सिनेमाला जाताय? कुत्र्याला घेऊन जा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 08:48 AM2023-08-30T08:48:31+5:302023-08-30T08:48:59+5:30

लंडनमध्ये राहणारी लुसिया स्ट्रेज सिनेमा पाहायला तिच्या लाडक्या  कॅबला घेऊन गेली. कॅब हा दोन वर्षांचा डाॅबरमॅन. लुसियासोबत कॅबही छान तयार होऊन आला होता.

Going to the cinema? Take the dog! | सिनेमाला जाताय? कुत्र्याला घेऊन जा!

सिनेमाला जाताय? कुत्र्याला घेऊन जा!

googlenewsNext

१८ ऑगस्ट रोजी हाॅलिवूडचा ‘स्ट्रेज’ सिनेमा प्रदर्शित झाला. आपल्या दुष्ट मालकाचा बदला घेण्याचा निर्धार केलेला एक पाळीव कुत्रा आणि त्याला त्याच्या या कामात मदत करणारे रस्त्यावरचे भटके कुत्रे असे सूत्र असलेला हा विनोदी थरारपट आहे. आता हा कुत्र्यांवरचा सिनेमा असला म्हणून  तो  पाहायला कुत्र्यांना कसे नेणार? पण  लुसिया फल्चरला तसं करावं लागलं नाही. लंडनमध्ये राहणारी लुसिया स्ट्रेज सिनेमा पाहायला तिच्या लाडक्या  कॅबला घेऊन गेली. कॅब हा दोन वर्षांचा डाॅबरमॅन. लुसियासोबत कॅबही छान तयार होऊन आला होता. फक्त थोडा घाबरलेला होता. कारण पहिल्यांदाच कॅब थिएटरमध्ये आला होता.

अर्थात सिनेमा पाहायला आपल्या कुत्र्याला घेऊन येणारी लुसिया ही काही एकटीच नव्हती. तर अनेक जण आपल्या कुत्र्यांसह चित्रपट पाहायला आले होते. सिनेमा सुरू होण्याआधी लुसिया आणि इतर श्वान मालकांनी आपापल्या कुत्र्यांना बाहेर नेऊन एकदा शू करवून आणली.  मग चित्रपट सुरू झाला. लुसिया आणि इतर प्रेक्षकांनी  चित्रपटाचा आस्वाद घेतला. चित्रपट संपल्यानंतर जो तो आपापल्या कुत्र्यांना घेऊन बाहेर पडला. जे प्रेक्षक कुत्र्यांशिवाय आले होते त्यांना सोबत कुत्रे आणलेल्या प्रेक्षकांचा ना राग आला ना त्रास झाला. आता चित्रपटगृहांनीच ब्रिटनमध्ये प्रेक्षकांना कुत्र्यांना सिनेमाला आणण्याची परवानगी दिली आहे.
ब्रिटनमध्ये ‘कर्झन सिनेमाज’ची १६ ठिकाणी चेन थिएटर्स आहेत. कर्झन सिनेमाजच्या मालकांनी प्रेक्षकांना आठवड्यातून एक दिवस पाळीव कुत्र्यांसोबत चित्रपट पाहण्याची परवानगी दिली आहे. हा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे लोकांची मागणी. ती पुरवण्यासाठी ब्रिटनमधली अनेक चित्रपटगृहं प्रयत्न करत आहेत. 

