पोप फ्रान्सिसना शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 05:46 AM2019-02-08T05:46:29+5:302019-02-08T05:46:58+5:30

आधुनिक विचारसरणीशी जुळवून घेणारे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी संयुक्त अरब अमिरातीला दिलेल्या ऐतिहासिक भेटीमुळे इस्लाम आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्मांतच नव्हे, तर संपूर्ण जगभरात आशावादाची नवी पालवी फुटली आहे.

Good Luck to Pope Francis | पोप फ्रान्सिसना शुभेच्छा

पोप फ्रान्सिसना शुभेच्छा

googlenewsNext

सध्याचे सर्वश्रेष्ठ रोमन कॅथलिक धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी संयुक्त अरब अमिरात या मुस्लीम राष्ट्राला दिलेली पहिली भेट जेवढी ऐतिहासिक आणि धार्मिक तेवढीच भविष्यकालीन महत्त्वाची ठरावी, अशी आहे. या दोन धर्मांतील वैराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. प्रत्यक्षात सातव्या शतकात सुरू झालेले त्यांच्यातील युद्ध ७०० वर्षे चालून १४ व्या शतकात इस्तंबूलच्या तहाने थांबले. त्या तहानेच त्या धर्मांच्या पश्चिमेकडील सीमा निश्चित केल्या. मात्र नंतरच्या काळातीलही त्यांच्यातील वैर थांबले नाही आणि आज अरब गनिमांचे सुरू असलेले ख्रिश्चनविरोधी लढे हेही त्याच इतिहासाशी जोडले आहेत.

मुसलमानांचा इतिहास केवळ ख्रिश्चनांशी केलेल्या युद्धांनी भरलेला नाही, तर त्यांनी केलेल्या लढायांनी तो ज्यू धर्माशीही जोडलेला आहे. इस्लामची भारतावरील पहिली स्वारी सातव्या शतकातीलच आहे. चौदाव्या शतकात त्यांना दिल्लीत प्रथम आपली सत्ता स्थापन करता आली. सारांश सारे मध्ययुग धर्मांच्या युद्धांनी ग्रासले आहे आणि त्यात आजवर किती माणसे मेली याचा इतिहास लिहायला ज्ञानी माणसेही धजावलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर पोप फ्रान्सिस यांची ख्याती त्यांच्या आधुनिक विचारांमुळे व प्रगतीशील धोरणांमुळे साऱ्या जगात फार मोठी मानावी, अशी आहे. त्याचवेळी अरब अमिरातीचे राजकुमार शेख महंमद बिन झायेल अल-निहान हेही त्यांच्या प्रागतिक धोरणांसाठी प्रसिद्ध आहेत. ख्रिश्चन व अरब जगतातील तेढीमुळे त्या दोन्ही धर्मांचे व क्षेत्रांचे आजवर केवढे नुकसान झाले व त्यांना किती मोठ्या आर्थिक आपदांना तोंड द्यावे लागले, याची त्या दोघांनाही कल्पना आहे. त्याखेरीज धार्मिक युद्धाच्या तहानंतर जी धर्माधिष्ठित राष्ट्रे तयार झाली, त्यातील कधी उघड तर कधी सुप्त संघर्ष तसाच धुमसत राहिला.

नंतरच्या काळात वेगवेगळ्या निमित्तांनी या दोन प्रदेशांत असलेली जनतेतील धार्मिक तेढ त्यांना स्वस्थ राहू देत नाही, याचीही जाणीव या दोन्ही व्यक्तींना आहे. त्याचमुळे अमिरातीच्या सरकारने गेल्या काही वर्षांपासून धार्मिक तेढ व द्वेष कमी करणारे व अन्य धर्मांविषयीची आस्था वाढविणारे कार्यक्रम हाती घेतले आहेत. तिकडे पोप फ्रान्सिस प्रगतीशील आहेतच. त्यांनी कम्युनिस्ट देशांसह अन्य धर्मपंथांच्या देशांनाही आजवर भेटी दिल्या आहेत. जगातील बहुसंख्य देशांत सध्या धार्मिक व वर्णविषयक दुहीने थैमान घातले आहे. धर्मांधांच्या कडव्या संघटना आपल्याच धर्मातील उदारमतवादी व प्रगतीशील लोकांच्या हत्या करीत आहेत. आपल्याच देशबांधवांना हद्दपार करून देशाबाहेर घालविण्याचे कामही ते करीत आहेत.

दक्षिण-मध्य आशिया आणि दक्षिण व उत्तर अमेरिका या संघर्षाने व्यापली आहे. पूर्वेकडेही ब्रह्मदेशाच्या सीमेवर रोहिंग्या आदिवासींची, केवळ ते मुसलमान आहेत म्हणून त्या देशातील बौद्धांनी हद्दपारी व कत्तल चालविली आहे. भारतासारख्या स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजणाºया देशातही धार्मिक तणाव आहे आणि धर्माच्या नावावर हिंसा होत असलेली जगाला दिसते आहे. धर्माचा आधार श्रद्धा आहे आणि श्रद्धांवर तर्कांना आणि विज्ञानाला मात करता येत नाही. यातील सारे प्रश्न फक्त स्नेह, मैत्री, आत्मीयता आणि हृदयपरिवर्तन याच मार्गाने सोडविता येतात. आवश्यक बाबी साध्य करता येतात. असा भव्य प्रयत्न भारतात महात्मा गांधींनी याआधी केला. नंतरच्या काळात मात्र धर्मा-धर्मांतील तेढ वाढविण्याचेच राजकारण करण्याचे, त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न झाले.

जगातील कोणत्याही प्रदेशात धर्म आणि राजकारण जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते कमालीचे हिंस्र आणि एकांगी होतात. त्याची ठळक उदाहरणे गेल्या काही दशकांत आपल्याकडेही उग्र स्वरूपात पाहायला मिळाली. जे असा द्वेष निर्माण करतात किंवा त्याला खतपाणी घालतात त्यांना अशा धार्मिक उन्मादात पोळलेल्यांकडे नंतर पाहायलाही वेळ मिळत नाही, हेही देशाने अनुभवले. या पार्श्वभूमीवर इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माच्या नेत्यांनी एकत्र येण्याचा हा प्रसंग जगात आशावादाची नवी पालवी निर्माण करणारा आहे. याआधी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी इजिप्तमधील ऐतिहासिक सभागृहात भाषण करून असा प्रयत्न केला होता. पोप फ्रान्सिस यांचा प्रयत्न यापुढे जाणारा असेल आणि तो यशस्वी होत असेल, तर त्याला साºया जगाने शुभेच्छा दिल्या पाहिजेत.

Web Title: Good Luck to Pope Francis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Popeपोप