विवेकवादाचा प्रचार हेच लक्ष्य

By admin | Published: September 6, 2015 04:13 AM2015-09-06T04:13:36+5:302015-09-06T04:13:36+5:30

विवेकवादाला उत्तरे देण्यासाठी मंत्रतंत्र, दैवी शक्ती, अघोरी विद्या याचा प्रयोग मारेकऱ्यांना करता आला नाही. कारण ह्या भोळसट अंधश्रद्धाच आहेत़ त्यांना विचारवंतांना संपविण्यासाठी

The goal of discrimination is the goal | विवेकवादाचा प्रचार हेच लक्ष्य

विवेकवादाचा प्रचार हेच लक्ष्य

Next

- हरीश देशमुख (राष्ट्रीय महासचिव, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नागपूर)

विवेकवादाला उत्तरे देण्यासाठी मंत्रतंत्र, दैवी शक्ती, अघोरी विद्या याचा प्रयोग मारेकऱ्यांना करता आला नाही. कारण ह्या भोळसट अंधश्रद्धाच आहेत़ त्यांना विचारवंतांना संपविण्यासाठी बंदुकीचा चाप ओढावा लागला. नि:शस्त्र माणसावर गोळ्या झाडणारे पळपुटे विजयश्री ठरू शकत नाहीत. बुद्धिप्रामाण्यवाद ही काळाची गरज आहे. सद्विवेकबुद्धीला प्रमाण मानूनच विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे नेणे आणि अंधश्रद्धेला मूठमाती देणे यासाठी वैचारिक आंदोलन चालू ठेवणे हीच हत्या केलेल्या महामानवांना आदरांजली ठरेल.

