. त्यांच्या ‘हाताची काळजी’ करणाºयांनी अखेर नाद सोडला. ‘हात’घाईला आलेलेही नव्या संघर्षाला तयार झाले.
राहता राहिला विषय ‘बापूं’च्या भूमिकेचा. ते माढ्यात गेल्यानंतर त्यांचा ‘दक्षिण’मध्ये राजकीय वारसदार कोण, यावर गावोगावी पारावर खलबतं सुरू झालीत. वेगवेगळी नावं कानावर येत असली तरी ‘मनीषभैय्या’ जास्त चर्चेत. यदाकदाचित भविष्यात विधानसभेला असं घडलंच तर महाराजांच्या माध्यमातून ‘दक्षिण’मधला समाज आपल्यासोबत ठेवायलाच हवा, एवढी दूरदृष्टी ‘बापूं’कडं नक्कीच...
महाराजांच्या राजकारण प्रवेशामुळं सगळ्यात जास्त गोची कुणाची झाली असेल तर अक्कलकोटच्या ‘सिद्धूअण्णां’ची. महाराजांविरोधात त्यांनी चुकूनमाकून जाहीर सभेत टीका केली तरी त्यात मनापासून आक्रमकता किती असेल, याची त्यांच्याच कार्यकर्त्यांना उत्सुकता...अन् या महाराजांमुळं अक्कलकोटमध्ये पुन्हा ‘कमळ’ फिरू लागलं तर आगामी विधानसभेला ‘अण्णां’ची डोकेदुखी वाढणार. ‘इग येनू माडादू सिद्धूअण्णा?'
माढा; कुणाला पाडा ?
‘विद्यापीठाला नाव’ अन् ‘महाराजांना तिकीट’ देऊन ‘सुभाषबापूं’नी दोन्ही समाज जोडण्याचा डिप्लोमॅटीक निर्णय घेतला. नामविस्तारामुळं माढ्यातही कमळाचा चांगलाच विस्तार होणार, असा त्यांचा होरा असला तरी ‘भीमा-सीना’ खोºयातली ‘घड्याळ’वाली मंडळीही राजकारणात पुरती तयार झालेली. सोबतीला थोरले काका बारामतीकरांचा ‘ब्रेन’ असल्यामुळं यंदा ‘काका विरोधात बापू’ सामना भलताच रंगणार, याची अवघ्या महाराष्ट्राला शाश्वती; कारण दोन्हीही उमेदवार तगडे . दोघांमध्येही बरंच साम्य, साधर्म्य.
‘काका अन् बापू’ साम्य...
1) जे करायचं असतं, ते कधीच बोलून दाखवत नाहीत हे दोघे.
2) पक्षाशिवाय स्वत:ची वेगळी माणसं गावोगावी पेरण्यात दोघेही तरबेज.
3) सहकाराचा वापर राजकारणासाठी करून घेण्यात दोघांचा भलताच हातखंडा.
4) राजकीय वाटचालीत आजपर्यंत दोघांवरही प्रचंड आरोप झालेले.
5) सर्वच पक्षातील विरोधक आतून आपल्यासोबत बांधून घेण्यास दोघेही माहीर.
( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)