अभियान गोटेंचे; डोकेदुखी राष्ट्रवादीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 12:43 AM2021-02-18T00:43:41+5:302021-02-18T00:44:01+5:30

मिलिंद कुलकर्णी शिंदखेडा मतदारसंघातील भाजपचे आमदार व माजी मंत्री जयकुमार रावल यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व धुळे - ...

Goethe's campaign; Headache nationalist | अभियान गोटेंचे; डोकेदुखी राष्ट्रवादीची

अभियान गोटेंचे; डोकेदुखी राष्ट्रवादीची

Next

मिलिंद कुलकर्णी

शिंदखेडा मतदारसंघातील भाजपचे आमदार व माजी मंत्री जयकुमार रावल यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व धुळे - नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी माजी आमदार अनिल गोटे यांनी सुरू केलेल्या  ‘दहशतमुक्त अभियाना’च्या समारोपाला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार येणार होते, परंतु कोरोनाचे कारण देत त्यांचा दौरा रद्द झाला. नोव्हेंबर २०२० नंतर पवारांचा दौरा रद्द होण्याची ही दुसरी वेळ आहे. सलग दुसऱ्यांदा रद्द झालेला पवार यांचा दौरा, पवार यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी दोंडाईचा व शिंदखेडा येथे झालेल्या दोन गटांच्या स्वतंत्र बैठका, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दोन गटात झालेली झोंबाझोंबी, शिंदखेडा तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्यांविषयी गोटे यांनी जाहीर सभेत केलेली शेलक्या शब्दातील टिपणी, त्यावरून पोलीस कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून दाखल झालेले गोटेंविरुद्धचे अब्रूनुकसानीचे दोन गुन्हे, एमआयएमच्या आमदारांनी गोटेंच्या प्रतिमेला केलेले जोडेमार आंदोलन या सगळ्यांमधून अभियानाचा मुख्य उद्देश, जयकुमार रावल, त्यांची कथित दहशत हे मुद्दे बाजूला पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच प्रतिमाहनन सुरू झाले आहे. जयंत पाटील यांनी ‘परिवार संवाद यात्रे’च्या माध्यमातून तीन दिवस नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात पक्षसंघटन मजबुतीसाठी केलेले प्रयत्न, वेगवेगळ्या आघाड्यांच्या कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद यावर बोळा फिरविण्याचे काम या दोन दिवसात झाले आहे.

धुळे जिल्ह्यात खासदार डॉ.सुभाष भामरे, आमदार अमरीशभाई पटेल व आमदार जयकुमार रावल यांच्या प्रभावामुळे अवघ्या दोन वर्षात भाजपने सर्वच निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी केली. एक खासदार, दोन आमदार, जिल्हा परिषद, महापालिका अशी शिखरे पादाक्रांत केली. त्याउलट राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातून जिल्हा परिषद, महापालिका गेली. दोन पंचवार्षिक काळापासून एकही आमदार नाही. डॉ. हेमंत देशमुख, राजवर्धन कदमबांडे हे नेते साथ सोडून गेले. या पार्श्वभूमीवर भाजपशी फारकत घेऊन बाहेर पडलेल्या अनिल गोटे यांना शरद पवार यांनी पक्षात घेऊन थेट प्रदेश उपाध्यक्ष केले. धुळ्यासह नंदुरबारची संघटनात्मक जबाबदारी दिली.
देशमुख गटाचा प्रवेश कळीचा मुद्दा
अनिल गोटे आक्रमक, अभ्यासू नेते असले तरी त्यांची भाषा शिवराळ आहे. वक्तृत्व असो की, त्यांची पत्रके असो त्यात शिवराळ भाषेचा मुक्त वापर असतो. जिल्ह्यातील अनेक नेत्यांना त्यांनी लक्ष्य केले आहे. भाजपमध्ये त्यांचे असेच बिनसले. आता राष्ट्रवादीत आल्यावर संदीप बेडसे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांच्याशी वाद सुरू आहे. जाहीरपणे सुरू असलेल्या या वादाचा केंद्रबिंदू माजी मंत्री हेमंत देशमुख यांचा संभाव्य राष्ट्रवादी प्रवेश हा आहे. डॉ.देशमुख यांना रावल यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्रास झाल्याचा मुद्दा गोटे यांनी लावून धरला आहे. देशमुखांचे नाव घेऊन रावलांविरुद्ध आघाडी उघडून जिल्ह्यात स्वत:चे बस्तान बसविण्याच्या गोटे यांच्या प्रयत्नाला निष्ठावंतांच्या ताठर भूमिकेमुळे खोडा घातला गेला आहे. चार महिन्यांतील पवारांची दोंडाईचातील दुसरी सभा रद्द झाली. पहिली सभा रद्द होण्याचे खापर गोटेंनी बेडसे-शिंदे गटावर फोडले होते. आता कोरोनाचे कारण असले तरी गोटे पुढे हे खापर या दोघांवर फोडल्याशिवाय राहणार नाहीत. शिंदखेडा तालुक्यातील संघटनात्मक कार्यात दोन वेळा विधानसभा निवडणूक लढविलेल्या पक्षीय उमेदवाराला विश्वासात घेतले जात नसेल, तर संघटन वाढवायचे कुणासाठी हा बेडसे यांचा तर्क समर्थनीय आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी डॉ.देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देशमुख गटातील नेते रावलांच्या व्यासपीठावर दिसून आले. याचा अर्थ देशमुख व त्यांच्या गटाने स्वत:हून पक्ष सोडला, तरी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बेडसे यांना दोंडाईचात १० हजार मते मिळाली. आता पक्ष राज्यात सत्तेत आल्यानंतर देशमुखांचे पाय पुन्हा पक्षाकडे वळत आहेत. त्याला बेडसे गटाचा आक्षेप आहे.
दुसरीकडे पोलीस दलावर गोटे यांनी केलेल्या अनाठायी टीकेने पक्षापुढे अडचण निर्माण झाली आहे. गृह खाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असताना पक्षाचाच पदाधिकारी त्या खात्यातील कर्मचाऱ्यांवर आरोप करतो, याचा अर्थ काय घ्यायचा? एमआयएमचे आमदार डॉ.फारुख शाह यांनी याचा राजकीय लाभ घेत पोलीस दलाच्या पाठीशी उभे राहत गोटे यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केले. गोटेंविरुद्ध पोलीस कर्मचाऱ्यांनी अब्रूनुकसानीची फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला. पक्षाची अशी बेअब्रू होणे टाळता आले असते. पवार यांनी बहुदा या वातावरणात येण्याचे टाळल्याची दाट शक्यता आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी पक्षश्रेष्ठी काय प्रयत्न करतात याकडे आता लक्ष लागले आहे.

 

Web Title: Goethe's campaign; Headache nationalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव