वंशभेदाच्या विषवल्लीचे जागतिकीकरण

By admin | Published: March 12, 2017 01:21 AM2017-03-12T01:21:40+5:302017-03-12T01:21:40+5:30

जगभरात वंशभेदाची विषवल्ली वेगाने फैलावते आहे. याची झळ भारतीयांना बसत आहे. अमेरिकेत सध्या ही द्वेषाची किनार अधिक गडद होते आहे. ज्या देशाचा पायाच स्थलांतरितांवर

Globalization of ethnic poison | वंशभेदाच्या विषवल्लीचे जागतिकीकरण

वंशभेदाच्या विषवल्लीचे जागतिकीकरण

Next


- प्रा. संदीप चौधरी

जगभरात वंशभेदाची विषवल्ली वेगाने फैलावते आहे. याची झळ भारतीयांना बसत आहे. अमेरिकेत सध्या ही द्वेषाची किनार अधिक गडद होते आहे. ज्या देशाचा पायाच स्थलांतरितांवर उभा आहे तेथील लोकांनी इतर देशांतील लोकांवर जीवघेणे हल्ले करावेत हा मोठा विरोधाभास आहे. जागतिकीकरणाचा उगम अमेरिकेत झाला तिथेच विरोधाभास ठळक स्वरूपात उमटतो आहे. गेल्या महिन्याभरातल्या घटनांचे निरीक्षण केले तरी हे लक्षात येऊ शकेल.

