‘प्रतिभा’शाली कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:56 PM2017-12-29T23:56:17+5:302017-12-29T23:56:51+5:30
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सामाजिक-राजकीय जीवनाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत.
- सुशीलकुमार शिंदे
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सामाजिक-राजकीय जीवनाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या कारकिर्दीच्या या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार सोहळा आणि त्यांच्यावरील गौरवग्रंथाचे प्रकाशन पुण्यात आज (ता. ३०) होत आहे. त्यानिमित्त...
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची राष्ट्रपतिपदाची मुदत संपत आली आणि नव्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली. तीन-चार नावांची चर्चा जोरात सुरू होती. कलामसाहेब म्हणजे कुशल प्रशासक, प्रखर बुद्धिमत्ता आणि अंतर्बाह्य देशप्रेमाने भारलेले व्यक्तिमत्त्व होते. असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणारे राष्ट्रपती निवृत्त होताना त्या पदासाठी त्याच तोलामोलाची व्यक्ती निवडणे खूपच कसोटीचे व अवघड काम होते. सोनियाजी गांधी यांच्या दूरदृष्टीमुळे, अचूक निर्णयक्षमतेमुळे आणि योग्य पदासाठी योग्य व्यक्ती निवडण्याच्या निवडक्षमतेमुळे हे कार्य करणे शक्य झाले. त्यांच्या सभोवताली असणाºया असंख्य कार्यकर्त्यांमधून त्यांनी प्रतिभातार्इंची ‘प्रतिभा’ हेरली आणि राष्ट्रपतिपदासाठी योग्य उत्तराधिकारी निवडला गेला!
श्रीमती प्रतिभाताई राजस्थानातील माऊंट आबू येथे कार्यक्रमाला गेलेल्या असताना त्यांना श्रीमती सोनिया गांधी यांचा निरोप मिळाला. माऊंट आबूच्या उंचीवर असताना देशाच्या सर्वोच्च पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची घोषणा होणे, हा मोठा योगायोगच म्हणावा लागेल. इंदिराजीच नव्हे, तर राजीवजी गांधींपासून सोनियाजींंपर्यंत प्रतिभाजींचा संपर्क कौतुकास्पद होता. २००७मध्ये राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या वेळी त्याची प्रचिती आली. एक स्त्री असलेल्या सोनिया गांधी यांनी दुसºया स्त्रीला म्हणजे प्रतिभाजींना राष्ट्रपतिपदाच्या अतिउच्च पदावर विराजमान केले. श्रीमती प्रतिभाताई महाराष्ट्र शासनात समाजकल्याण विभागाच्या मंत्री म्हणून काम करीत असताना राज्यमंत्री म्हणून त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्याबरोबर अनेक सभा व परिसंवादांत सहभागी होतानाच त्यांची कामाची पद्धतही मला जवळून पाहता आली. दलित व आदिवासी कार्यकर्त्यांना त्या विशेष प्रोत्साहन देत असत. सोलापूर जिल्हा परिषदेचे त्या वेळचे ‘समाजकल्याण’चे सभापती बाबासाहेब साळे आणि अमरावतीकडील दलित वस्त्यांमध्ये कार्य करणारे काँग्रेस पक्षातील अतिशय निष्ठावंत हिंगासपुरे नावाच्या कार्यकर्त्याला त्या आपुलकीने मदत करीत. कुठल्याही सभेत, परिसंवादात चर्चा करून गरिबांच्या बाजूने निर्णय घेण्याची त्यांच्यात जबरदस्त ताकद होती. त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष असताना काँग्रेसचा विचार सर्वसामान्य माणसापर्यंत आणि विशेषत: ग्रामीण भागात पोहोचविण्यावर त्यांनी भर दिला. लोकसभेच्या निवडणुकीत आमच्या सोलापूरमधून पद्मशाली समाजाच्या तरुण महापौरांना त्यांनी आवर्जून लोकसभेची उमेदवारी दिली. अशा अनेक गुणी तरुणांना त्यांनी पक्षामध्ये वावही दिला आणि बळही दिले. जेव्हा त्या राजस्थानच्या राज्यपाल झाल्या, तेव्हा मीही आंध्र प्रदेशचा राज्यपाल होतो. मी त्यांना राजभवनात भेटायला गेलो तेव्हा एक छोटा भाऊ म्हणून त्यांनी माझे केलेले स्वागत, मला दिलेली मायेची ‘शाल’ मी आयुष्यभर विसरू शकत नाही.
