बरे झाले ! पायताण चोरी गेले, शनि गेला !!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:42 AM2017-12-02T00:42:20+5:302017-12-02T00:42:40+5:30
औरंगाबादेत सारेकाही आहे. जायकवाडीचे भरपूर पाणी आहे. इतिहासाचा भला मोठा वारसा आहे. इंडस्ट्रीजसाठी भरपूर जागा आहे. हुशार राजकारणी आहेत. चांगल्या प्रशासकीय अधिकाºयांचीही आम्हाला अजिबात वानवा नाही. साºयाच बाबतीत इतके गडगंज वातावरण असताना शहर ‘स्मार्ट’ का होऊ शकले नाही?
आमचा श्रद्धेवर गाढ विश्वास आहे. पण, म्हणून आम्ही अंधश्रद्धेत जगतो, असे अजिबात नाही. पायताण चोरी जाणे हा शुभसंकेत आम्ही मानतो. ते चोरी जाणे म्हणजे आपली इडा-पीडा गेली. शनि गेला असे आम्ही मानतो. अस्सल मराठवाड्याच्याच भाषेत म्हणायचे तर दलिंदरी गेली असे आम्ही समजतो. औरंगाबादला स्मार्ट कसे करायचे, याचे महापालिकेत चिंतन सुरू असताना संशोधन केंद्राच्या बाहेर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोडलेले पायताण कोणीतरी चोरले. पायताण जिल्हाधिकाºयांचे असले तरी या चोरीतून अनेक वर्षांपासून शहराच्या विकासात अडसर ठरणारा शनि गेला, असे आम्ही मानतो. ही अंधश्रद्धा समजणाºयांनी ‘सारे काही असूनही औरंगाबाद ‘स्मार्ट’ का होऊ शकले नाही’ या प्रश्नाचे उत्तर आम्हाला द्यावे. औरंगाबादेत सारेकाही आहे. जायकवाडीचे भरपूर पाणी आहे. इतिहासाचा भला मोठा वारसा आहे. इंडस्ट्रीजसाठी भरपूर जागा आहे. हुशार राजकारणी आहेत. विधानसभा अध्यक्षांपासून मंत्र्यांपर्यंत मोठमोठी पदे आम्हाला यापूर्वी मिळाली आहेत, सध्याही मिळत आहेत. चांगल्या प्रशासकीय अधिकाºयांचीही आम्हाला अजिबात वानवा नाही. साºयाच बाबतीत इतके गडगंज वातावरण असताना शहर ‘स्मार्ट’ का होऊ शकले नाही? का बरे होत असावे असे? अनेक प्रकारची दलिंदरी या शहराला लागली असावी, असे आम्हाला वाटते. तुम्हाला ही अंधक्षद्धा वाटेलही कदाचित. पण, आमची तीच श्रद्धा आहे. बरे झाले, ही दलिंदरीच आता चोरीला गेली. त्यामुळे औरंगाबाद शहराचा ‘स्मार्ट’ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकाºयांचे पायताण चोरी जाण्याच्या आधी झालेल्या बैठकीत स्मार्ट सिटीबाबत जे काही चिंतन झाले, विकासाभिमुख निर्णय घेण्यात आले त्याच्या भीतीनेच हा शनि पळून गेला असावा कदाचित. स्मार्टसिटीसाठी पूर्णवेळ सीईओंची नियुक्ती करण्याचे ठरले. शहरातील एलईडी पथदिव्यांबाबत आणि कायम डोकेदुखी ठरत असलेल्या घनकचरा प्रकल्पाबाबत अभ्यास करण्याचा निर्णय झाला. घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्पही उभारण्याचे ठरले. क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन हा स्मार्ट रोड म्हणून घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. भविष्यात या स्मार्ट रोडच्या दोन्ही बाजंूनी झाडे लावली जातील. वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक तयार केला जाईल. दुभाजकाची रचनादेखील वैशिष्ट्यपूर्ण असेल. शहरात पहिल्या टप्प्यात पुढील महिन्यात म्हणजे जानेवारीत पाच बस खरेदी करून एस.टी. महामंडळाला दिल्या जातील आणि त्या शहर बस म्हणून रस्त्यावर धावतील. बेंगळुरूच्या धर्तीवर या शहरबसचे नियोजन केले जाईल. सोलर सिटीसाठी ५३ लाखांच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली. शहराचा कुठलाच प्रश्न बाजूला राहिला नाही. मग अशा स्थितीत शहरात ‘शनि’चे काय ते काम? हे सारे निर्णय पाहून शनिला स्वत:च्या अस्तित्वाचाच प्रश्न पडाला असावा. त्यामुळे पायताणाच्या माध्यमातून त्याने शहरातून काढता पाय घेतला असवा. बरे झाले, पोलिसांत कुणी तक्रार नोंदविली नाही. नाहीतर गेलेल्या शनिला पोलिसांनी पकडून पुन्हा शहरात आणले असते. ते आम्हाला थोडेच परवडले असते !