राजकीय ‘अॅनिमल फार्म’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:19 AM2018-04-10T00:19:49+5:302018-04-10T00:19:49+5:30
जॉर्ज आॅर्वेल या प्रख्यात इंग्लिश लेखकाने विसाव्या शतकात लिहिलेली ‘अॅनिमल फार्म’ ही कादंबरी बहुदा भारतातील वर्तमान राजकीय परिस्थितीचे पूर्वाकलन करूनच लिहिली असावी, अशी शंका घेण्यास पुरेपूर वाव आहे.
- नंदकिशोर पाटील
जॉर्ज आॅर्वेल या प्रख्यात इंग्लिश लेखकाने विसाव्या शतकात लिहिलेली ‘अॅनिमल फार्म’ ही कादंबरी बहुदा भारतातील वर्तमान राजकीय परिस्थितीचे पूर्वाकलन करूनच लिहिली असावी, अशी शंका घेण्यास पुरेपूर वाव आहे. किंबहुना, या कादंबरीतील पात्रं आणि आशय बघता तशी खात्रीच पटते. रामराज्याची स्वप्नं दाखवून एखाद्याने आपणास चक्क कीर्र जंगलात सोडावे आणि अवतीभवतीची श्वापदं, वन्यप्राणी बघून आपली घाबरगुंडी उडावी, अशी आपली गत हल्ली राजकीय नेत्यांची भाषणं ऐकताना होते. आपापल्या समर्थकांना ‘पंचतंत्रा’तील गोष्टी ऐकवून जे काही राजकीय मंथन घडविले जाऊ पाहात आहे, ते ऐकून समर्थकांची नव्हे, तर श्वापदांचीच पाचावर धारण बसण्याची वेळ आली आहे. विरोधकांना साप, मुंगूस, उंदीर आणि श्वानाची उपमा देऊन स्वत:ला सिंह म्हणवता येत असेलही; पण इवलासा ससाही सिंहाला कधीकधी भारी ठरू शकतो. इसापनीतीची ही गोष्ट सिंहानी (शहांनी नव्हे!) वाचवी अशी-
एका जंगलातील सिंहाचे पोट भरलेले असतानाही तो केवळ शक्तिप्रदर्शन करण्यासाठी दररोज अनेक प्राण्यांना ठार मारत असे. एके दिवशी कोल्ह्याच्या नेतृत्वाखाली प्राण्यांचे एक शिष्टमंडळ सिंहाकडे गेले. कोल्हा म्हणाला, ‘महाराज, आपणास शिकार करण्याचे कष्ट पडू नयेत, म्हणून आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आहे की दररोज आमच्यापैकी एक प्राणी आपल्याकडे येईल आणि आपले भोजन बनेल.’ कोल्ह्याचा हा प्रस्ताव ऐकून सिंह मनोमन आनंदीत झाला. त्याने प्रस्ताव मान्य केला. सर्व प्राणी निर्भय होऊन परतले. ठरल्याप्रमाणे पाळीपाळीने रोज एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला. एके दिवशी सशाची पाळी आली. सशाची घाबरगुंडी उडाली. रोज मनसोक्त बागडणारा ससा सिंहाचे भक्ष्य होण्यास सहजी तयार नव्हता. त्याच्या मनात विचार आला. खरंच! सिंहाला मारण्याचा काही उपाय मिळाला तर? वाटेत सशाला एक विहीर दिसली. त्याने विहिरीत डोकावून पहिले असता त्याला स्वत:चे प्रतिबिंब दिसले. सशाला शक्कल सापडल्याने तो वाटेमध्ये मुद्दामहून थोडा वेळ बसून राहिला. एकडे सिंहाला सपाटून भूक लागलेली. आपल्या भक्ष्याची वाट पाहत बसलेला असताना समोरून ससा येत असताना त्याला दिसला. चवताळेल्या सिंहाने विचारले, ‘काय रे सशा, तू एवढा वेळ का लावलास?’ अत्यंत विनयशील होत ससा उत्तरला, ‘महाराज, यात माझा मुळीच दोष नाही. आपण मला परवानगी दिलीत, तर मला उशीर होण्याचं कारण मी आपणास सांगू शकेन’ ‘जे सांगायचे असेल, ते लवकर सांग’ सिंह गरजला. ससा म्हणाला, ‘महाराज, रस्त्यात अचानक एक दुसरा सिंह भेटला. तो म्हणाला, जंगलाचा राजा तर मी आहे. तू कुठे जात आहेस? जर दुसरा कुणी स्वत:ला राजा म्हणत असेल तर त्याने माझ्याशी आधी युद्ध करावं आणि मला हरवावं!’ सशाचे हे निवेदन ऐकून सिंहाचे पित्त खवळले. सशाने सिंहाला त्या विहिरीपाशी नेले. सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले. त्याला वाटले, खरंच!आपला प्रतिस्पर्धी विहिरीत लपून बसला आहे. लागलीच तो स्वत:च्या प्रतिबिंबावर झेपावला आणि विहिरीत बुडून मेला! सर्व प्राण्यांना खूप आनंद झाला. त्यांनी सशाचे आभार मानले अन् सर्वांनी मिळून आनंदोत्सव साजरा केला!
(तात्पर्य: तुम्हीच काढा!)