देव आणि दैत्य
By admin | Published: January 17, 2017 12:30 AM2017-01-17T00:30:47+5:302017-01-17T00:30:47+5:30
वैदिक आणि पौराणिक ग्रंथात असे वर्णन आले आहे की, दिती आणि आदिती या कश्यप ऋषींंच्या दोन पत्नी होत्या.
वैदिक आणि पौराणिक ग्रंथात असे वर्णन आले आहे की, दिती आणि आदिती या कश्यप ऋषींंच्या दोन पत्नी होत्या. दितीपासून दैत्याचा व आदितीपासून देवाचा जन्म झाला. दिती व आदिती या दोघी प्रजापती दक्ष यांच्या कन्या होत्या.
वरील वास्तवाचा विचार करता दोन महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात येतात. पहिली गोष्ट म्हणजे देव व दैत्य या दोहोंचा जनक एकच आहे; परंतु माता वेगवेगळ्या आहेत. तसेच देव आणि दैत्य यांची माता आदिती आणि दिती ह्या एकाच पिता प्रजापती दक्ष यांच्यापासून जन्मल्या आहेत. यावरून स्पष्ट होते की, देव व दैत्य या दोघांचेही उत्पत्तीस्थान एकच आहे. परंतु त्यांचे गुण व कार्ये वेगवेगळी आहेत. देव सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असून, ब्रह्मांडाच्या सुलभ संचलनात त्यांचे योगदान मानले गेले आहे. जसे पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश ही पंच महाभूते ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या कारक आहेत आणि या पंचमहाभुतांमुळेच ब्रह्मांडाचे संचलनसुद्धा होते. अशा प्रकारे अनेक देवता आहेत आणि त्यांची कार्ये वेगवेगळी विभागली गेली आहेत. याउलट दैत्य नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहेत. दैत्य व राक्षसी शक्ती अडथळे निर्माण करतात व विनाशाचे कारण ठरतात.
वरील दोन्ही प्रकारच्या शक्ती सोबतच निर्माण झाल्या असून, ब्रह्मांडामध्ये सोबतच कार्य करीत असतात. ब्रह्मांडाचे सकारात्मक व नकारात्मक संतुलन या दोन शक्तींमुळेच कायम राहते.
सकारात्मक व नकारात्मक शक्ती प्रत्येक मनुष्याच्या मनात स्वभावाच्या रूपात आढळून येतात. या स्वभावगुणांच्या प्रभावामुळे मानवाच्या व्यक्तित्त्वाची निर्मिती होते. जेथे सकारात्मक ऊर्जेला प्राधान्य असते, तेथे दैवी ऊर्जा तर जेथे नकारात्मक ऊर्जेला प्राधान्य असते, तेथे राक्षसी शक्ती प्रबळ ठरतात.
ज्या शक्तीचा उपयोग लोककल्याणासाठी होतो, ती सकारात्मक ऊर्जा तर जिचा उपयोग दुसऱ्यांच्या विनाशासाठी होतो, ती नकारात्मक ऊर्जा असते. पौराणिक ग्रंथात मोठमोठे पराक्रमी व शक्तिशाली दैत्य व राक्षस राजांचे वर्णन पाहावयास मिळते. परंतु शेवटी सगळ्यांचा विनाश झालेला आहे. कारण त्यांनी त्यांच्या शक्तीचा दुरूपयोग केला आहे. शक्ती मुळातच तटस्थ असतात, त्यांची अभिव्यक्ती त्यांना चांगले किंवा वाईट बनवते. कश्यप ऋषी या मूळ व तटस्थ शक्तीचे प्रतीक असून, ती सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे व्यक्त झाली आहे.
प्रत्येक मनुष्यामध्ये ह्या दोन्ही प्रकारच्या ऊर्जा समाविष्ट असतात. जर आपण या ऊर्जेचा उपयोग लोककल्याणार्थ केला, तर आपण देव, या उलट जर लोकविध्वंसासाठी केला तर राक्षस म्हणून ओळखले जाऊ.
-डॉ. भूषणकुमार उपाध्याय