वाचनीय लेख - जुन्याच विषयांना नवी फोडणी देणे ही तंत्रशिक्षणाची थट्टा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 06:05 AM2023-04-27T06:05:00+5:302023-04-27T06:05:27+5:30

नवे शैक्षणिक धोरण येऊ घातले आहे. तिथेही अनेक पातळ्यांवर धरसोड वृत्ती, संभ्रम, गोंधळ आहे. त्यासाठीची मूलभूत तयारी कोणीच, कुठेही केलेली दिसून येत नाही.

Giving a new twist to old subjects is a mockery of technical education! | वाचनीय लेख - जुन्याच विषयांना नवी फोडणी देणे ही तंत्रशिक्षणाची थट्टा!

वाचनीय लेख - जुन्याच विषयांना नवी फोडणी देणे ही तंत्रशिक्षणाची थट्टा!

googlenewsNext

डॉ. विजय पांढरीपांडे

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) पुन्हा दरवाजे म्हणजे फ्लड गेट्स उघडले आहेत. मध्यंतरी नवे कोर्सेस, नव्या तुकड्या मंजुरीला मान्यता देण्याचे थांबले होते. कोरोना काळात तसेही सर्वच शिक्षणाचे गाडे थांबले होते. आता गेल्या दोन वर्षांत गाडी रुळावर येताच व्यावसायिक शिक्षणाचा धंदा करणारी माणसे कामाला लागलेली दिसतात! गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक राज्यात इंजिनिअरिंगच्या हजारो जागा रिकाम्या राहतात. जे पदवीधर बाहेर येतात, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, किंबहुना हे विद्यार्थी आजच्या आयटी किंवा इतर उद्योगांसाठी उपयोगाचे नाहीत, अशी कंपन्यांची तक्रार आहे. मग, अशा परिस्थितीत AICTE हा उद्योग कशासाठी करते, यामागची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे.

अनेक दशकांपूर्वी जेव्हा संगणक, आयटी क्षेत्रात नवे वारे सुरू झाले तेव्हा प्रत्येक कॉलेजात कॉम्प्युटर, आयटी उद्योगासाठी गरज म्हणून असेच कोर्सेस वेगवेगळ्या नावाने सुरू झाले. त्याकाळी वेगळे कॉम्प्युटर विभाग नव्हतेच. अगदी आयआयटीतदेखील इलेक्ट्रिकल विभागच असे... अजूनही खरगपूर सोडले तर इतर जुन्या आयआयटीत इलेक्ट्रॉनिक विषयाचा वेगळा विभाग नाही. पण, काळाची गरज ओळखून असे नवे विभाग सुरू झाले. इंजिनिअरिंगचे शिक्षण खासगी संस्थांच्या, राजकारणी पुढाऱ्यांच्या हातात गेल्यापासून चित्रच पालटले. नव्या नावांनी स्पेशल कोर्सेस, विभाग सुरू झाले. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, आयटी, टेलिकम्युनिकेशन असे कोणतेही दोन शब्द वापरून नवे विभाग सुरू झाले. काळाची गरज ओळखून अभ्यासक्रम तयार करणे, त्याला पूरक नव्या प्रयोगशाळा उभारणे, अशा आवश्यक गोष्टींना प्राधान्य न देता फक्त जागा वाढविणे, कॅपिटेशन फी, मॅनेजमेंट कोटा या नावाखाली लाखो - करोडोंची कमाई करणे यालाच प्राधान्य होते. आता तीन - चार दशकांतदेखील या बाबतीत फारसा फरक पडलेला नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग असे अत्याधुनिक कोर्सेस चक्क स्वतंत्र विभाग म्हणून सुरू झाले. पण, या विषयाचे सखोल ज्ञान असलेली तज्ज्ञ प्राध्यापक मंडळी कुठे आहेत? मुळात सगळे जुनेच विषय, जुनेच अभ्यासक्रम शिकवायचे, अन् फोडणी दिल्यासारखे नवे काही, कसेतरी शिकवायचे, असा प्रकार सुरू आहे.

आता पुन्हा नवे कोर्सेस, नव्या तुकड्यांना मान्यता, जागावाढ हा घाट कशाकरिता घातला जातोय? एकीकडे नव्या उद्योगांना पूरक, कौशल्य असलेले कसे, किती इंजिनिअर्स हवे आहेत, त्यांना कोणत्या विषयाचे ज्ञान द्यायला हवे, त्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणायचे कुठून, याचा सखोल अभ्यास कुणी केलाय का? अजूनही सिव्हिल, मेकॅनिकल अशा जुन्या विषयांचे महत्व कमी झाले असे नाही. आयटी, एआय म्हणजेच भविष्य अन् बाकीचे विषय कमी गरजेचे असेही नाही. उलट आता आंतरशाखीय विषयांची गरज आहे. एका विषयात स्पेशलायझेशनचे दिवस गेलेत. सर्वच विषयाचे थोडे थोडे ज्ञान आवश्यक आहे. किंबहुना नव्या पिढीला सोशल सायन्स, मॅनेजमेंट, पर्यावरण, अर्थशास्त्र, नैतिकता, समाजाचे मानसशास्त्र, एकत्र टीममध्ये काम करण्याचे, संवाद साधण्याचे कौशल्य हे सारे गरजेचे आहे. आयटीची बुम आली, धावा आयटीकडे, आता एआय, एमएलची हवा आहे... घ्या हे विषय, अशा हास्यास्पद गोष्टी सुरू आहेत. परदेशात विद्यापीठे काही बदल करायचे तर पुढील दोन तीन दशकांच्या गरजांचा अभ्यास करतात. 

आता तर नवे शैक्षणिक धोरण येऊ घातले आहे. ते जास्त डीमांडिंग, चॅलेंजिंग आहे. तिथेही संस्था चालकांची, विद्यापीठांची, धरसोड वृत्तीच दिसून येते. संभ्रम आहे, गोंधळ आहे. नव्या आव्हानांसाठी नव्या दमाची, नवा विचार स्वीकारणारी तज्ज्ञ मंडळी लागतील. अभ्यासक्रम डिझाइन करणे, नवे विषय नव्या पद्धतीने शिकवणे, नवी परीक्षा पद्धत स्वीकारणे, नवे कौशल्य आत्मसात करणे, नव्या आधुनिक प्रयोगशाळा उभारणे यासाठी उत्साहाने भारलेली, कष्ट करण्याची तयारी असणारी, शिक्षकांची पिढी हवी आहे. जागावाढीचे फ्लड गेट्स उघडण्याआधी हा सगळा विचार गांभीर्याने करणे जास्त गरजेचे आहे.

(लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरुआहेत)

Web Title: Giving a new twist to old subjects is a mockery of technical education!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.