इंडोनेशियात नदीच्या तळात ‘सोन्याचं’ बेट; एके काळी व्यापारी मार्गावर होता दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 08:23 AM2021-11-08T08:23:39+5:302021-11-08T08:24:13+5:30

जुन्या वस्तूंच्या उत्खननाचे कायदे आहेत आणि त्यातून जो खरा इतिहास हाती लागतो त्याची पाठराखण करणारा छोटासा का असेना जागृत दबावगट आहे.

'Golden Island' at the bottom of the river in Indonesia! | इंडोनेशियात नदीच्या तळात ‘सोन्याचं’ बेट; एके काळी व्यापारी मार्गावर होता दबदबा

इंडोनेशियात नदीच्या तळात ‘सोन्याचं’ बेट; एके काळी व्यापारी मार्गावर होता दबदबा

Next

भारतात म्हणे पूर्वी सोन्याचा धूर निघायचा. इतकी सुबत्ता होती की बाहेर देशीचे लोक व्यापार करायला इथे यायचे. इथून रेशीम, अत्तर, हस्तिदंत आणि इतर कलाकुसरीच्या वस्तू जगभर जायच्या. त्यातला सोन्याचा धूर जरी सोडून दिला, तरी युरोप आज आहे त्या अवस्थेला उदयाला येण्यापूर्वी भारतातून बराच व्यापार चालत असे असं दाखवणाऱ्या खुणा पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मधून मधून सापडत असतात. भारतातल्या प्राचीन मानवी वसाहती, वस्त्या, नगरं याचा अभ्यास पुरातत्त्वविभागाच्या वतीने सतत चालू असतो. कोणालातरी कुठेतरी शेतात विहीर खणताना काहीतरी जुनी गाडगी-मडकी हाती लागतात. ते सरकार दरबारी कळवलं जातं. कारण आपल्याकडे पुरातत्त्वविभाग आहे.

जुन्या वस्तूंच्या उत्खननाचे कायदे आहेत आणि त्यातून जो खरा इतिहास हाती लागतो त्याची पाठराखण करणारा छोटासा का असेना जागृत दबावगट आहे. पण समजा, आपल्याकडे एखाद्या नदीत कोळ्यांना मासेमारी करताना किंवा वाळूचा उपसा करताना नदीच्या तळात गाडल्या गेलेल्या सोन्याच्या वस्तू सापडल्या तर? किती दिवस ते गुपित राहील? किती दिवस लोक हळूच त्यातल्या वस्तू काढून विकतील? कधीतरी तर त्याची बातमी होईल की नाही? सरकार दरबारी त्याची नोंद होईल की नाही? त्या वस्तूंचा अभ्यास होईल की नाही? 
कल्पनेतली वाटणारी ही परिस्थिती इंडोनेशियामधल्या पालेमबांग शहराजवळच्या मुसी नदीत खरी खरी निर्माण झाली आहे. तिथे बांधकामासाठी वाळू उपसा करणाऱ्या मजुरांना सोन्याच्या अंगठ्या, मणी, मातीची भांडी असं काय काय सापडायला सुरुवात झाली आणि मुसी नदीचा तळ लोकांनी अक्षरशः ढवळून काढला.

पाण्याखाली गेल्यावर श्वास घेता यावा यासाठी मोठे पाईप्स घेऊन त्यातून श्वास घेऊन जास्त वेळ तळाशी थांबायचं आणि जमेल तेवढी वाळू उकरायची. त्यातून एखादा सोन्याचा मणी हाती लागला तरी सगळे कष्ट वसूल होतील, अशा विचारांनी कोणीही उठून सोनं काढायला जायला लागलं. त्या उकराउकरीत अर्थातच सोनं सोडून इतर नाजूक वस्तूंचं नुकसान झालं. कारण सोनं तेवढं किमती; त्याबरोबर सापडलेल्या छोट्या मूर्ती, मातीची भांडी, आरसे, इतर रोजच्या वापरातल्या वस्तू याची कोणाला किंमत असणार? 

