साई इतना दे दे

By Admin | Published: June 11, 2016 04:45 AM2016-06-11T04:45:40+5:302016-06-11T04:45:40+5:30

कुठलेही घर सोडताना मनाला फार यातना होतात. मी आजपर्यंत कधी घर कधी मोजले नाही.

Give Sai so much | साई इतना दे दे

साई इतना दे दे

googlenewsNext


कुठलेही घर सोडताना मनाला फार यातना होतात. मी आजपर्यंत कधी घर कधी मोजले नाही. मुंबईला येण्यापूर्वी घर मोजत असतात हेच माहिती नव्हते. फूटपट्टी कधी लागायचीच नाही. तिचे दोनच उपयोग, एक भूमितीसाठी आणि दुसरा मास्तरांकडून मार खाण्यासाठी.
वडिलांची बदलीची नोकरी होती. वडील आधी जाऊन घर बघत. आम्ही मागून समानसुमान घेऊन जायचो. बैठकीची खोली, लांब ओसरी आणि स्वयंपाकघर की झाले घर ! कधीकधी सामानाची किंवा बाळंतिणीची अंधारी खोली असायची. त्यामध्ये दुपारी लपाछपी खेळायला मजा यायची. इथेच अडगळही असायची. आणि प्रशस्त अंगण. औरंगाबादला आल्यावर वडिलांनी स्वत:चे घर बांधले. स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील या आमच्या घराशी मात्र खूप आठवणी जोडल्या गेल्या. पुढे लग्न झाल्यानंतरही बदलीच्या निमित्ताने अनेक गावे आणि घरे बदलली. नवे घर आधी परके वाटते. मग थोड्या सोईसवलती करून घेतल्या, सामान लावले की त्याला घरपण येते. बाहेर वावरताना यश मिळाले किंवा अपयशाला सामोरे जावे लागले तरी घर एका मायेने तुम्हाला स्वत:त सामावून घेत असते. मग कधी अचानक ‘प्रशासकीय कारणास्तव आणि जनहितार्थ’ बदलीचा आदेश येतो आणि पुन्हा बांधाबांध करत आपण नव्या घराच्या शोधात निघतो. सुरुवातीला अनोळखी वाटलेले घर सोडताना आता मात्र डोळे भरून येतात. ओक्याबोक्या भिंती आणि त्यांचे रितेपण घराला केविलवाणे करून टाकते. मी डोळ्यातले पाणी निकराने आवरून, हसत घराला नमस्कार करते. ‘येईन तुला परत भेटायला’ असे मनाशी पुटपुटते आणि बांध फुटायच्या आत चुपचाप खाली मान घालून चालायला लागते. मुंबईत मात्र घराच्या नव्या व्याख्या कानावर आल्या. ‘मी ३४० स्क्वेअर फूटमध्ये राहातो’. ‘माझे घर ७०० स्क्वेअर फूटचे आहे’. तर कधी केवळ ‘वन बी.एच.के’ ‘टूबी.एच.के’ असे ऐकू येऊ लागले. घराचा मोठा आकार असणाऱ्यांचा चेहरा कर्तबगारीने फुललेला तर लहान घरवाल्यांच्या चेहऱ्यावर ‘चाललयं कसबसं’ असे भाव. मला मात्र घराचे मोजमाप करायची कल्पना रु चत नाही. आईच्या प्रेमाची किंमत कुणी पैशात किंवा आकड्यात करू शकते का? डोक्यावरच्या छताची सावली महत्वाची, तिचे मोजमाप कशाला काढायचे? मला आजही माझ्या घराचे क्षेत्रफळ माहित नाही, कधी ते मोजलेच नाही व मोजणारही नाही.
संत कबीरांनी म्हटले नाही का, ङ्क्त ‘साई इतना दे दे,
जामे कुटूम समाय,
मै भी भुखा न रहू,
साधु भी भुखा न जाय !’
-श्रद्धा बेलसरे-खारकर

Web Title: Give Sai so much

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.