अलविदा उस्तादजी, मैफल सुरू आहे, सुरूच राहील…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2024 08:42 IST2024-12-17T08:40:08+5:302024-12-17T08:42:30+5:30

झाकीर यांनी थांबूच नये, असे वाटत असे. 

goodbye ustad zakir hussain the concert is on it will continue | अलविदा उस्तादजी, मैफल सुरू आहे, सुरूच राहील…

अलविदा उस्तादजी, मैफल सुरू आहे, सुरूच राहील…

झाकीर हुसेन गेले’ आणि ‘झाकीर हुसेन नाहीत गेलेले’ या दोन बातम्यांच्या हिंदोळ्यावर रात्र सरली. तबल्याच्या तालावरच रात्र चाललेली. याच हिंदोळात सकाळ झाली. ओळखीच्या सुरांनी जाग आली. मग तर खात्री पटली. या उभयान्वयाशिवाय खरी बातमीच नाही देता येणार. ‘झाकीर गेले, पण झाकीर नाहीत गेलेले!’ कसे जातील उस्ताद झाकीर हुसेन? अवघ्या आसमंतात भरलेला आहे तो सूर. तबल्यावर त्यांची थाप पडावी आणि त्या अचेतनाला स्पर्श व्हावा सचेतनेचा. अशी व्हावी जादू की, त्या लयीत आपल्याला आपली आतली लयही सापडावी, असं काहीतरी अलौकिक होतं झाकीर यांचं तबलावादन. कान तृप्त करणारं तबलावादन खूप जण करतात, पण इथं मन तृप्त होई आणि तरीही अपूर्णतेची गोडीही वेड लावी. आणखी हवं, आणखी हवं, असं मन म्हणत असे. झाकीर यांनी थांबूच नये, असे वाटत असे. 

पोरसवदा वयात तबल्यावर पडलेली ही थाप अखेरच्या क्षणापर्यंत पडत राहिली आणि या कोलाहलातही मनाच्या अगदी खोलपर्यंत पोहोचत राहिली. काळ बदलला, जग बदलले. मात्र हा संवेदनशील कलावंत कधी थकला नाही. कधी उदास झाला नाही. ‘हे जग मी आणखी सुंदर करत राहीन’, एवढ्याच ग्वाहीसह झाकीर मैफली करत राहिले आणि जग अधिक देखणे होत गेले! झाकीर यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी अमेरिकेत पहिला कार्यक्रम केला. 

तेव्हापासून ते अगदी अखेरपर्यंत अमेरिकेने त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. झाकीर यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड’ १९७३ मध्ये आला. त्यानंतर देशानेच काय, अवघ्या जगाने त्यांची नोंद घेतली. झाकीर हा अवलिया कलावंत. झपाटलेला माणूस कसा असावा, याचे उदाहरण. आपल्याच धुंदीत ते तबल्यावर बसले की, त्यांना कशाचेच भान उरत नसे. कुठेही सपाट जागा बघून उस्ताद झाकीर हुसेन बोटांनी धून वाजवायचे. एवढेच काय, स्वयंपाकघरातली भांडीही शिल्लक राहिली नाहीत. तवा, भांडी, ताटावरही हात आजमावायचे. तबला हा त्यांचा जीव की प्राण! सदैव तबला मांडीवर. त्यांच्या एका मित्राने सांगितले होते, सुरुवातीच्या काळात पैसे नसायचे. मग ते रेल्वेच्या साध्या डब्यातून प्रवास करायचे. बसायला जागा मिळाली नाही तर जमिनीवर वर्तमानपत्र पसरवून झोपायचे. पण याही काळात तबल्याला कोणाचा पाय लागू नये म्हणून तबला मांडीवर घेऊन झोपायचे! झाकीर यांना हा वारसा मिळाला तो घरातून. त्यांचे वडील उस्ताद अल्लारखां प्रख्यात तबलावादक. झाकीर अगदी बारा वर्षांचे असताना अब्बूंसोबत एका मैफलीला गेले होते. पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, बिस्मिल्ला खान, पंडित सामता प्रसाद आणि पंडित किशन महाराज असे दिग्गज तिथे होते. झाकीर वडिलांसोबत स्टेजवर गेले. कार्यक्रम संपल्यानंतर छोट्या झाकीरला पाच रुपये एवढे मानधन मिळाले. एका मुलाखतीत या घटनेचा संदर्भ देत झाकीर म्हणाले होते, ‘मी माझ्या आयुष्यात खूप पैसे कमावले, पण ते पाच रुपये माझ्यासाठी फारच खास होते!’ 