जगभरातल्या पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि वस्तुसंग्रहालयवाल्यांनी आरडाओरडा करूनही इंडोनेशियन सरकार त्यात लक्ष घालायला तयार नाही. त्यांनी फक्त अशा वस्तू खणण्यावर बंदी घातली. त्यामुळे तर या वस्तूंचं ब्लॅक मार्केट अजूनच फोफावलं. त्यामुळे त्या सगळ्या वस्तू मिळून जी गोष्ट सांगू पाहतायत त्यातले अनेक दुवे निसटून चालले आहेत. हे दुवे एकमेकांशी जोडून इंडोनेशियातील एका अत्यंत संपन्न शहराच्या इतिहास जगासमोर येऊ शकतो. ते शहर म्हणजे इ.स. ६०० ते १०२५ या काळात पूर्व आणि पश्चिमेकडच्या जगांना जोडणारं समृद्ध व्यापारी शहर, श्रीविजय!

सोन्याचं बेट याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शहराचा कोणे एके काळी व्यापारी मार्गावर दबदबा होता. पण भारतातील चोला साम्राज्याशी झालेल्या लढाईत श्रीविजयच्या राजाचा पराभव झाला नि तिथपासून या राज्याच्या समृद्धीला उतरती कळा लागली. परमेश्वर नावाच्या श्रीविजयच्या शेवटच्या राजाने १३९० सालच्या आसपास या शहराला त्याचं पूर्वीचं वैभव परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण शेजारच्या जावा बेटांच्या राजाकडून तो पराभूत झाल्याच्या नंतर उरलंसुरलं साम्राज्यही लयाला गेलं. त्यानंतर हे शहर हा चिनी चाच्यांचा अड्डा बनून राहिलं.  हे शहर वैभवाच्या शिखरावर असताना तिथे येऊन गेलेले पर्यटक आणि व्यापारी यांनी त्याबद्दल लिहिलेलं वर्णन अत्यंत समृद्धी आणि सामर्थ्याचं आहे.

शस्त्रसज्ज जहाजं, हिंदी आणि अरबी बोलू शकणारे पोपट, मध्येच जागृत होणारे ज्वालामुखी अशी त्यावेळी केलेली श्रीविजयची अद्भुतरम्य वर्णनं आहेत. पण ती बहुतेक वेळा अतिरंजित असतात. त्यातून श्रीविजयची माणसं नेमकी कशी राहत होती, काय खात होती, कोणते कपडे घालत होती अशी माहिती मिळत नाही. ती माहिती मिळते शास्त्रीय पद्धतीने केलेल्या उत्खननातून. कारण त्या उत्खननात सापडलेली प्रत्येक वस्तू त्या काळाचा एक इतिहास सांगते. आज मुसी नदीत सहज तळ उकरून सोनं काढणाऱ्या लोकांना मुठींना माणकं जडवलेल्या सोन्याच्या तलवारी, मोराच्या आकाराचे पेले अशा अनेक वस्तू आजही सापडतायत. त्यावरून त्यावेळच्या श्रीमंतीची सहज कल्पना येऊ शकते. पण या श्रीमंतीपेक्षाही त्यावेळची संपन्न संस्कृती समजून घेणं जास्त गरजेचं आहे. 

सोन्याचं बेट तळाशी कसं गेलं?

इतकं समृद्ध असणारं श्रीविजय शहर नदीच्या तळाशी कसं गेलं? असा प्रश्न साहजिकच पडतो. त्याची शक्यता अशी सांगितली जाते, की हे संपूर्ण शहर पाण्यावर बांधलेलं असावं. आज अजूनही अतिपूर्वेकडील देशांमध्ये काही ठिकाणी तराफे एकमेकांना बांधून त्यावर घरं आणि वस्त्या बांधण्याची पद्धत दिसून येते. श्रीविजय जोवर समृद्ध होतं तोवर असं पाण्यावरचं घर त्यांना नीट सांभाळता आलं असेल आणि मग मात्र ते अक्षरशः कुजून नष्ट झालं असेल आणि मग बुडालं असेल असा पुरातत्त्वशास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

Web Title: 'Golden Island' at the bottom of the river in Indonesia!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.