भारतवर्षात उद्यापासून सोनेरी चिमण्यांचा बसेरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2016 04:47 AM2016-12-31T04:47:08+5:302016-12-31T04:47:08+5:30
आज ३१ डिसेंबर.. सरत्या वर्षाचा अखेरचा दिवस. नोटबंदीचे ५० दिवस पूर्ण झाले आहेत. रिझर्व्ह बँक दररोज नव्या नियमांचे रतिब घालून थकली आहे. आज तसा विसाव्याचा दिवस आहे.
- सुरेश भटेवरा
(राजकीय संपादक, लोकमत)
आज ३१ डिसेंबर.. सरत्या वर्षाचा अखेरचा दिवस. नोटबंदीचे ५० दिवस पूर्ण झाले आहेत. रिझर्व्ह बँक दररोज नव्या नियमांचे रतिब घालून थकली आहे. आज तसा विसाव्याचा दिवस आहे. मध्यरात्री नव्या वर्षाचे स्वागत करण्यापूर्वी मात्र जागे रहा..रामदेवाच्या योगविद्येनुसार श्वास रोखून धरा. नव्या युगाचा एकमात्र मसिहा आज पुन्हा एकदा... भाईयो.. बहनोचा नवा इपिसोड सादर करणार आहे.
आजच्या प्रवचनात तुम्हाला ऐकायला मिळेल, ८ नोव्हेंबर रोजी नेमक्या किती नोटा चलनात होत्या. ५०० आणि १०००च्या किती जुन्या नोटा बँकांच्या खजिन्यात जमा झाल्या. खऱ्या खोट्या किती नोटा पकडल्या गेल्या. १३० कोटी स्त्री-पुरुषांनी तांदळाच्या डब्यात, पत्र्याच्या पेटीत, नाण्यांच्या गुल्लकमधे दडवून ठेवलेले काळे पैसे सरकारला गवसले की नाही. या ऐतिहासिक उलाढालीत सर्वांच्या खिशात हात घालून सरकारला खरोखर फायदा झाला की नाही. रांगांमधे उभे राहून कंटाळला असाल. मनात शंकाकुशंकांचे काहूर असेल, तरी घाबरू नका. प्रिय मसिहा तुम्हाला ठणकावून सांगेल की भारतात उद्यापासून पुन्हा सोन्याचा धूर निघणार आहे. सोनेरी चिमण्या भारतवर्षाच्या फांदी फांदीवर आपली घरटी वसवणार आहेत. नवे वर्ष २0१७ इतर वर्षांप्रमाणे साधेसुधे थोडेच आहे. ते तर प्रामाणिकपणा आणि इमानदारीची तलम राजवस्त्रे लेवून येते आहे. या देशात नक्षलवादी आणि दहशतवाद्यांची आता खैर नाही. भ्रष्टाचाराचा लवलेशदेखील यापुढे कुठे सापडणार नाही. स्वच्छतेच्या हमामखान्यात न्हाऊन निघालेले तमाम राजकीय नेते त्याग आणि चारित्र्यसंपन्नतेचे आदर्श ठरणार आहेत. दारिद्र्यात अनेक वर्षे खितपत पडलेल्या देशात आता गरीब कोणालाही शोधूनही सापडणार नाही. सांताक्लॉजसारखा दिसणारा पांढऱ्या दाढीचा मसिहा, प्रत्येकाच्या बँक खात्यात लाखो रुपयांच्या राशी ओतणार आहे. चोऱ्या, दरोडे, लूटमार आता कायमची बंद होईल. काळाबाजारी, सट्टेबाज, ड्रग माफियांची दादागिरी आणि मनमानी तर सरत्या वर्षाबरोबरच इतिहासजमा झाली आहे. तुम्ही कल्पनाही केली नसेल की आपल्या हयातीत इतकी महान अर्थक्रांती घडवणारा मसिहा किती दूरदर्शी आणि मुत्सद्दी आहे. त्याचे गगनभेदी भाषण तुम्ही ऐकणार नाही? विरोधकांनो, जरा लाज बाळगा, सर्वांच्या