एका मूलग्राही समीक्षकाचे जाणे
By Admin | Published: May 28, 2016 04:12 AM2016-05-28T04:12:30+5:302016-05-28T04:12:30+5:30
गांधी, विनोबा आणि साने गुरुजी यांच्या विचारसृष्टीवर अपार श्रद्धा असलेले आणि साधना या विवेकी नियतकालिकाच्या विकासवाढीची तन-मन- धनाने चिंता वाहणारे महाराष्ट्राचे
गांधी, विनोबा आणि साने गुरुजी यांच्या विचारसृष्टीवर अपार श्रद्धा असलेले आणि साधना या विवेकी नियतकालिकाच्या विकासवाढीची तन-मन- धनाने चिंता वाहणारे महाराष्ट्राचे ज्येष्ठ लेखक रा. ग. जाधव यांच्या निधनाने ठाम विचारांचा पण कमालीच्या संवेदनशील मनाचा मराठी वाङ्मयाचा एक ज्येष्ठ समीक्षक आपण गमावला आहे. आपली हयात आणि घरादारासकटची सारी मिळकत आपल्या विचारांच्या व तो पुढे नेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हवाली करून समाधानाने सारे चांगले शोधत राहण्याची व त्याला आपल्या परीने बळ देण्याची निष्ठा त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत सांभाळली. परिणामी त्यांच्या सदिच्छांचा व उत्साहवर्धक पाठिंब्याचा लाभ झालेले सामाजिक कार्यकर्ते जेवढे त्यांच्या संपर्कात होते, तेवढेच अनेक नवनवे लेखक, लेखिका, कवी, कवयित्री आणि साहित्य प्रांतात काही नवे करू पाहणारे तरुणही त्यांच्याजवळ होते. समीक्षकाला शब्दाएवढीच त्यामागच्या आशयाची जाण असावी लागते. हा आशय खूपदा बहुरंगी, अनेकार्थी व बहुविध छटांनी नटलेला असतो. रा.गं.ची समीक्षादृष्टी हा सगळा आशय त्याच्या शब्दार्थाएवढाच कवेत घेणारी होती. त्याचमुळे ती कमालीची सखोल व प्रत्यक्ष लेखकालाही आपल्या लिखाणातून न उलगडलेले प्रश्न व न सुचलेले विचार त्याच्या लक्षात आणून देणारी होती. मराठीतील समीक्षकांची परंपरा तशीही रोडावत आणि क्षीण होत असताना रा. ग. जाधव यांनी तिची ध्वजा उंच उचलून धरली होती. त्यांच्या समीक्षेचा आणखी महत्त्वाचा विशेष हा की त्यांनी त्यांच्या राजकीय व सामाजिक विचारांवरील श्रद्धांना आपल्या समीक्षेच्या क्षेत्रात उतरू दिले नाही. त्या दोन क्षेत्रातली त्यांची वाटचाल स्वतंत्र आणि समांतर होती. एक अतिशय उत्कृष्ट व विद्यार्थिप्रिय प्राध्यापक हा लौकिक पाठीशी असलेल्या जाधवांनी ५० हून अधिक पुस्तके लिहिली. त्यात समीक्षेची सर्वाधिक असली तरी कविता व ललितबंधांची पुस्तकेही समाविष्ट आहेत. मुंबई-पुण्याकडील प्रथितयश लेखकांइतकेच अमरावती वा भंडाऱ्याकडील नव्याने लिहिणाऱ्यांना त्यांनी आपल्या समीक्षेत स्थान दिले. बोली भाषेचे महत्त्व जपणारे आणि त्या भाषांमधून लेखन करणारे लेखक व कवींविषयीची त्यांना विलक्षण आस्था होती. मात्र जाधवांना राज्यातच नव्हे तर देशात मान्यता मिळवून दिली ती त्यांच्या नवतेबाबतच्या शोधदृष्टीने. १९६० च्या सुमारास दलित साहित्याचा शक्तिशाली प्रवाह मराठी सारस्वतात आला. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करण्याची, त्याला नाके मुरडण्याची किंवा त्याची तोंडभर पण खोटी स्तुती करणाऱ्या उथळ समीक्षकांची संख्या मोठी होती व ती पुढे होती. जाधवांचे मोठेपण हे की त्यांनी आरंभापासून या साहित्यप्रवाहाची गंभीर दखल घेतली. तेवढ्यावर न थांबता हे साहित्य एक दिवस देशाच्या व जगाच्याही वाङ्मयक्षेत्रात मानाचे स्थान मिळवील याची ग्वाही त्यांनी दलित साहित्यिकांना दिली. हीच बाब त्यांनी स्त्रियांच्या लिखाणाबद्दलही केली. स्त्री साहित्य हे साहित्यच नव्हे इथपासून त्यात पुरेसे गांभीर्य नाही, विचार नाही, ते जीवनाला स्पर्श करत नाही किंबहुना स्त्रियांचा बुद्ध्यांकच कमी आहे इथपर्यंतची त्यांच्या लिखाणाची टवाळी अनेकांनी केली व अजूनही ती संपली नाही. रा.गं.चे वैशिष्ट्य हे की त्यांनी स्त्रियांच्या लेखनाचे नुसते स्वागतच केले नाही, तर मानवी आयुष्याची तोवर साहित्यात न आलेली प्रकरणे आणि जाण या साहित्याने समाजाला कशी आणून दिली याविषयीचे मार्गदर्शनच समाजाला केले. समाजाला आपल्याच आयुष्याचा एक मोठा भाग आपल्याला कसा अज्ञात होता याची जाण जशी दलित साहित्याने आणून दिली तशी आपण गृहीत धरलेले घर व स्त्री-पुरुषांसंबंधीचे समज केवढ्या ठिसूळ पायावर उभे होते याचे भान स्त्री साहित्याने समाजाला दिले. या उदयिक क्षेत्रांचे स्वागत करण्याचा पहिला मान मराठीत रा. ग. जाधवांना जातो. या साहित्यातील उणिवाही त्यांनी दाखवून दिल्या. पण त्या दाखविताना त्या साहित्याचा कंद शाबूत राहील याची हळुवार काळजीही त्यांनी घेतली. औरंगाबादच्या साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणातही त्यांनी नव्याने साहित्यक्षेत्रात प्रविष्ट होणाऱ्या व ते क्षेत्र समृद्ध करणाऱ्या लेखक-लेखिकांकडे नुसते कौतुकाने नव्हे तर अभिमानाने व आपलेपणाने पाहण्याचा सल्ला वाचकांना दिला. गांधी विचारांवर अपार श्रद्धा असल्याने आणि संस्कृती हेच साहित्याचे खरे मूल्य असल्याची जाण असल्याने जाधवांनी गांधींच्या मूल्यांएवढीच साऱ्या सांस्कृतिक मूल्यांचीही आयुष्यभर काळजी घेतली. समाजातील पुरोगामी चळवळींचेही ते पाठीराखे होते. साधनाचे नरेंद्र दाभोलकर यांच्यावर त्यांनी एक कवितासंग्रहच लिहिला. दाभोलकर पुण्यात त्यांच्याकडे मुक्कामालाच असत. संस्कृती संवर्धन आणि अंधश्रद्धा निर्मूलन, परंपरागत मूल्ये आणि पुरोगामी दृष्टी यांचा समन्वयच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. अशी माणसे दुर्मीळ असल्याच्या आजच्या काळात जाधवांचे जाणे हे साऱ्यांनाच चटका लावून जाणारे आहे.