जागतिकीकरण ही केवळ आर्थिक किंवा व्यापारविषयक संकल्पना नसून तिला सामाजिक आणि सांस्कृतिक आयामदेखील आहेत हे आता सिद्ध झाले आहे. जागतिकीकरणाचे सारतत्त्व म्हणजे स्थानिक गोष्टींचे महत्त्व जागतिक पातळीवर वाढणे आणि प्रसार जगभर होणे होय. जागतिकीकरणामुळे स्थानिक वस्तू, व्यापार, स्थळे, संस्कृती यांचे जगभरात प्रसरण होते. जागतिकीकरणाचा विरोधाभास म्हणजे इतर गोष्टींची व्यापकता वाढत असताना माणसांची मने मात्र संकुचित होत आहेत. हे जगभरातील अनेक घटनांवरून स्पष्ट होत आहे. सध्या अमेरिकेत सुरू असलेले स्थलांतरितांविषयीचे धोरण हे स्पष्ट करते. प्रत्येक देशाला विविध बाबतींत आपली धोरणे निश्चित करण्याचा अधिकार आहे. मात्र त्याला द्वेषाची किनार असता कामा नये. अमेरिकेत सध्या ही द्वेषाची किनार अधिक गडद होताना दिसते आहे.
अमेरिकेतील कन्सास येथे वांशिक द्वेषातून श्रीनिवास कुचिभोटला या भारतीय इंजिनीअरची अ‍ॅडम प्युरिंटन या माजी नौसैनिकाने गोळ्या झाडून हत्या केली. प्युरिंटन याने कुचिभोटलावर मध्यपूर्वेतील देशांमधून आलेला स्थलांतरित समजून हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. हा जीवघेणा हल्ला वंशद्वेषातूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्याचा तपास ‘वांशिक हल्ला’ म्हणूनच करीत असल्याचे अमेरिकन तपास यंत्रणेने म्हटले आहे. हे प्रकरण ताजे असतानाच दीप राय या शीख व्यक्तीवर हल्ला करण्यात आला. ‘गो बॅक टू युवर कंट्री,’ असे किंचाळत या व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडली, त्यात दीप राय जखमी झाले. आणखी एका घटनेत अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना राज्यातील लॅनकास्टर कंट्री येथे हरनीश पटेल या भारतीय वंशाच्या दुकानदारावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली.
न्यू यॉर्कमध्ये भारतीय वंशाच्या एकता देसाई या तरुणीलाही वर्णद्वेषी शेरेबाजीला सामारे जावे लागले. एकता ट्रेनने आॅफिसला जात असताना त्याच ट्रेनमध्ये असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने तिच्याशी वाद घालत ‘अमेरिकेतून चालती हो,’ असे एकताला बजावले. यासोबतच अमेरिकेतील कोलोरॅडोमध्ये पीटन शहरात एका भारतीयाच्या घरावर वांशिक द्वेषाने भरलेले संदेश लिहिल्याची घटना उघडकीस आली आहे. न्यू झीलंडमधील आॅकलंड येथे नरिंदरवीर सिंग या पंजाबी व्यक्तीला एका व्यक्तीने पंजाबी व्यक्तींना उद्देशून अपशब्द उच्चारले आणि ‘तू मायदेशी निघून जा,’ असेही त्याने ओरडून सांगितले. मागील वर्षी भारतीय विद्यार्थ्यांवर आॅस्ट्रेलियामध्ये हल्ले झाले होते. ही सध्या काही अपवादात्मक उदाहरणे असली तरी भविष्यातील मोठ्या संघर्षाची चाहूल आहे.
जगभरातही अशीच स्थिती आहे मध्यपूर्वेतील मुस्लीम राष्ट्रांमधील शिया विरुद्ध सुन्नी यांच्यातील संघर्ष हा याचाच परिपाक आहे. श्रीलंकेतील तमिळविरुद्ध सिंहली यांच्यातील प्रदीर्घ लढाई ही वांशिक भेदाचे अपत्य आहे. काही वर्षांपूर्वी फिझी या लहानशा देशात भारतीय वंशाचे प्रधानमंत्री महेंद्र चौधरी यांना त्यांच्या मंत्रिमंडळासहित जॉर्ज स्पेईट या स्थानिक नागरिकाने संसदेत कोंडून ठेवले होते. भारतीय वंशाच्या लोकांनी येथून चालते व्हावे, असा इशारा त्याने दिला होता.
