शेळी, कासव अन् शंका...
By सचिन जवळकोटे | Published: February 8, 2018 12:21 AM2018-02-08T00:21:24+5:302018-02-08T09:11:11+5:30
जंगलातल्या प्राण्यांच्या जनगणनेसाठी सारे पशुपक्षी एकत्र जमले. बहुतांश प्राण्यांचं एकमेकांशी जमत नव्हतं, तरीही नाइलाजानं गर्दी करून उभे राहिले.
जंगलातल्या प्राण्यांच्या जनगणनेसाठी सारे पशुपक्षी एकत्र जमले. बहुतांश प्राण्यांचं एकमेकांशी जमत नव्हतं, तरीही नाइलाजानं गर्दी करून उभे राहिले. यावेळी जो काही संवाद रंगला, त्याचा हा आॅँखो देखा हाल... नागपुरी सिंह : या जंगलाचा राजा मी. तेव्हा प्रत्येकानं माझंच ऐकलं पाहिजे.
दादरचा वाघ : (गुरगुरत) सिंहाचं कातडं पांघरून दिल्लीच्या ताटाखालचं मांजर कधी राजा होऊ शकत नाही.
वाघाचा बछडा : (नुकत्याच आलेल्या मिशांवर ताव मारत) मी पण आता शिकार करायला शिकलोय. गुरगुरण्याची प्रॅक्टिस करू लागलोय. इटस् अॅमेझिंगऽऽ डॅड.
जमावातून आवाज : अरे ऽऽ तुम्ही कुठले वाघ? तुम्ही तर चक्क शेळी!
नागपुरी सिंह : (लगेच खूश होत) ये हुई ना बात. कोण म्हटलं शेळी? त्यानं पुढं यावं. जनगणना आपण त्याच्याकडूनच करून घेऊ, कारण प्रत्येक प्राण्याला अचूक ओळखण्याचं कसब त्याला चांगलंच जमतंय म्हणायचं.
खानदेशी उंट : होय. होय. बारामतीकडच्या या प्राण्याशी माझीही चांगलीच दोस्ती जमून राहिलीय अलीकडं. मीही जाणार एक दिवस त्याच्याकडं. नाही तरी एवी-तेवी जळगावच्या वाळवंटात बसून-बसून मलाही कंटाळा आलाय दीड वर्षांपासून.
मराठवाडी पोपट : (सिंहाच्या कानात) सारेच खोटं बोलून राहिले सालेऽऽ वाघाला शेळी म्हणणारा तो नक्कीच बारामतीकडचा कोल्हा असावा. त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मी अध्यक्ष म्हणून सल्ला देतोय.
इस्लामपुरी बिबट्या : (‘कृषी’ क्षेत्रातल्या उसातून बाहेर येत) व्हय भौऽऽ अगोदर डल्ला मारून नंतर हल्ला करणाºया या प्राण्यांची ‘कोल्हेकुई’ मलाही ऐकू आलीय.
कोल्हापुरी चित्ता : (हातकणंगले स्टाईलनं दाढी कुरवाळत) माझ्या कळपातून बाहेर पडल्यावर तुला सिंहाची लईऽऽच कणव आली की रं भावा. सिंहाच्या आयत्या शिकारीवर जगणारे तुम्ही तर तरसच.
बारामतीचा थोरला हत्ती : (सर्व चारा खाऊन टाकून आता निवांतपणे चरत) तुम्ही सारीच मंडळी फसवी आहात. वरून भांडताय; पण आतून एक आहात. तुमच्या ढोंगीपणावर ‘हल्लाबोल’ केलाच पाहिजे.
कºहाडचा झेब्रा : होय. हल्लाबोल केलाच पाहिजे. पण कसा करायचा, यावर आमच्या ग्रुपमध्ये एकमत नाही. नांदेड अन् सोलापूरच्या आमच्या बांधवांशी ज्यादिवशी माझं ‘हात’भर टायमिंग जुळेल, त्यादिवशी साºयांचीच वाट लागली समजा.
नाशिकचा पाणगेंडा : मलाही कुणीतरी वाट दाखवा रेऽऽ ‘आत’मध्ये किती दिवस असंच निवांत बसू? मफलर बांधून अन् पत्रं लिहून कंटाळा आला आता.
दादरचा वाघ : (पुन्हा गुरगुरत) मी मात्र कधीच नसतो निवांत. चोवीस तास डरकाळी..
पुन्हा गर्दीतून आवाज : फुस्स्ऽऽ वाघाची झाली शेळी... अन् आता शेळीचं बनलंय पुरतं कासव.
दादरचा वाघ : (चिडून) मी नेमकं कोण? वाघ, शेळी की कासव? ‘शंका’ आल्यास धरणाच्या पाण्यात प्रतिबिंब बघा स्वत:चं.
कवी जिराफ : (स्वत:च्या तंद्रीत डोळे मिटून मान हलवत) बरं झालं, यावरून मला एक काव्य आठवले. शेळी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड कशी. भजी तळू या कशीबशी, चहाच्या कपाला लावून बशी...