महादुर्बिणीचे वैश्विक योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2016 03:57 AM2016-03-03T03:57:40+5:302016-03-03T03:57:40+5:30

अनंत, अथांग आणि अनाकलनीय अशा अंतरिक्षाचे गूढ अवघ्या विश्वाला आहे. अद्याप जिथे प्रत्यक्षात पोहोचता आलेले नाही व इतक्यात ती शक्यताही नाही अशा अंतरिक्षाचा शोध

Global contributions to the Great Depression | महादुर्बिणीचे वैश्विक योगदान

महादुर्बिणीचे वैश्विक योगदान

Next

अनंत, अथांग आणि अनाकलनीय अशा अंतरिक्षाचे गूढ अवघ्या विश्वाला आहे. अद्याप जिथे प्रत्यक्षात पोहोचता आलेले नाही व इतक्यात ती शक्यताही नाही अशा अंतरिक्षाचा शोध घेण्यासाठी मात्र आधार घ्यावा लागतो तो महादुर्बिणींचाच.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद या गावी उभारलेल्या जीएमआरटी (जायंट मीटरवेव्ह रेडिओस्कोप टेलिस्कोप)चे योगदान भारतासाठीच नव्हे तर अवघ्या जगासाठी अत्यंत मोलाचे आहे. येथील शास्त्रज्ञांनी खगोलशास्त्राच्या क्षेत्रात केलेली कामगिरी, उलगडलेली नवी रहस्ये आणि त्यातून खगोलविश्वाचे झालेले नवे ज्ञान साऱ्या जगाने आजवर नावाजलेले आहे. खगोलशास्त्रातील हे योगदान दुर्लक्षून पुढे जाणे आता शक्य नाही. त्यामुळेच जगभरातील दहा मोठे देश एकत्रित येऊन जीएमआरटीच्या क्षमतेपेक्षा ३० पट अधिक क्षमता असणारा 'स्का' नावाचा एक महाप्रकल्प हाती घेत असताना त्यांनी या महाप्रकल्पाला मार्गदर्शक म्हणून जीएमआरटीला मानाचे स्थान दिले आहे. जीएमआरटीचा या क्षेत्रातील प्रदीर्घ आणि लक्षणीय अनुभव लक्षात घेऊन ही धुरा सोपवण्यात आली आहे. प्रत्येक पुणेकराचा, महाराष्ट्राचा व अवघ्या देशवासियांचा ऊर अभिमानाने भरून यावा अशीच ही सुखद घटना आहे. भारतीय वैज्ञानिकांनी व खगोलशास्त्रज्ञांनी जीएमआरटीच्या माध्यमातून जे मुलभूत संशोधन केले आहे आणि या क्षेत्रासाठी जे योगदान दिले आहे, त्याची योग्य दखल घेत अवघ्या जगाने त्यावर आता शिक्कामोर्तब केले आहे, याचेच द्योतक म्हणजे हा मानाचा तुरा आहे.
या 'स्का' प्रकल्पामध्ये दहा देशातील ३०० पेक्षा अधिक जाणकार खगोलशास्त्रज्ञ कार्यरत राहणार आहेत. त्यांच्या संशोधनाला योग्य दिशा देण्यासाठी जीएमआरटी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असल्याने भारताकडून जगाला फार मोठ्या अपेक्षा आहेत. जीएमआरटीच्या वाटचालीचा मागोवा घ्यायचा म्हटले तर, वैज्ञानिक संस्कृतीचे जनक डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी मुंबईत १९४५ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) ही संस्था स्थापन केली. जागतिक दर्जाचे संशोधन घडावे या हेतुने त्यांनी परदेशात गेलेल्या तरुण आणि बुध्दिमान संशोधकांना स्वदेशी बोलावले. त्यातूनच डॉ. गोविंद स्वरुप यांच्यासारखे तरुण मायदेशी परत आले. डॉ. स्वरुप यांनी जीएमआरटीचा पहिला प्रस्ताव १९८४ मध्ये सादर केला. डॉ. विजय कपाही यांनीही महत्वाची भूमिका निभावली. अमेरिकेतील त्यावेळच्या सर्वात मोठया व्हेरी लार्ज अँरेपेक्षा (व्हीएलए) तिप्पट आकाराच्या ठरणाऱ्या या प्रकल्पाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले. पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाच्या आधारे प्रकल्पाची निर्मिती केली.
जीएमआरटी दुर्बिणीच्या माध्यमातून सर्वप्रथम सूर्याचे निरीक्षण केले. या यशस्वी कामगिरीनंतर जीएमआरटीने तामिळनाडू मधील उटी येथे प्रकल्प उभारणीसाठी योगदान दिले. खगोलविश्वाचे गूढ उलगडण्यात मोठा हातभार लावला. विशेष म्हणजे भारतातील रेडिओ खगोल शास्त्राला याचवर्षी ५३ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जीएमआरटीला मिळत असलेले मानाचे स्थान अभिमानास्पद आहे. जगभरात जे विविध क्षेत्रात संशोधन होत असते, त्यामध्ये भारतातील शास्त्रज्ञ व वैज्ञानिकांनी कायमच स्वत:चा ठसा उमटवला आहे. विज्ञान वैभवात भर घालून संपूर्ण जगात आपल्या देशाची वैज्ञानिक क्षमता वाढविण्यात व अस्मिता उंचावण्यात जीएमआरटी प्रकल्पाचा निश्चितच मोलाचा वाटा आहे. संचालक प्रा. यशवंत गुप्ता व मुख्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जे. के. सोळंकी यांच्या खांद्यावर सध्या जीएमआरटीची धुरा आहे. जगातील एक महाकाय दुर्बिण आणि त्यातून समोर येणारे मौलिक संशोधन यामुळे जीएमआरटीचे नाव जगात सन्मानाने घेतले जातेच त्यात आता जागतिक स्तरावरच्या एका भव्य आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पात मार्गदर्शकाच्या नव्या भूमिकेतही जीएमआरटी 'विश्वाचे आर्त' उलगडण्यात निश्चितपणे सर्वोत्तम योगदान देईल असा विश्वास आहे.
- विजय बाविस्कर

Web Title: Global contributions to the Great Depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.