भाजपाच्या नेत्यांनो, आढेवेढे न घेता उद्धव ठाकरेंना बळ द्या; कारण...
By वसंत भोसले | Published: April 27, 2020 10:02 AM2020-04-27T10:02:58+5:302020-04-27T10:07:39+5:30
हे संकट परकीय नाही. स्वदेशी नाही. कोणा धर्माचे नाही. कोणत्या पक्षाच्या राजकारणाचे नाही. अशी कारणे देण्यात येणारी कित्येक संकटे आली आणि त्यावर मातही केली गेली. आता आपण एक होऊया. उद्धव ठाकरे यांना बळ द्या, यासाठीच म्हणायचे की, ते केवळ एकटे या संकटावर मात करू शकणार नाहीत. मात्र, आज ते महाराष्ट्राचे नेतृत्व करताहेत.
- वसंत भोसले-
कोरोना विषाणूचा कहर अजून मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे केंद्र सरकारसह विविध तज्ज्ञ सांगत आहेत. अमेरिका, फ्रान्स किंवा स्पेन आदी देशांना या विषाणूने मेटाकुटीला आणले आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण आणि आपल्या भारतीय समाजाची सार्वजनिक जीवनाची शक्ती फारच कमकुवत आहे. ती एकसंधपणे उभारली तरच या संकटावर मात करू शकते. यासाठी आपापसातील पारंपरिक मतभेद दूर ठेवले पाहिजेत. युद्ध जिंकण्यासाठी युद्धात अनेक गुन्हे माफ असतात, असे म्हटले जाते. आता युद्धे कमी होत आली आहेत. मात्र, अशा संकटांची मालिका तयार होऊ शकते, याची कल्पनाही केली नव्हती. जात, धर्म, समूह, पैसा, काळाबाजार, भ्रष्टाचार, अनैतिक व्यवहार, आदींनी आपण मस्तवाल झालो होतो. संकटकाळातही यातील मस्ती कमी होताना दिसत नाही.
नवी दिल्लीतील निजामुद्दीन मरकजमध्ये कार्यक्रमासाठी तबलिगी बांधव सालाबादप्रमाणे जमले होते. त्यात दोन-अडीचशे परदेशी नागरिकही होते. दरम्यानच्या काळात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संकट उभे राहिले. परदेशी नागरिकांच्या सहवासातील जमातींचे लोक आल्याने त्यांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक होती, तसे घडले आणि हिंदू-मुस्लिम द्वेषाचे राजकारण सुरू झाले. कोणत्याही कारणांनी लोक एकत्र येणे आणि संसर्गजन्य माणसांचा सहवास होणे यातून विषाणूचा संसर्ग होतोच. गेली ९४ वर्षे तेथे हा कार्यक्रम होत आहे. कोरोना आला नसता तर हे कोणाला समजलेही नसते. त्यातील अनेकजण आपापल्या गावी परतले. त्यातील काहींना संसर्ग झाला होता, हा एक भाग झाला. परदेशातून त्याच काळात आलेल्या सुमारे वीस लाख प्रवाशांपैकी काहींना संसर्ग झाला होता. त्यातूनही तो विषाणू संसर्ग करून राहिला. हे जगभर झाले तसे भारतातही झाले. त्यात देश, त्याच्या सीमा आणि जात, धर्म, समूह यांचा काही भेदभाव राहिला नाही.
