कारवां गुजर गया, गुबार देखते रहे... गोपालदास नीरज : एक सदाबहार व्यक्तिमत्व!
By विजय दर्डा | Published: January 15, 2024 08:13 AM2024-01-15T08:13:15+5:302024-01-15T08:15:31+5:30
Gopaldas Neeraj : या जगात राहत असतानाच कवी नीरज यांच्याकडे ‘त्या’ वेगळ्या जगाची खबरबात नक्की होती, असणार! ते होतेच असे, की प्रेमात पडणे अटळ!
- डॉ. विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
उभ्या जगाची चिंता घेऊन बसलेल्या, जडावलेल्या डोळ्यांच्या त्या व्यक्तीला चढत्या रात्री पहाट फुटेपर्यंत ऐकत राहिले, तरी मन भरत नसे. त्यांनी आणखी थोडे काही ऐकवावे, थोडे आणखी काही ऐकावे हीच तर त्या कवी, शायर आणि गीतकाराची कमाल होती. अनोखे व्यक्तिमत्त्व असलेल्या गोपालदास सक्सेना यांची दखल न घेऊन काळ तरी कसा पुढे सरकला असता? गोपालदास नीरज या नावाने हा माणूस सदा बहार फुलवत राहिला. त्यांनी लिहिले होते,
इतना बदनाम हुए हम तो इस जमाने में
तुमको लग जाएगी सदिया हमें भुलाने मे!
गेल्या ४ तारखेला नीरज यांची जन्मशताब्दी सुरू झाली, आणि असंख्य आठवणींचे आभाळ भरून आले. हरीश भल्ला यांनी माझी त्यांच्याशी भेट घालून दिली होती. नीरज यांच्या स्नेहाच्या, त्यांच्या खर्जातल्या आवाजाच्या किती आठवणी. त्यांनी प्रेमगीते तर अशी लिहिली की बेधुंद होऊन जावे...
शोखियों मे घोला जाये फुलों का शबाब,
उसमे फिर मिलाई जाए थोडीसी शराब,
होगा यूं नशा जो तैयार, वो प्यार है...
जग त्यांना प्रेमरसात आकंठ बुडालेला शायर आणि गीतकार म्हणून ओळखते खरे; पण, कितीतरी संध्याकाळी मी त्यांच्या सहवासात घालवल्या, त्यांच्याविषयी खूप काही ऐकले आणि वाचलेही पुष्कळ. त्यांची गीतरचना जीवनातल्या हरेक मर्माला स्पर्श करते. त्याचे काही कारणही आहे. नीरज यांनी जमिनीवरील धूळ अंगावर घेतली तसा आकाशातल्या भरारीचा आनंदही घेतला.
टायपिस्ट म्हणून नोकरीला सुरुवात करून पुढे ते प्राध्यापक झाले. निष्कांचन अवस्थेतून गेले, तशा बेधुंद मैफलीही रंगवल्या. परंतु, जगण्याला स्वतःपासून कधीही दूर होऊ दिले नाही. समाजातील व्यंग ते बेधडकपणे समोर ठेवत गेले..
है बहुत अंधीयार,
अब सूरज निकलना चाहिए
जिस तरह से भी हो,
ये मौसम बदलना चाहिए
रोज जो चेहरे बदलते है,
लीबासों की तरह
अब जनाजा जोर से,
उनका निकलना चाहिए
हे त्यांचेच तर शब्द!
प्रेमरथावर स्वार होऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवता येतो हे नीरज जाणत असत. ते लिहितात,
अब तो मजहब कोई ऐसा चलाया जाए
जिसमें इन्सान को इंसान बनाया जाए
१९५८ साली आकाशवाणी लखनऊवरून त्यांची एक कविता रसिकांपुढे आली.
स्वप्न झरे फूल से, मीत चुभे शूल से
लुट गये सिंगार सभी, बाग के बबूल से
और हम खडे खडे बहार देखते रहे
कारवाँ गुजर गया, गुबार देखते रहे...
ही रचना ऐकून तरुण वेडावले.
या कवितेने नीरज यांना नवी ओळख दिली. एके दिवशी नीरज यांनी मला देव आनंद यांच्याशी झालेल्या भेटीचा किस्सा ऐकवला.
देव आनंद एका मुशायऱ्यात पाहुणे म्हणून कोलकात्याला गेले असताना त्यांनी नीरज यांची कविता ऐकली. लगोलग नीरज यांच्याजवळ जाऊन ते म्हणाले, “कधी चित्रपटांसाठी लिहिण्याची इच्छा झाली तर जरूर सांगा!”
खूप वर्षांनंतर नीरज यांना देव आनंद यांची आठवण झाली. त्यांनी एक पत्र लिहिले आणि देव आनंद यांचे बोलावणे आले. नीरज मुंबईला पोहोचले. देव आनंद यांनी त्यांची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये केली. सचिनदेव बर्मन यांनी नीरज यांना अट घातली की गाण्याचे बोल ‘रंगीला रे’ने सुरू झाले पाहिजेत. त्याच रात्री नीरज यांच्या प्रतिभेतून ‘प्रेमपुजारी’ या चित्रपटातले गीत जन्माला आले.
रंगीला रे.. तेरे रंग में यू रंगा है मेरा मन
छलिया रे.. ना बुझे है किसी जल से ये जलन
- हे गाणे पुन्हा एकदा जरूर ऐका.
जीवनाचा सगळा अर्थ त्यात सापडेल.
नीरज यांना भेटले की वाटे, त्यांना फक्त ऐकत राहावे. केवळ गीत, गझल, शायरी किंवा कविताच नव्हे; तर त्यांचे एरवीचे बोलणेसुद्धा असे अर्थपूर्ण असे की त्यांच्या प्रेमात पडणे अटळच! जगण्याशी जोडलेल्या प्रत्येक विषयाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी त्यांच्याकडे होती.
या जगात राहत असतानाच वेगळ्या जगाची खबरबात त्यांच्याकडे असणार. त्यांच्या आत्म्याचा स्वर अध्यात्माने भारलेला होता. आणि ते म्हणायचेसुद्धा, की, मी प्रेमाचा नव्हे, तर अध्यात्माचा कवी आहे. हरिवंशराय बच्चन यांचे ते मोठे भक्त! एके दिवशी बसमधून प्रवास करत असताना त्यांनी हरिवंशरायजींना म्हटले, ‘मी तुमच्यासारखा प्रसिद्ध होऊ इच्छितो.’
...आणि खरोखर नीरज यांना अफाट प्रसिद्धी मिळाली. आज त्यांच्या आणखी काही ओळी आठवतात..
जब चले जाएंगे हम लौट के सावन की तरह
याद आयेंगे प्रथम प्यार के चुंबन की तरह
आज की रात तुझे आखिरी खत और लिख दूं
कौन जाने यह दिया सुबह तक जले न जले?
बम बारूद के इस दौर में मालूम नहीं
ऐसी रंगीन हवा फिर कभी चले न चले...
या माणसाचा विसर पडणे शक्य तरी आहे का?