झाकीर यांनी तबल्याला ग्लॅमर मिळवून दिले. तबला हे मैफलीतले तसे पूरक वाद्य. मात्र, झाकीर यांच्यामुळे तबल्यालाच वलय मिळाले. त्यात झाकीर यांचे व्यक्तिमत्त्व भलते लोभस आणि लाघवी. तबल्यासोबत उडणारी केसांची झुलपे पाहून गल्लीतले तबलावादकही झाकीर होऊ लागले! एखाद्या हीरोप्रमाणे त्यांचे गारूड तयार झाले. त्यांच्यासाठी लोक पागल होते. तबला वाजवणाऱ्या झाकीर यांना पाहणे हाही एक अनुभव होता! झाकीर सार्वजनिक कार्यक्रमात दिसू लागले, तो काळ वेगळा होता. जगभरातील वादक भारतीय वाद्यसंगीतासोबत विविध प्रयोग करायला उत्सुक होते. तेव्हा झाकीर यांनी ‘शक्ती बँड’ची स्थापना करत,  भारतीय संगीताची शक्ती जगभर पोहोचवली. ‘हीरो’ व्यक्तिमत्त्वाच्या झाकीर यांनी काही चित्रपटांमध्येही काम केले. १९८३ मध्ये आलेल्या ‘हीट अँड डस्ट’ या ब्रिटिश चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. १९९८मध्ये आलेल्या ‘साज’ चित्रपटात ते नायक होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत शबाना आझमी होत्या. आणखी एक गंमत आहे. ‘मुघल-ए-आझम’मध्ये झाकीर यांना सलीमच्या धाकट्या भावाच्या भूमिकेसाठी विचारले गेले होते. त्यांच्या वडिलांना मात्र ते निव्वळ अमान्य होते. झाकीरने तबल्यावरचे लक्ष विचलित करू नये, असे त्यांना वाटत होते. त्यांनी ती भूमिका स्वीकारली असती, तर आपल्याला रूपेरी पडद्यावरचा जबरदस्त नायक मिळाला असता की एक ‘उस्ताद’ आपण गमावला असता, हे सांगणे कठीण आहे! 

अर्थात, पडद्यावर फार न दिसताही ते त्यांच्या चाहत्यांचे हीरोच तर होते. आणि हा ‘हीरो’ कोणीही प्रेमात पडावे, असाच होता. रुबाब तर होताच, पण जोडीला मार्दवही. शांत, शालीन, निरागस असे व्यक्तिमत्त्व. पुढे माध्यमे बदलली. नवी माध्यमे आली. तरीही त्यांचा त्रिताल, एकताल, झपतालातले पलटे, कायदे, पेशकार अगदी नव्या माध्यमांवर पाहिल्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही. त्यांची तबल्यावरची वाजणारी चाट, अनेक अनवट प्रयोग हे सगळे तबल्याचे शास्त्र न समजणाऱ्यालाही डोलायला भाग पाडते. ही जादू आहे झाकीर यांची. मैफलीनंतर आपले वाद्य स्वतः उचलून गाडीत ठेवणारे, कोणताही आव न आणता चाहत्यांशी बोलणारे झाकीर हे प्रकरणच वेगळे. झाकीर हे ‘श्रीमंत तालयोगी’ होते. म्हणून तर त्यांनी केलेली सामान्य जाहिरातसुद्धा लोकांनी ‘व्वाह!’ म्हणून स्मृतीसंपुटात जपून ठेवली आहे. आज झाकीर नाहीत, पण मैफल मात्र सुरूच आहे. आजही आपल्या आतल्या आवाजासारखा घुमू लागतो आवाज तबल्याचा. झाकीर नावाची काया गेली खरी, पण निरंतर असणार आहे जगज्जीवनी - ‘झाकीर अँड हिज तबला..  धा धिन धा’...
 

Web Title: goodbye ustad zakir hussain the concert is on it will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.