Pramod Sawant: गोवा ही देवभूमी आहे, भारताचे बँकॉक नव्हे ! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 05:59 AM2022-04-06T05:59:30+5:302022-04-06T05:59:55+5:30

Pramod Sawant: गोव्यात डॉ. प्रमोद सावंत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. ‘लोकमत’ समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी सावंत यांच्याशी केलेल्या संवादाचा संपादित अंश...

Goa is the land of God, not Bangkok of India! Clear role of Chief Minister Pramod Sawant | Pramod Sawant: गोवा ही देवभूमी आहे, भारताचे बँकॉक नव्हे ! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची स्पष्ट भूमिका

Pramod Sawant: गोवा ही देवभूमी आहे, भारताचे बँकॉक नव्हे ! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची स्पष्ट भूमिका

Next

गोव्यात डॉ. प्रमोद सावंत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. ‘लोकमत’ समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी सावंत यांच्याशी केलेल्या संवादाचा संपादित अंश...  

गोव्यावरचा पोर्तुगीज प्रभाव पुसून टाकून मराठी संस्कृती गौरवशाली करण्याचा विडा उचलला आहे, असे आपण ‘लोकमत’च्या विशेष समारंभात बोलताना म्हणालात. याचा नेमका अर्थ काय घ्यावा ?
गोव्यावर ३५० वर्षे पोर्तुगीजांचे राज्य होते. त्यांनी लोकांचे धर्मपरिवर्तन केले. मंदिरे पाडली, संस्कृती नष्ट केली. आम्हाला हे जुने वैभव पुनरुज्जीवित करायचे आहे. सुंदर समुद्र किनारा आणि चर्च यापुरतीच मर्यादित  असलेली गोव्याची आजची प्रतिमा सर्वव्यापी नाही. इथे गावात मोठी मंदिरे आहेत. आमची धार्मिक परंपरा आहे. ती पुनरुज्जीवित करायची आहे. यासाठी मी गुढीपाडव्याला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या सप्तकोटेश्वर मंदिरात पूजा केली.
- ही निवडणूक रणनीती नाही काय? कारण गोव्याची ६६ टक्के जनता हिंदू व २५ टक्के ख्रिश्चन आहे.
ही निवडणूक नीती नव्हे, आमचा विश्वास आहे. हिंदू परंपरा पुनरुज्जीवित करणे म्हणजे ख्रिश्चन परंपरा नष्ट करणे नाही. सरकारी निधीतून आम्ही चर्चच्या जतनासाठीही निधी दिलेला आहे; परंतु आम्ही लुप्त झालेल्या गोमंतक संस्कृतीला पुनरुज्जीवित करू इच्छितो.

- उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी ‘८० विरुध्द २०’ अशी घोषणा देऊन निवडणूक जिंकली. आपण ‘६६ विरुध्द २५’ अशी नवी घोषणा देत आहात का ? 
अजिबात नाही. आम्ही नरेंद्र मोदी यांची घोषणा ‘सबका विकास’वर विश्वास ठेवतो. गोव्यात धार्मिक आधारावर आपसात कधी विभाजन झाले नाही. माझ्या मंत्रिमंडळात तीन मंत्री कॅथलिक आहेत. आमचे २५ पैकी १५ आमदार कॅथलिक ख्रिश्चन आहेत. गणेशोत्सवात ते आमच्याकडे येतात, ख्रिसमसला आम्ही त्यांच्याकडे जातो.
पण गोव्याचे स्थापत्य, खुली संस्कृती यासाठी जगभरातून लोक इथे येतात त्यावर परिणाम होईल, अशी शंका घेतली जात आहे.. 
जगभरातून गोव्याचे वातावरण, संस्कृती यासाठी लोक येतात, हे आपण बरोबर म्हणता आहात; परंतु तुमची शंका निराधार आहे. आम्ही इथली संस्कृती अक्षय ठेवू. शिवाय संस्कृती, आध्यात्मिक, वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देऊ.

गोवा भारताचे बँकॉक होत आहे, म्हणून हे करणार का? 
नाही, हे खरे नाही. आम्ही गोव्याला देशाची पर्यटन राजधानी करू इच्छितो. आमच्याकडे कॅसिनो आहेत, हे मान्य. मात्र, आम्ही गोव्याला भारताचे बँकॉक नव्हे तर मालदीव करू इच्छितो. भारतातलेच नव्हेत तर जगभरातले लोक मालदीवला जाण्याऐवजी गोव्यात यावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सुंदर साफ समुद्र किनारे असलेली ही देवभूमी- आमचा गोवा भारतीय संस्कृतीचे प्रतीक होईल. त्यासाठी येथे खासगी क्षेत्रातील भागीदारी घेऊन पायाभूत सुविधा पक्क्या करत आहोत.

- गोव्यात सार्वजनिक वाहतूक जवळपास नाहीच; मग हे कसे शक्य आहे? 
आम्ही यावर काम करतो आहोत. केवळ बसेस नव्हे तर टॅक्सी आणि जलवाहतुकीलाही प्रोत्साहन देत आहोत. आता प्रत्येक ठिकाणी टॅक्सी सेवेचा संपर्क नंबर आणि भाडे दाखवणारे बोर्ड लावले जातील. ॲपवर आधारित टॅक्सीही आम्ही चालवणार आहोत.  

- कित्येक वर्षांनंतर आपण खाणी सुरू करणार आहात. यातून पर्यावरण नष्ट होण्याची भीती नाही का? 
नाही. आम्ही पर्यावरणाचे भान ठेवून शाश्वत खाणकाम सुरू करू. यावर्षी ६५० कोटी रुपये खाणकामातून सरकारला मिळतील, असा अर्थसंकल्पातला अंदाज आहे.

- गोव्याच्या विकासाची आपली कल्पना काय?
गोव्यातले दरडोई उत्पन्न देशात सर्वाधिक आहे. साक्षरतेच्या बाबतीत केरळनंतर गोव्याचा नंबर लागतो. स्वास्थ्य वनराजी, पर्यावरण याबाबतीतही गोवा पहिल्या तीन- चार राज्यांत येते. प्रत्येक क्षेत्रात गोव्याला अव्वल स्थानी  आणावे, यासाठी माझे प्रयत्न राहतील.

Web Title: Goa is the land of God, not Bangkok of India! Clear role of Chief Minister Pramod Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.