केवळ चित्रपटगृहात कुत्र्यांना घेऊन जाता येणं एवढंच याचं वैशिष्ट्यं नाही तर  एरवीपेक्षा चित्रपटाचा आवाज लहान ठेवणं, चित्रपटगृहात पूर्ण अंधार न ठेवता थोडा प्रकाश ठेवणं असे खास बदल त्या विशिष्ट शोजसाठी केले जात आहेत. प्रेक्षकांना सोबत आणलेल्या कुत्र्याचं वेगळं तिकीट काढावं लागत नाही; पण एरवी जेवढे प्रेक्षक त्या सिनेमाहाॅलमध्ये बसू शकतात त्यापेक्षा कमी प्रेक्षक यावेत यासाठी मर्यादित तिकिटं उपलब्ध केली जातात.  कुत्र्यांना बसण्यासाठी स्वतंत्र खुर्ची नसते. एकतर त्यांनी त्यांच्या मालकांच्या मांडीवर बसावं नाही तर मालकांच्या खुर्चीच्या बाजूला! आणि समजा कुत्र्याने काही शी-शू केलीच तर स्वच्छतेची जबाबदारी त्या श्वान मालकांची राहील, असे जुजबी नियम आहेत.    अनेक चित्रपटगृहांनी शांत आणि चांगलं वळण असलेल्या श्वानांनाच घेऊन येण्याची सूचना प्रेक्षकांना केली आहे. श्वानप्रेमी प्रेक्षकही आपलं कुत्रं चित्रपट पाहताना शांत कसं बसेल, याची काळजी घेतात.
आठवड्यातून एखादा दिवस का असेना, लाडकं कुत्रं घरी एकटंच ही काळजी सिनेमा पाहताना ब्रिटिश प्रेक्षकांना करावी लागत नाही.  अनेक जोडप्यांची एकत्र चित्रपट पाहण्याची इच्छा या सुविधेमुळे पूर्ण झाली आहे. 

कुत्र्यासोबत चित्रपट पाहता येण्याची सुरुवात ब्रिटनमध्ये २०१५ पासून छोट्या स्वरूपात झाली होती. सुरुवातील सर्व्हिस डाॅग्ज घेऊन येण्यास परवानगी होती.  मात्र, २०१८ मध्ये ब्रिटनमधील कॅमियो चित्रपटगृहात   वेस ॲण्डरसन यांचा इस्ले ऑफ डाॅग्ज हा कुत्र्यांचीच गोष्ट असलेला सिनेमा प्रदर्शित झाला. ॲण्डरसन यांच्या कार्याचा गौरव म्हणून कॅमियो सिनेमाने विविध कार्यक्रम आयोजित केले होते. त्यातलाच एक म्हणजे प्रेक्षकांनी आपल्या कुत्र्याला (चांगल्या वळणाच्या) हा चित्रपट बघण्यास घेऊन यावे. कॅमियो सिनेमाने प्रेक्षकांसोबत येणाऱ्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र लोकरी सतरंजी आणि पाण्याचं वाडगं उपलब्ध करून त्यांची चांगली बडदास्त ठेवली होती.  काही अपवाद वगळता कुत्र्यांसोबत चित्रपट पाहताना प्रेक्षकांना कोणताच त्रास होत नाही, असा अनुभव असल्यानेच आता ब्रिटनमधील बहुसंख्य चित्रपटगृहांनी प्रेक्षकांना त्यांच्या कुत्र्यांना आणण्याची मुभा दिली आहे. 

कोरोनाच्या काळात लोकांनी सोबतीला म्हणून मोठ्या प्रमाणात कुत्री पाळली. वर्क फ्राॅम होममुळे पाळीव श्वानांना घरातल्या माणसांची सवय झाली.  आता अनेक कंपन्यांनी कार्यालयातील उपस्थिती अनिवार्य केल्यानंतर आपल्या लाडक्या श्वानास इतक्या वेळ कुठे ठेवायचे हा प्रश्न येथील लोकांना छळतो आहे. किमान चित्रपटाचा आनंद घेताना तरी आता हा प्रश्न त्यांना छळणार नाही हे नक्की!

लंडनमधील श्वानप्रेम! 
लंडन हे जगातील श्वानप्रेमी शहर म्हणून ओळखलं जातं. लंडनमध्ये रेस्टाॅरण्ट, पब्ज, ट्रेन्स, सार्वजनिक ठिकाणी  अगदी कुठेही आपल्या मालकांच्या मांडीवर ऐटीत बसलेले कुत्रे हमखास दिसतातच. ब्रिटनची लोकसंख्या  ६.७ कोटी आहे,  तर पाळीव कुत्र्यांची संख्या १ कोटी १० लाख इतकी आहे; म्हणजे पाहा!

Web Title: Going to the cinema? Take the dog!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.