आयुष्यात देशभक्तीची नवी किरणे पेरणाऱ्याला विनाकारण शिव्याशाप देऊ नका. थोडा विचार करा, शांततेची कबुतरे काय म्हणतील? ३१ डिसेंबरच्या इपिसोडपाठोपाठ २ जानेवारीला लखनौत मसिहाजींची भव्य रॅली आहे. पवित्र आणि महन्मंगल भारतातले लाखो लोक आपल्या भोजनाचे डबे सोबत घेऊन या रॅलीसाठी पायी चालत येणार आहेत. इलाजच नाही कारण एरव्ही त्यांना वाहून आणणाऱ्या गाड्यांचे नंबर अद्याप आधार आणि पॅन कार्डाशी जोडले गेलेले नाहीत. कॅशलेस भारतात व्यवस्थेचा सारा खर्चही रॅलीचे आयोजक प्लॅस्टिक करन्सीनेच करणार आहेत. १३० कोटींच्या या देशात समाजवाद, मार्क्सवाद, लोककल्याणाचे बोथट मनसुबे यापुढे कोणी ऐकणार नाही. जे काही घडेल ते ‘डंके की चोटपर’ मसिहाजीच घडवणार. कोणाची हिंमत आहे त्यांना पराभूत करण्याची? सारा देश इमानदार झालाय, मग लोकपालाची इथे काय गरज? आता तर भ्रष्टाचाराला साऱ्या देशाने पूर्णत: मूठमाती दिलीय, मग लोकपाल नावाचा फुकट फौजदार हवा तरी कशाला?
देशभक्तीचे एकमेव नवे प्रतीक आता कॅशलेस भारत आहे. भाईयो... बहनो, मोबाइल पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना प्रत्येक व्यवहारामागे ३ टक्के मोजा आणि बदलत्या भारतात बिनधास्त जगा हा मसिहाजींनी नव्या वर्षासाठी अवघ्या भारताला दिलेला नवा मंत्र आहे. ‘दुनिया मेरी मुठ्ठीमे’ कंपनीने या माध्यमातून काही लाख कोटींची कमाई घरबसल्या कमवण्याचा चंग बांधला आहे. नोटबंदीच्या दोन महिने आधी म्हणूनच, आधार कार्डाच्या आधारे फुकट सिमकार्ड, फुकट डेटा त्यांनी वाटला आहे. नव्या वर्षात ही कंपनी अवघ्या १५०० रुपयात फोर जीचा स्मार्ट फोनही तुमच्या हाती देणार आहे. बाजारपेठेत दोन हजाराच्या नोटेचे सुट्टे कोणी देत नाही. बँकांकडे तगादे करूनही दुकानदारांना स्वाइप मशिन्स मिळत नाहीत. मग डेबिट, क्रेडिट कार्ड कसे चालणार? उरला एकच उपाय मोबाइलच्या बटव्यातले पैसे खर्च करा. मसिहाजींच्या आज्ञेनुसार सारा भारत त्यासाठी सज्ज होतोय.
देशातले सारे प्रश्न आज गौण ठरले आहेत. अडीच वर्षात ५५ देशांचा दौरा करून मसिहाजींनी नेमके काय साधले? हा प्रश्न आता कोणी विचारीत नाही. मसिहाजींचा पक्ष, त्याचे सारे खासदार, आमदार, कार्यकर्ते इतकेच नव्हे तर पक्षाची संस्कृती जपणाऱ्या संघानेही भारत कॅशलेस करण्याचा ध्यास घेतला आहे. लोकसभा २०१४ च्या निवडणुकीत देणगीरूपाने मिळालेल्या निधीची परतफेड यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे कशी होऊ शकेल? तरीही तुम्ही चिंता करण्याचे कारण नाही. सोनेरी चिमण्या उद्यापासून भारतवर्षाच्या फांदी फांदीवर आपली घरटी वसवणारच आहेत.
सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा!