हेच का अच्छे दिन?

By Admin | Published: May 14, 2016 01:38 AM2016-05-14T01:38:30+5:302016-05-14T01:38:30+5:30

दहा-पंधरा वर्षे सत्तेबाहेर राहिलेल्या भाजपाच्या मंडळींकडून सत्तेत आल्यानंतर लोकाभिमुख, जनतेच्या प्रश्नांप्रति सजग आणि सतर्क राहण्याची अपेक्षा होती.

This is a good day? | हेच का अच्छे दिन?

हेच का अच्छे दिन?

googlenewsNext

दहा-पंधरा वर्षे सत्तेबाहेर राहिलेल्या भाजपाच्या मंडळींकडून सत्तेत आल्यानंतर लोकाभिमुख, जनतेच्या प्रश्नांप्रति सजग आणि सतर्क राहण्याची अपेक्षा होती. परंतु अवघ्या दीड-दोन वर्षात भ्रमाचा भोपळा फुटला आहे. घोषणांचा सुकाळ असला तरी प्रत्यक्षात काहीही हाती आले नसल्याचा अनुभव जनताजनार्दन घेत आहे. हे झाले सरकारचे. पण केंद्र आणि राज्य सरकारात सत्तास्थानी असलेल्या भाजपाच्या लोकप्रतिनिधींकडून ‘पार्टी विथ द डिफरन्स’ या तत्त्वाला अनुसरून आचरण अपेक्षित आहे. पण तिथेही बोंब असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. बायकोची चुकामुक झाल्याने वैतागलेले जळगावचे खासदार ए.टी. पाटील यांनी कल्याण रेल्वेस्थानकावर तब्बल ५० मिनिटे गोंधळ घातला. बायकोशी संपर्क साधून द्या, त्याच गाडीत तातडीने तिकीट द्या, खालचा बर्थ द्या अशा मागण्या करीत पाटील यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या घटनेचा जो तपशील बाहेर आला त्यानुसार पाटील हे जळगावकडे जाणाऱ्या गाडीऐवजी पुण्याच्या गाडीत बसले आणि घोळ झाला. चूक स्वत:ची असताना त्याचे खापर रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर फोडणे सर्वथैव चुकीचे आहे. ‘खास’ असल्याच्या भावनेतून असे प्रकार घडतात. मात्र त्यातून लोकप्रतिनिधी म्हणून ते जनतेपुढे कोणता आदर्श ठेवतात हा गहन प्रश्न आहे. पाटील यांच्याच पक्षाचे चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांनी तर पुढची मजल मारली. पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याच्या श्रीमुखात भडकावून जनतेच्या प्रश्नाप्रति किती जागरूक आहोत आणि प्रसंगी कायदादेखील हातात घ्यायला मागे पुढे पाहत नाही, असा आदर्श (?) वस्तुपाठ त्यांना घालून द्यायचा होता काय? शासकीय योजनेतून गोठाशेड मिळावे, यासाठी एका शेतकऱ्याने पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला वर्षभरापूर्वी चार हजार रुपये दिले होते, परंतु तरीही त्याला गोठाशेड मंजूर झाले नाही. शेतकऱ्याने आमदारांकडे कैफियत मांडली. आमदारांनी तातडीने पंचायत समितीचे कार्यालय गाठून जाब विचारला. अशा प्रकारांमधून शासकीय कर्मचारीवर्ग नाऊमेद होण्याची शक्यता आहे. या दोन्ही घटनांवरून या लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घेऊन वेगळेपण दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडे कायदा हातात घेऊन वृत्तपत्रांचे मथळे आणि समाजमाध्यमांवरील चर्चांद्वारे स्वत:ला नायक म्हणून ठसविण्याचा कैफ लोकप्रतिनिधींना चढला आहे. त्यातून हे प्रकार घडत असून, ते लोकशाहीला मारक आहे.

Web Title: This is a good day?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.