आयकरात सुविधा, जीएसटीत दुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 04:36 AM2019-09-24T04:36:16+5:302019-09-24T04:37:42+5:30

आशा करूया की लवकरच ‘रिवाइज रिटर्न’ जीएसटीमध्येही उपलब्ध करण्यात यावा, जेणेकरून अर्थव्यस्थेमध्येही चांगले दिवस येतील.

good facilities in income tax but problems with gst | आयकरात सुविधा, जीएसटीत दुविधा

आयकरात सुविधा, जीएसटीत दुविधा

Next

- उमेश शर्मा, सीए

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, २0 सप्टेंबर २0१९ ला जीएसटी कौन्सिलची मीटिंग झाली आणि आयकरात जबरदस्त बदल झाले. त्या दिवशी जीएसटीमध्ये काय शिफारस करण्यात आली?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, २0 सप्टेंबर हा करसंदर्भात खूप महत्त्वाचा दिवस मानला जाईल. सकाळी आयकरात कंपन्यांना सवलत दिली, पण संध्याकाळी जीएसटीमध्ये काही सुविधेचे निर्णय दिसले नाही. ३७ व्या जीएसटी कौन्सिलच्या मीटिंगमध्ये कायदा आणि कार्यपद्धतीसंबंधित बदल सुचविले गेले. तसेच वस्तू व सेवांच्या पुरवठ्याशी संबंधित जीएसटी दरही बदण्याचा प्रस्ताव दिला गेला. हे बदल १ ऑक्टोबरपासून लागू होतील.
अर्जुन : कायदा आणि कार्यपद्धतीत प्रस्तावित बदल काय होते?
कृष्ण : कायदा आणि कार्यपद्धतीत प्रस्तावित बदल खालीलप्रमाणे आहेत :
*आर्थिक वर्ष २0१७-१८ आणि १८-१९ साठी वार्षिक परतावा (Annual Return) भरण्यासाठी सवलत आहे
अ. जीएसटीआर-९ फॉर्म भरणे त्या करदात्यांसाठी पर्यायी/ऐच्छिक आहे, ज्यांची वार्षिक उलाढाल दोन कोटींपर्यंत आहे,
ब. कंम्पोझिशन करदात्यांना जीएसटीआर ९-अ फॉर्म भरण्यासाठी माफी देण्यात आली आहे.
* सेल्स डिस्काउंटसंदर्भात विविध शंकांबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी २८ जून २0१९ ला परिपत्रक जारी केले गेले होते, त्यास रद्द करण्यात आले आहे.
अर्जुन : कृष्णा, सेवांवरील जीएसटी रेटमध्ये बदल करण्याच्या शिफारशी काय आहेत?
कृष्ण : अर्जुना, सेवांसाठी जीएसटी रेटमध्ये बदल करण्याच्या शिफारशी खालीलप्रमाणे :
* आदरातिथ्य आणि पर्यटन :
अ) हॉटेलच्या राहण्याची सेवा देण्याचा जीएसटी दर, जर व्यवहार मूल्य दिवसाला एक हजार रुपयांपेक्षा जास्त असेल, परंतु साडेसात हजार रुपयांपर्यंत, तर १२ टक्के जीएसटी दर लागू आहे. तेच जर साडेसात हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास १८ टक्के दर लागू होईल जो आधी २८ टक्के होता.
ब) रु. ७,५0१ प्रत्येक दिवसाप्रमाणे दर असलेल्या जागेव्यतिरिक्त बाह्य सेवा देणाऱ्या कॅटरिंग सेवेवरील जीएसटी दर कमी करण्यात आला आहे. ते १८ टक्के आयटीसी, सोबत वरून ५ टक्के आयटीसीशिवाय करण्यात आला आहे.
* नोकरी कार्य सेवा :
इंजिनीअरिंग इंडस्ट्रीसारख्या मशीन जॉब वर्कच्या पुरवठ्यावरचा जीएसटी दर १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे.
वाहतूक :
हवाई किंवा समुद्राद्वारे निर्यात मालवाहतुकीवर जीएसटी सवलतीच्या मुदतीत आणखी एका वर्षाची वाढ करण्यात आली आहे. तेच ३0 सप्टेंबर २0२0 पर्यंत. याचा करदाते फायदा घेऊ शकतील. तसेच इतर अनेक महत्त्वपूर्ण बदलांच्या तपशीलवार माहितीसाठी नोटिफिकेशन वाचावे.
अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने आयकरात मोठा दिलासा दिला आहे. तसेच जीएसटीमध्येही मोठा दिलासा अपेक्षित होता. जसे ऑटोमोबाइल्सच्या जीएसटी दरामध्ये कपात इत्यादी. अशी आशा करूया की लवकरच ‘रिवाइज रिटर्न’ जीएसटीमध्येही उपलब्ध करण्यात यावा, जेणेकरून अर्थव्यस्थेमध्येही चांगले दिवस येतील. याचा बोध म्हणजे ‘आयकरात सुविधा, पण जीएसटीत दुविधा’ असेच म्हणावे लागेल.

Web Title: good facilities in income tax but problems with gst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.