अंधश्रद्धा निर्मूलन लढ्यात विवेकवादाचा विचार समाजात सातत्याने रुजवित राहणे हेच सामाजिक कार्य आम्ही प्रबोधनात्मक आणि संघर्षात्मक पातळीवर करीत राहणार यात शंका नाही. अनिष्ट प्रथा, सतीची प्रथा, नरबळीसारखे मानवतेला काळिमा फासणारे प्रकार थांबवून प्रगतीवादी, विज्ञाननिष्ठ विचारानेच समाज प्रगत होत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि कर्नाटकचे एम. एम. कलबुर्गी यांची हत्या करणाऱ्यांचा निषेध जेवढा केला जावा तेवढा कमीच आहे. हत्या केल्याने विवेकवादी विचारप्रक्रिया कुणीही थांबवू शकत नाही. याउलट अंधश्रद्धा निर्मूलन कार्य जबाबदारीने करण्याची आम्हा कार्यकर्त्यांची मनोवृत्ती प्रबळ होत असते. विवेकशील वाटचालीत अडथळा आणण्याचा संकुचित आणि एकांगी धर्मवेडेपण बाळगून अटकाव करण्याचा प्रयत्न षंढपणाचा आहे.
समाजातील अंधश्रद्धा, पुनर्जन्म, भूत-प्रेत, मंत्रतंत्र, भविष्य, ज्योतिष्य, जादूटोणा, चमत्कार, देव देवस्कीचे थोतांड या अस्तित्वहीन बाबींना विवेकवादी विचारचिंतनाने प्रकाश टाकून समाजाला पुढे नेण्याचा मानस असतो. हत्या झाल्याने हे बुद्धिवादी विचार थांबवू शकतो असे समजणे खुळेपणाचे आहे. पुरोगामी विचाराने प्रगल्भ असणारी माणसं नवसमाज निर्मिती करताना पारंपरिक अंधश्रद्धेच्या खाईतून लोकांची प्रकाशाकडे वाटचाल करीत असतात.
डॉ. अब्राहम केवूर, बी. प्रेमानंद आणि प्रा. श्याम मानव यांच्या चिकित्सावादी आंदोलनामुळे हजारो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या सीमा पार करून इतर राज्यांत अंधश्रद्धाविरोधी कार्य सुरू केलेले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन ही सत्य आणि असत्याची लढाई आहे. नेहमी सत्याचाच विजय होतो, म्हणूनच विरोधी आणि परंपरावादी अंधश्रद्धेची झापड बांधलेली माणसं द्वेषमूलक प्रवृत्तीने विचारवंतांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकत नाहीत. त्यांना संपविण्याची भाषा वापरतात.
धर्माच्या नावे होणारे शोषण, बुवाबाजी, ढोंगी मांत्रिकांच्या क्लृप्त्या आता यांचा आता भंडाफोड जनतेसमोर होत आहे. दैवीशक्तीचा दावा करणारे, अतिंद्रिय शक्तीचे दावेदार, चमत्काराची किमया दाखवून हातसफाई करणारे ढोंगीबाबा सळो की पळो व्हायला लागले. त्यांची रवानगी तुरुंगात होत आहे.
संत परंपरेमध्येही संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत कबीर या धार्मिक वृत्तीच्या महापुरुषांनी समाजाला तर्कशील विचार शिकवित पुढे नेलेले आहे. अशा समाजप्रबोधन करणाऱ्या व्यक्तींनाही विरोधाला सामोरे जावे लागले.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देवा-धर्माला विरोध न करता देवा-धर्माच्या नावे ढोंग आणि शोषण करणाऱ्यांविरुद्ध लढा देण्याची भूमिका घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन कार्याची वाटचाल यशस्वीपणे केलेली आहे.
कर्नाटकातील थोर विचारवंत अंधश्रद्धेविरुद्ध संघर्ष करणारे, रूढी-परंपरांवर प्रहार करीत विवेकवाद समाजात रुजविणारे मा. कलबुर्गी यांची हत्या ज्या माथेफिरूंनी केली त्या नराधमांना तत्काळ अटक होणे आवश्यक आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे यांचे हत्यारे अजूनही सापडत नाहीत. यासाठी राजसत्तेची त्रुटी आणि प्रयत्न कमी पडत आहेत. निरपराध माणसांची खोट्या समजुतीपायी छळवणूक थांबावी, यासाठी अंधश्रद्धेविरुद्ध कार्यकर्ते संघर्ष करीत असतात. त्यांना पायबंद घालून हल्लेखोर कोणता मर्दपणा सिद्ध करू पाहात आहेत?
ज्योतिषांना भविष्य सांगता येत नाही, ग्रह-ताऱ्यांचा मानवी जीवनावर कोणताच परिणाम होऊ शकत नाही, मंत्राने साधा भाजलेला पापड फोडला जाऊ शकत नाही; तरीपण मंत्राचे सामर्थ्य सांगणारे आसारामबापू, निर्मलबाबा, देव-देवस्वी करणारी राधे माँ लोकांना प्रिय वाटतात. वैज्ञानिक सत्य स्वीकारण्याची क्षमता मारेकऱ्यांच्या मेंदूत प्रविष्ट नाही तेव्हा ते विचारवंतांच्या जीवावर उठतात.
विवेकवादी विचारांचा वारसा जगभरातील प्रगत देशांतही दिसतो. अमेरिकेत ‘दी कमिटी फॉर दी सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन आॅफ दी क्लेम्स आॅफ दी पॅरानॉर्मल’ या वैज्ञानिक संस्थेमध्ये विवेकवादी लोकांचा समूह कार्यरत आहे. जगात चमत्काराच्या दावेदारांना या वैज्ञानिक कमिटीने त्यांची जागा दाखविली आहे. जेम्स कॅन्डी या सद्गृहस्थाने चमत्कारवाद्यांसाठी एक लाख मिलीयन डॉलर्सचे म्हणजे पाच कोटी रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. ‘स्केप्टिक’ समूह या विचारसरणीने जगभरात त्याच्या शाखा आहेत. जिथे शाखा आहेत तेच देश विज्ञान-तंत्रज्ञानाने पुढे वाटचाल करीत आहेत.
भारत देशालाही प्रगतिपथावर नेण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी, समाजातील तकलादू अंधश्रद्धांचा बीमोड करण्यासाठी विवेकवादी विचारवंतांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते.
 

Web Title: The goal of discrimination is the goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.