गोवा ...तर खाण उद्योग पुन्हा बंद

By Admin | Published: June 11, 2017 01:45 AM2017-06-11T01:45:28+5:302017-06-11T01:45:28+5:30

शासकीय यंत्रणा, न्यायालये, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी गोव्यातील खनिज खाण उद्योग क्षेत्रातील नियमभंगांची गंभीर दखल घेणे सुरू केले आहे.

Goa ... if the mining industry is closed again | गोवा ...तर खाण उद्योग पुन्हा बंद

गोवा ...तर खाण उद्योग पुन्हा बंद

googlenewsNext

- सदगुरु पाटील

शासकीय यंत्रणा, न्यायालये, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी गोव्यातील खनिज खाण उद्योग क्षेत्रातील नियमभंगांची गंभीर दखल घेणे सुरू केले आहे. त्यामुळे खनिज खाण उद्योगाचे भवितव्य पुन्हा एकदा डळमळीत झालेले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक भूमिका घेतल्यामुळेच गोव्यातील बारा खनिज खाणी गेले महिनाभर बंदच आहेत. अन्य खनिज लिजधारकांनाही सध्या कडक चाचणीच्या अग्निदिव्यातून जावे लागत आहे.
गोव्याच्या खाण व्यवसाय क्षेत्रात केवळ गोमंतकीयच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार येथील हजारो व्यक्ती काम करतात. सध्या वार्षिक सरासरी वीस दशलक्ष टन खनिजाची गोव्याहून चीन व अन्यत्र निर्यात होते. २०१२ साली गोव्याचा खनिज खाण व्यवसाय निवृत्त न्या. शहा यांनी दाखवून दिलेल्या हजारो कोटींच्या घोटाळ्यानंतर बंद झाला होता. पण गोव्याचे पर्यावरण, शेती व्यवसाय, जलस्रोत यात खाणबंदीच्या तीन वर्षांच्या काळात लक्षणीय सुधारणा झाली. २०१५ सालानंतर गोव्याचा खनिज खाण व्यवसाय नव्याने सुरू झाला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविण्यापूर्वी ज्या सूचना गोव्याच्या खाण उद्योगाला, खाण खात्याला, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय, इंडियन ब्युरो आॅफ माइन्स व एकूणच सरकारी यंत्रणांना केल्या होत्या, त्या सर्व सूचनांचे पालन झालेले नाही. गोव्यात स्वतंत्र मायनिंग कॉरिडॉरचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव सरकारने पुढे आणला होता; पण त्या आघाडीवर काही घडले नाही.
गोव्यात वार्षिक सरसरी ४५ दशलक्ष टन खनिज उत्पादन होत होते. त्यातून पस्तीस हजार कोटींचा खनिज खाण घोटाळा घडला. पोलिसांची विशेष तपास यंत्रणा (एसआयटी) त्या खाण घोटाळ्यांची चौकशी करत आहे. सत्तेत असताना अनेक वर्षे खाण खाते आपल्याकडे ठेवलेले माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा सध्या एसआयटीने लावला आहे.
सध्या पावसाळा असल्याने खाण व्यवसाय तात्पुरता बंद ठेवला गेला आहे. मात्र, खाण क्षेत्रातील अंदाधुंदी सुरूच राहिली तर पुन्हा गोव्याला पूर्ण खाणबंदीस सामोरे जावे लागू शकते, असे गोवा फाउंडेशन या बेकायदा खाणविरोधी चळवळीतील अत्यंत नावाजलेल्या संस्थेसह अन्य पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

पर्यटनाप्रमाणेच खाण हा गोव्याचा मोठा व्यवसाय असला तरी, सर्वोच्च न्यायालयाने २०१२ साली बंदी लागू करण्यापूर्वी खाण क्षेत्रात जी अंदाधुंदी सुरू होती, तीच स्थिती आता देखील सुरू आहे. खाण व्यावसायिक मुळीच सुधारलेले नाहीत. ही स्थिती अशीच कायम राहिली तर, पुन्हा गोव्याला खाणबंदीस सामोरे जावे लागू शकते.
- डॉ. क्लॉड अल्वारीस, ज्येष्ठ पर्यावरणवादी

खनिज खाण प्रदूषणाचा अनुभव घ्यायचा असेल तर कुणीही खाण व्यवसाय सुरू असताना ‘सोनशी’च्या पट्ट्यात फिरून पाहावे. पर्यावरणाची हानी हा विषय तर आहेच; पण लोकांच्या आरोग्याचे प्रश्न अंदाधुंद खाण व्यवसायामुळे गोव्यात निर्माण झाले आहेत.
- राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी

Web Title: Goa ... if the mining industry is closed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.