अशा पार्श्वभूमीवर सारा देश एकवटून इतर कोणतेही वाद, राजकारण, द्वेष भावना न काढता एकसंधपणे लढत राहिला पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्य सूर्याची पहाट होत असताना भारत- पाकिस्तानच्या फाळणीने ती पहाटच रक्तरंजित झाली होती. काश्मीरच्या प्रश्नावरून टोळीयुद्ध सुरू झाले होते. महात्मा गांधी यांच्या सूचनेवरून या पाकिस्तानच्या टोळ्यांविरुद्ध लष्करी कारवाई करण्यात आली. ही अशांततेची स्वातंत्र्य पहाट होती. चीनचे आक्रमण झाले. १९६५ ला पाकिस्तान विरुद्ध युद्ध झाले. १९७१ ला पूर्व विरुद्ध पश्चिम पाकिस्तानच्या युद्धात भारताने उडी घेऊन ते बांगला स्वातंत्र्याचे युद्ध भारताने जिंकून आणले. १९७२च्या सार्वत्रिक दुष्काळाने भारत देश होरपळून निघाला. आणीबाणीने लोकशाहीच्या अस्तित्वासाठी संपूर्ण देशातील तुरुंग भरून गेले आणि पुन्हा एकदा मतदारांनी रक्त न सांडता स्वातंत्र्याच्या पहाटेचे दर्शन घडविले. पंजाब आणि आसामच्या अनुक्रमे स्वतंत्र खलिस्तानसाठीच्या तसेच परकीय नागरिकांच्या प्रश्नांवर देश हादरून गेला. रक्तरंजित इतिहास लिहिला गेला. देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. अफगाणिस्तान,
श्रीलंका, पाकिस्तान, आदी शेजारच्या देशात अतिरेक्यांच्या कारवाईची झळ भारताला सतत बसत राहिली. त्यात हजारो जवान शहीद झाले. राजीव गांधी या माजी पंतप्रधानांची हत्या झाली. पंजाब आणि आसाममधील रक्तरंजित दंगल समन्वयाने शांत करण्यात महत्त्वाचा पुढाकार घेणाऱ्या नेत्याचीच हत्या चेन्नईपासून चाळीस किलोमीटर असलेल्या श्रीपेरूम्बुदूर येथे झाली. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतरच्या शीखविरोधी दंगलीने फाळणीच्या कटू आठवणी ताज्या झाल्या. अतिरेकी कारवायांनी देशात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट होत राहिले. संसदेवरच अतिरेक्यांची हल्ला करण्यापर्यंत मजल गेली. तत्कालीन पंतप्रधान सुरक्षित आहेत ना, याची काळजी तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी वाहिली, तेव्हा या देशाला कोणी हरवू शकत नाही, असे भावोद्गार अटलबिहारी वाजपेयी यांनी काढले होते. कारगिलची कुरापत भारतीय सैनिकांनी मोडून काढली. अन्नधान्यासाठी हा देश कटोरा घेऊन जगाच्या बाजारात जात होता, तेव्हा जनावरांसाठी तयार केलेले धान्य देण्यात येत होते.
अशी गंभीर संकटांची किंवा हल्ल्यांची मालिका पाहिली की, त्या-त्यावेळी या देशातील सामान्य नागरिक एक होऊन उभा राहिला आहे. ही आपलेपणाची राष्ट्रभावना स्वातंत्र्यलढ्याची देण आहे. आपल्या स्वातंत्र्यलढ्याने काय दिले? मतदानाचे स्वातंत्र्य, आपले सरकार आपणच निवडण्याचे स्वातंत्र्य की, कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य, स्वत:चा विकास स्वत:चे कौशल्य वाढवून करण्याचे स्वातंत्र्य? हेच काय स्वातंत्र्य? मला वाटते, आपल्या स्वातंत्र्यलढ्यात जो एक वैचारिक संघर्षही झाला, त्यातून उभारलेला राष्ट्रवाद किंवा राष्ट्रभावना ही सर्वांत मोठी देण आहे, त्यामुळे जेव्हा जेव्हा माणसांवर किंवा देशावर संकट आले, तेव्हा या देशातील सामान्य माणूस प्रसंगी पोटाला चिमटा लावून एकसंध झाला. संकटाविरुद्ध सामना केला. समाज, त्या समाजातील लोक, देश, आपला प्रांत, आपली जनता याला महत्त्व दिले. त्यासाठी एकजूट करून संकटावर स्वार होऊ इच्छिणाºया महानायकांच्या पाठीशी राहिला आहे. युद्ध, दुष्काळ, महामारी, अतिरेक्यांच्या कारवाया, हत्याकांडे, भूकंप, महापूर, आदी संकटांवर यशस्वी मात केली आहे.