त्या राष्ट्रपती असताना मी भारत सरकारमध्ये मंत्री होतो. अनेक वेळा मी त्यांना कधी एकटा, तर कधी सपत्नीक भेटत असे. त्या आग्रहाने आम्हा दोघांना राष्ट्रपती भवनात भोजनासाठी बोलावत असत. मी महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री असल्यापासून ते केंद्रीय मंत्री होईपर्यंत त्यांचे मायेचे पाठबळ मला कायम मिळाले. ८८व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या सोलापूर येथील संमेलनासाठी मी त्यांना आमंत्रित केले व मोठ्या मनाने त्यांनी ते आमंत्रण स्वीकारलेही! या संमेलनात प्रतिभातार्इंनी खूपच सुंदर भाषण केले. जुन्या नाटकांचा व कलाकारांचा आढावा घेत असतानाच त्यांनी उद्याच्या नव्या कलाकारांकडूनही अनेक आशा आणि अपेक्षाही व्यक्त केल्या. मराठी नाटकाने आपले स्वत्व घालवू नये, यासाठी विशेष जागरूकता दाखविली पाहिजे. नाटक हे लोकशिक्षणाचे एक प्रभावी माध्यम असल्याने करमणुकीबरोबरच विविध सामाजिक प्रश्नांवर उद्बोधन म्हणून शर्करावगुंठित गोळीसारखे उपयुक्त ठरू शकते. ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. असा विवेक धरला, तर शासकीय नियंत्रणाची आवश्यकता भासणार नाही, असे सांगतानाच राष्ट्रपती प्रतिभाताई यांनी अधोगतीकडे नेणारी नाटके तयार होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्या नाट्य संमेलनात केले. भारताचा राष्ट्रपती हा सैन्याच्या तिन्ही दलांचा सर्वोच्च कमांडर असतो. हवाई दलाचादेखील तो प्रमुख असतो. प्रतिभाताई याही अशाच तिन्ही सेनादलांच्या प्रमुख होत्या. एकदा त्यांनी निर्णय घेतला, की सुखोई फायटर विमानातून निरीक्षण करण्याकरिता जायचे. वयाच्या ७४व्या वर्षी अशा प्रकारचे धैर्य दाखविणाºया त्या एकट्या राष्ट्रपती होत्या. त्यापूर्वी तसे धैर्य इतर कुणाही राष्ट्रपतींनी दाखविलेले नव्हते आणि फायटर प्लेनमधून हवाई दलाचा युनिफॉर्म घालून सुखोई फायटरमधून त्यांनी आकाशात भरारी घेतली. देशातच नव्हे, तर संपूर्ण जगातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. प्रतिभातार्इंची जिद्द, क्षमता व साहस यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या नेतृत्वाची ग्वाही देत होता. म्हणूनच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सुखोई फायटर विमानामधून प्रवास केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
अलीकडेच २७ आॅगस्ट २०१७ रोजी सोलापुरात इंदिराजी गांधी व वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्या आल्या होत्या व त्यांनी जे भावपूर्ण भाषण केले, ते सोलापूरकर कधीही विसरणार नाहीत. प्रतिभातार्इंनी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून पाच वर्षांच्या राष्ट्रपतिपदाच्या कार्यकाळात अप्रतिम काम केले आणि एक समर्थ राष्ट्रपती म्हणून देशाची उंची वाढवली. भूतपूर्व आदरणीय राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या मालिकेत श्रीमती प्रतिभातार्इंचे नाव चिरंतन जोडले गेले, ही महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.
(माजी केंद्रीय गृहमंत्री आणि माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)