‘स्थानिक’ विरुद्ध ‘उपरा’ असे वाद जगभर सुरू असतात. त्याला खतपाणी घालण्याचे काम ‘भाषणबाज’ नेते मंडळी करताना दिसतात. अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल या मानवी हक्कांच्या जपणुकीसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे. १५९ देशांचा संदर्भ घेऊन हे अध्ययन केले आहे. या अहवालानुसार जगभरात वंशभेदाच्या आधाराने हिंसा वाढली आहे. गल्लीपासून तर जागतिक स्तरापर्यंतचे नेते ‘भूमिपुत्र’ या संकल्पनेच्या नावाखाली स्थानिक नागरिकांची माथी भडकावण्याचे काम करीत असतात. वंशभेदाच्या घटना या केवळ परदेशातच घडतात असा गैरसमज कोणी करून घेण्याचे काही कारण नाही. वंशभेदाची अनेक लघुरूपे आपल्या आसपास अनुभवायला मिळतात. सामाजिक मानवशास्त्राच्या दृष्टीने ही तुलना कदाचित गैरलागू होईल; परंतु दोन्हीचा परिणाम मात्र सारखाच आहे. ही लघुरूपे कधी जाती द्वेषाच्या रूपाने खैरलांजी अथवा कोपर्डीत दिसतात; कधी भाषिक संघर्षाच्या स्वरूपात बेळगावात पाहायला मिळतात; तर कधी प्रदेशवादाच्या नावाने मुंबई किंवा गुवाहाटीत समोर येतात. यूपी आणि बिहारच्या ‘भय्या’ला झोडपून काढणारा महाराष्ट्रीय ‘दादा’ ही त्याच विखारी भेदाची विषारी फळे असतात.
लुडविग गुम्प्लोविच्झ या तत्त्ववेत्त्याने ‘स्व-समूह श्रेष्ठतावाद’ ही संकल्पना मांडली आहे. त्याच्या मते, ‘प्रत्येक व्यक्ती ही आपल्या समूहाबद्दल, भाषेबद्दल, धर्माबद्दल आणि संस्कृतीबद्दल अभिमान बाळगून असते. हा अभिमान जेंव्हा टोकाचा होतो तेंव्हा इतरांची संस्कृती ही तुच्छ समजली जाते आणि आपलाच समूह कसा उत्तम आहे अशी भावना निर्माण होते. ‘स्व-समूह श्रेष्ठतावादी मानसिकतेतून इतर समूहातील व्यक्ती या दुय्यम समजल्या जातात. इतर धर्मीय, इतर भाषिक, इतर देशातील नागरिक, इतर वंशीय लोक यांच्याविषयी तिरस्कार निर्माण होतो. अनेकदा याला इतर समूहातील लोकांविषयी, त्यांच्या प्रगतीविषयी असलेली ‘असूया’ कारणीभूत असते. स्वत:विषयी निर्माण झालेली असुरक्षितता इतरांमुळे झाली असा भ्रम निर्माण होतो. स्वत:च्या मर्यादांसाठी इतर समूहातील सदस्यांना दोषी ठरविले जाते. त्यातूनच सुरू होते जीवघेण्या हल्ल्यांची मालिका. मग ती अमेरिकेत असो, आॅस्ट्रेलियात असो की भारतात असो.
जंगली श्वापदांना लाजवेल असे कृत्य सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या माणसांकडून केले जाते. हिंसा हा वंशभेदाचा अंतिम पर्याय आहे असे मानले जाते. वंशभेदाचे टोकाचे उदाहरण म्हणून हिटलरच्या अमानुष कृत्याकडे पाहिले जाते. हिटलरच्या नाझीवादाचे भयावह स्वरूप जगाने अनुभवले आहे. हिंसेतून सर्व प्रश्न त्वरित सुटतील अशी पोकळ आणि अर्थहीन मांडणी केली जाते. हिंसेतून जगातील कोणतेच प्रश्न सुटू शकले नाहीत. उलटपक्षी हिंसा आणि द्वेषातून अनेक प्रश्न निर्माण होत असतात हेच जगाच्या इतिहासात वारंवार सिद्ध झाले आहे.
भेदाचे आणि द्वेषाचे हे तत्त्वज्ञान सहज पसरते हे एक मानसशास्त्रीय वास्तव आहे. जे माणसातील माणूसपण विसरून पशुत्व धारण करते. विखारी मानसिकता बनण्याची अनेक कारणे आहेत त्यापैकी आर्थिक कारण हेदेखील महत्त्वाची भूमिका बजावित असते. तथाकथित भूमिपुत्रांना भावनिक उन्मादात नेऊन सोडण्यापेक्षा त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. उपरे म्हटले जाणारे हे अधिक परिश्रम करीत असतात. ‘पडेल ते काम आणि मिळेल ते दाम’ या तत्त्वाने आपले कौशल्य पणाला लावीत असतात. हे त्यांना समजावून सांगण्याची गरज असते. यासोबतच गरज आहे ती स्थानिक प्रश्न समजून घेण्याची, स्थानिकांच्या क्षमता आणि कौशल्य विकसित करण्याची. कोणतीही नोकरी अथवा व्यवसाय हा सन्माननीय असतो हे सांगण्याची. आणि गरज आहे ती माणसातील मानवीयता जपण्याची. माझे तेच छान आणि इतरांचे ते तुच्छ असा वृथा अभिमान सोडण्याची. एवढे मात्र निश्चित की संकुचित ‘समूहवादाकडून’ वैश्विक आणि व्यापक ‘मानवतावादाकडे’ जाण्याचे मोठे आव्हान जगासमोर आहे.

(लेखक हे शैक्षणिक आणि सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Globalization of ethnic poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.