यासाठी संघर्ष केला, त्याग केला. जीव पणाला लावला. पंजाब किंवा काश्मीर, श्रीलंकेतील शांतिसेनेची कारवाई यात किती सामान्य कुटुंबांतील जवान शहीद झाले. अनेक गावांच्या प्रवेशद्वारांच्या कमानी त्या शहीद जवानांच्या
नावाने दिमाखात आज उभ्या आहेत. खंत नाही, तर अभिमानच वाटतो. राष्ट्रीय चळवळीने जो वारसा दिला आहे, त्याच बळावर प्रत्येक संकटावर आपण मात केली आहे आणि हा अठरापगड जाती, धर्मांचा, विविध भाषा, पेहराव, खानपान, चालीरीती, संस्कृती असणारा देश एकसंध झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्व मतभेद, मतभिन्नता बाजूला सारून एकमेकांचे हात धरले पाहिजेत. हे संकट परकीय नाही, स्वदेशी नाही, कोणा धर्माचे नाही, कोणत्या पक्षाच्या राजकारणाचे नाही, अशी कारणे देण्यात येणारी कित्येक संकटे आली आणि त्यावर मातही केली गेली. आता आपण एक होऊया. उद्धव ठाकरे यांना बळ द्या, यासाठीच म्हणायचे की, ते केवळ एकटे या संकटावर मात करू शकणार नाहीत. मात्र, आज ते महाराष्ट्राचे नेतृत्व करताहेत. तेच आजच्या घडीला नायक आहेत. तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार चालवित आहेत. कोरोनाने पृथ्वीवरच्या सर्वच देशांना ग्रासले आहे. तसे आपल्याही देशाला ग्रासले आहे. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र अधिक संकटात येणार आहे. आला आहे. मुंबई महानगरी ही देशाची आर्थिक राजधानी आहे. ही मायानगरी सर्वांनाच पोटात घेते.
आता तोच सातत्याने पोटात घेण्याचा चांगुलपणा अडचणीचा ठरला आहे. मायानगरीत कोणीही उपाशी झोपत नाही, असे अभिमानाने मुंबईकर त्या चांगुलपणाचे वर्णन करतात. देशभरातील लोक हाती कोणतेही उत्पन्नाचे साधन नसेल, तर त्यांची पावले त्यांना मायानगरीकडे घेऊन येतात. देशात सर्वाधिक संकट मुंबईवर आले आहे. या नगरीच्या लोकसंख्येची घनता फार आहे. तेथे लोक दाटीवाटीने राहतात. त्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळा, असे सांगणे म्हणजे पाण्याला पेट घेण्यास लावण्यासारखे आहे. मुंबईप्रमाणेच पुणे आणि नागपूर ही महानगरेही संकटात आली आहेत. महाराष्ट्राला अधिक बळकटी देणारी शहरे संकटात आली, तर उद्याचा महाराष्ट्र पुढे कसा सरकणार आहे? यासाठी उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करायला हवेत. त्यांना आता २८ मेपर्यंत विधिमंडळाचे सदस्य व्हावे लागणार आहे. ते झाले नाहीत, तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल. कोरोनामुळे कोणत्याही सार्वत्रिक निवडणुका घ्यायच्या नाहीत, असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे, अन्यथा ते कोठूनही सहज निवडून आले असते. आता एकमेव मार्ग आहे की, राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या विधान परिषदेच्या दोन जागा रिक्त आहेत. त्यापैकी एका जागेवर त्यांची नियुक्ती करा, अशी विनंती राज्य मंत्रिमंडळाने केली आहे, ती राज्यपालांनी मान्य करायला हवी. भाजपने त्याला आढेवेढे घेऊ नये. आजच्या घडीला तरी महाराष्ट्रात महाआघाडीला आणि त्या आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांना पर्याय नाही. अशा संकटकाळात भाजपने राजकारण न करता उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर नियुक्त करावे, अशी मागणीच राज्यपालांकडे करावी. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील सुसंस्कृतपणा पुन्हा एकदा अधोरेखित होईल.
