गुगल देवर्षी सीआयडीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 05:41 AM2018-05-04T05:41:21+5:302018-05-04T05:41:21+5:30

एसीपी प्रद्युम्न आणि इन्स्पेक्टर दया स्वर्गलोकात पोहोचले आणि त्यांनी थेट इंद्रदेवाची भेट घेतली

Google Devshi in the trap of CID | गुगल देवर्षी सीआयडीच्या जाळ्यात

गुगल देवर्षी सीआयडीच्या जाळ्यात

Next

एसीपी प्रद्युम्न आणि इन्स्पेक्टर दया स्वर्गलोकात पोहोचले आणि त्यांनी थेट इंद्रदेवाची भेट घेतली. आपण देवर्षी नारद मुनींच्या शोधात येथवर पोहोचल्याचे त्यांनी सांगताच इंद्राचे सिंहासन गदगदा हलू लागले. लागलीच दया पुढे धावला व त्याने ते सिंहासन गच्च पकडून ठेवल्याने देवाधिदेव इंद्र त्यावरून पडतापडता वाचले. दया, कुछ तो गडबड है... असं म्हणत एसीपी प्रद्युम्न यांनी आपल्याला नारदमुनींचा ठावठिकाणा हवा असल्याचे सांगितले. इंद्रानं आपला सॅटेलाईट फोन उचलून नारदाचे पिताश्री ब्रह्मदेवांना फोन लावला. आपल्या पुत्राकडे तिन्हीलोकी मुक्तसंचार करण्याचा पासपोर्ट असल्याने सध्या तो नेमका कुठे आहे, ते सांगणे कठीण आहे, असे ब्रह्मदेव बोलले. मात्र, सीआयडीने नारदमुनींना शोधून काढलेच. अरे, पण मी पामराने असे काय पातक केले की, तुम्ही मला आपल्यासोबत येण्यास बाध्य करत आहात, असा सवाल मुनीवर यांनी करताच अभिजित म्हणाले की, ते तुम्हाला सीआयडीच्या सेटवर गेल्यावरच कळेल. नारद खुर्चीत बसले असून समोर एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजित, फ्रेड्रिक्स वगैरे उभे होते. दया, कुछ तो गडबड है. अब असली बात का पता चलेगा... प्रद्युुम्न बोलले. वत्सा, मी गुन्हा काय केलाय? नारदमुनींनी काहीशा घाबऱ्याघुबºया सुरात विचारले. खूप गंभीर गुन्हा केलाय तुम्ही, दया अधिक जवळ सरकताच मुनीवरांनी वीणा छातीशी घट्ट धरून अंग चोरून घेतले. प्रद्युम्न बोलू लागले... तुम्हाला तुमच्या वडिलांनी- ब्रह्मदेवांनी विवाह करायला सांगितले होते. परंतु, तुम्ही त्यांची आज्ञा मानली नाही आणि कठोर तपश्चर्या करत राहिलात. त्यामुळे तिन्ही लोकी हाहाकार उडाला. कामदेवाने तुमची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानेही हात टेकले. तुम्हाला ब्रह्मदेवांनी शाप दिला की, तुम्ही गंधर्वयोनीत जन्म घ्याल आणि कामिनींचा सहवास तुम्हाला लाभेल. मात्र, तुम्ही भक्ती सुरू ठेवली. एक दिवस विष्णूने तुमची परीक्षा बघायचे ठरवले. मायानगरी तयार करून देवी लक्ष्मीने रूप घेतलेल्या राजकुमारीकडे तुम्हाला आकृष्ट केले. तिला वश करण्याकरिता तुम्ही विष्णूकडे सुंदर रूप मागितले. पण, त्या राजकुमारीने दीनरूपातील विष्णूला पसंत केल्याने तुमचा तीळपापड झाला.
क्रोध अनावर होऊन परत येत असताना तुम्ही नदीपात्रात स्वत:चा चेहरा पाहिला, तर तो माकडासारखा दिसत होता. त्यामुळे तुम्ही क्रोधित होऊन विष्णू-लक्ष्मीला शाप दिला की, तुम्ही मला जसा स्त्रीवियोग दिला, तसा तो तुम्हालाही होईल. त्यामुळे त्या दोघांना राम-सीतेचा अवतार घ्यायला लावले. तुम्ही एवढ्यावरच थांबला नाहीत. तिकडे जंगलात दरोडे टाकून पोट भरणाºया वाल्या कोळ्याच्या वाटेत तुम्ही आडवे गेलात आणि त्याला वल्मीक (वारुळातून) बाहेर काढून वाल्मिकी होण्यास भाग पाडले. राम-सीतेच्या वनवासाची, वियोगाची कथा लिहिण्यास भाग पाडले. अत्री ऋषींची पत्नी अनसूया हिच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्याकरिता ब्रह्मा, विष्णू, महेश यांना इहलोकी येण्याची फूस लावली. अनसूयेकडे त्यांनी निर्वस्त्र जेवण वाढण्याची मागणी केली. लोकांबद्दलची माहिती लीक करणे, ती प्रसिद्ध करण्यास भाग पाडणे वगैरेवगैरे गुन्ह्यांखाली ‘गुगल देवर्षी’ आता आत बसा...
- संदीप प्रधान (sandeep.pradhan@lokmat.com)

Web Title: Google Devshi in the trap of CID

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.