गावगाडा सोडून मुंबई, पुण्यात येणारी माणसं सुखाने जगतात का? नरकयातना देणारे जगणे त्या महानगरात जगतात. अशांना मदत करण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने एकवटले पाहिजे. उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून खाली खेचण्याची खेळी खेळण्याची ही वेळ नव्हे. उलट त्यांना सद्य:स्थितीत बळ देऊ करणे, खांद्याला खांदा लावून लढण्याची ही वेळ आहे. संपूर्ण महाराष्ट्राने मागणी करायला हवी की, ‘‘तुम्ही महाराष्ट्राचे राज्यपाल आहात. आमची इच्छा आहे की, अशा संकटकाळात महाराष्ट्राला राजकीय अस्थिरता पाहावी लागणे योग्य नाही. तेव्हा मुख्यमंत्र्यांना
विधानपरिषदेवर नियुक्त करा.’’ राजकारण नंतर खेळता येईल, ते जनतेला विचारून किंवा सांगून थोडेच खेळता? अन्यथा रात्रीत कारभार केला नसता आणि सूर्याची किरणं लोकांच्या अंगणात पडण्यापूर्वी शपथविधी घडवून आणला नसता. महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे. त्याला सह्याद्री म्हणतात. हाच सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून जातो, हा इतिहास आहे. एवढे सांगून, लिहून आणि बोलूनदेखील काही आक्रीत घडले तर ते घडवून आणणारे निर्दयी आहेत, त्यांना राज्यातील जनता माफ करणार नाही.
उद्धव ठाकरे या महासंकटाच्या काळात कुटुंबप्रमुखाप्रमाणे सर्वांना विश्वासात घेण्यासाठी संवाद करीत आहेत. कट्टर हिंदुत्ववादी म्हणणारा हा शिवसैनिक आज ‘जात, धर्म, आदींच्या भिंती सोडून द्या, विसरून जा, एक व्हा’ म्हणतो आहे. त्यातच महाराष्ट्राचा गौरव आहे. सत्यशोधक प्रबोधनकारांचे नातू म्हणून ते शोभून दिसत आहेत. त्यांना बळ देऊ या!
फासावर जाण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी!
वसंतराव नाईक महाराष्ट्राचे सलग साडेअकरा वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांच्याच कारकिर्दीत १९७२ चा दुष्काळ महाराष्ट्राने अनुभवला आहे. अन्नधान्याचा तुटवडा होता. अमेरिकेने दिलेली सुकडी खाऊन महाराष्ट्राच्या जनतेने कोणताही दंगाधोपा न करता, धार्मिक वादविवाद न घालता सरकारला सहकार्य केले. दगड फोडून श्रम करून मजुरी घेतली. ते फुकट घरी बसून राहिले नाहीत. तेव्हा महाराष्ट्राला अन्नधान्याच्या पुरवठ्यात स्वयंपूर्ण करणार, अशी शपथ वसंतराव नाईक यांनी घेतली. त्याची घोषणा पुण्यातील शनिवारवाड्यासमोरील पटांगणावर झालेल्या सभेत केली होती. ‘‘महाराष्ट्र जर अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला नाही, तर या शनिवारवाड्यासमोर मला जाहीर फाशी द्या,’’ अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. सुकडी खाऊन दगड फोडणारी जनता आणि जनतेला दोनवेळचे अन्न मिळावे, यासाठी कष्ट घेण्यास तयार असणारा नायक फासावर जाण्याची प्रतीज्ञा करतो. तसे महाराष्ट्राला वचन देतो. ही मराठी माणसांची परंपरा आहे.
मोरारजी देसाई विधानपरिषदेवर
मुंबई प्रांत विधानसभेची तिसरी निवडणूक लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीबरोबर १९५२ मध्ये झाली होती. मुंबई प्रांत हा कारवार-धारवाडपासून गुजरातच्या कच्छपर्यंत पसरला होता. सुरतमधून मोरारजी देसाई विधानसभेची निवडणूकलढवित होते. समाजवादी पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे पुतणे अमूल मगनलाल देसाई यांनी त्यांचा पराभव केला. काँग्रेस पक्षात आणि मुंबई प्रांतात दबदबा असणाऱ्या मोरारजीभाई यांची नेतेपदी निवड झाली. मुख्यमंत्री म्हणून विधिमंडळाच्या सदस्यत्वासाठी राज्यपालांनी त्यांची विधानपरिषदेवर नियुक्ती केली, हा महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा इतिहास आहे.
जागर-- विशेष