सरकारपल्याडचा भारत-पाकिस्तान संवाद
By admin | Published: March 13, 2016 10:04 PM2016-03-13T22:04:53+5:302016-03-13T22:04:53+5:30
पाकिस्तानचा विषय निघाला की आपल्या मनात अगदी सहजपणे शत्रुत्वाची भावना डोकावते. याविषयी कोणाच्या मनात शंका असेल तर भारत व पाकिस्तानशी संबंधित कोणत्याही विषयावरील माध्यमांमधील चर्चा पाहिली
विजय दर्डा, (लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)
पाकिस्तानचा विषय निघाला की आपल्या मनात अगदी सहजपणे शत्रुत्वाची भावना डोकावते. याविषयी कोणाच्या मनात शंका असेल तर भारत व पाकिस्तानशी संबंधित कोणत्याही विषयावरील माध्यमांमधील चर्चा पाहिली की लगेच त्या शंकेचे निरसन होईल. भारतीय हवाईदलाच्या पठाणकोट तळावरील दहशतवादी हल्ल्यानंतरची चर्चा हे याचे ताजे उदाहरण म्हणता येईल. अशा चर्चांमध्ये भारतीयांचा आवाज टिपेला पोहोचतो व पाकिस्तानच्या बाजूने केले जाणारे यु्क्तिवाद एवढे तकलादू असतात की, पाकिस्तानशी मैत्री वगैरे करण्याच्या वाटाघाटींवर वेळ वाया घालवणे निरर्थक आहे, कारण जेव्हा खरी वेळ येईल तेव्हा पाकिस्तान शत्रू म्हणूनच आपल्याशी दोन हात करणार, याविषयी आपली पक्की खात्री पटते.
दहशतवादाच्या प्रत्येक घटनेनंतर ज्यांच्याशी बोलण्यात वेळ घालवावा असे पाकिस्तानी विश्वासू नाहीत, असेच सर्वसाधारणपणे मानले जाते. मात्र सरकारी पातळीवरील भूमिका व माध्यमांनी निर्माण केल्या जाणाऱ्या या चित्राच्या पलिकडेही असे एक चित्र आहे ज्यात संवाद सुरु राहायला हवा, असे मनापासून वाटणारे व तशी प्रतिबद्धता मानणारे दोन्ही बाजूंचे असंख्य स्त्री-पुरुष आहेत.
भारत व पाकिस्तानातील दोन गट उभयपक्षी संवाद सुरु ठेवण्याचे नेमके हेच काम गेली अनेक वर्षे करीत आहेत व मीही त्यात सहभागी आहे. हे दोन गट म्हणजे इस्लामाबाद येथील ‘पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर लेजिस्लेटिव डेव्हलपमेंट अॅण्ड ट्रान्स्परन्सी’ आणि नवी दिल्ली येथील ‘लोकनिती सेंटर फॉर स्टडी आॅफ डेव्हलपिंग सोसायटीज’ या संस्था दोन्ही देशांमधील प्रसिद्धी माध्यमे, राजकारण आणि सरकारमधील प्रभावशाली व्यक्तींना एकत्र आणतात व उभयपक्षी स्वारस्याच्या सामायिक विषयांवर मनमोकळी चर्चा घडवून आणतात. अशाच एका द्विपक्षीय संवादासाठी सन २०११ मध्ये पाकिस्तानात गेलेल्या भारतीय प्रतिनिधीमंडळाचा मीही एक सदस्य होतो. तेव्हापासून हे ऋणानुबंध घनिष्ट होत गेले आहेत. त्यांच्याकडून येणारी शिष्टमंडळे व अनौपचारिक भेटींच्या रूपाने अधूनमधून ही आदान-प्रदान सुरु राहते. यंदा ‘पीआयएलडीएटी’चे एक शिष्टमंडळ आठवडाभराच्या भारत भेटीवर आले. त्यावेळी त्यांनी दिल्लीखेरीज चंदीगढ व जयपूरलाही भेट दिली. अशा भेटींच्या वेळी जी गोष्ट सर्वाधिक प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे मैत्रीची मनापासूनची आस आणि त्याहून विपरीत अशा वास्तवाविषयी विषण्णता. दोन्ही देश आणखी किती वर्षे ‘शत्रुत्व’ बाळगून राहणार, हा प्रश्न साहजिकच प्रत्येकाच्या तोंडी असतो.
यंदा दिल्लीत झालेल्या संवादात भारतीय बाजूचे आघाडीवीर होते सदैव आशावादी असणारे मणी शंकर अय्यर. ही संवाद प्रक्रिया विनाखंड सुरु राहायला हवी व त्यात खंड पडता कामा नये हे अय्यर यांचे मत आता सर्वांनीच मान्य केले आहे. पाकिस्तानच्या बाजूचे प्रमुख सूत्रधार होते माझे घनिष्ट मित्र जावेद जब्बार, ज्यांच्या अनेक हृद्य आठवणी मी मनात साठवून ठेवल्या आहेत.अशा प्रकारे सरकार वगळून लोकांच्या पातळीवर होणाऱ्या संवादास ‘ट्रॅक टू डिप्लोमसी’ असेही म्हटले जाते. नवनविन कल्पना घेऊन येणारे जावेदभाई यात माहीर आहेत. यंदा त्यांनी दोन्ही देशांमधील प्रसिद्धीमाध्यमांच्या सद्यस्थितीचे व त्याचा व्दिपक्षीय संबंधांवर कसा प्रभाव पडतो याचे चपखल विश्लेषण केले. यातूनच त्यांनी अशी कल्पना मांडली की, भारत व पाकिस्तानमधील माध्यमांनी दुबईत एक दक्षिण आशियाई टेलिव्हिजन चॅनेल भागिदारीत सुरु करावा. दोन्ही देशांमधील मान्यवरांना आपापली मते संतुलित व रास्तपणे मांडण्यासाठी अशा चॅनेलची खरोखरच गरज आहे व म्हणूनच जावेदभार्इंच्या या सूचनेशी मी पूर्णपणे सहमत आहे. निदान यामुळे एरवी भारत-पाकिस्तान संबंधीच्या चर्चेत नेहमी डोकावणारा शत्रुत्वाचा पैलू तरी नक्कीच दूर होईल.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
गेल्या दोन अधिवेशनात झाले तसे संसदेच्या सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज अजूनपर्यंत तरी पूर्णपणे ठप्प झालेले नाही. याचा अर्थ सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील वितुष्ट कमी झाले आहे, असा नाही. उलट दोन्ही पक्षांच्या परस्परांवरील हल्ल्यांची धार वाढली आहे. पण बेभरवशाच्या पावसाने श्री श्री रविशंकर यांच्या सांस्कृतिक महोत्सवात जसा व्यत्यय आणला तसेच आपल्या देशातील राजकीय वातावरणही अनिश्चित आहे. त्यामुळे अर्थ संकल्पीय अधिवेशन यापुढेही अनुकूल हवामानात सुरु राहील, अशी आशा करू या.
पाकिस्तानचे शिष्टमंडळ
नवी दिल्लीत झालेल्या या संवाद-चर्चेत भाग घेतलेल्या पाकिस्तानच्या शिष्टमंडळात पुढील मान्यवरांचा समावेश होता- सिनेट सदस्य ले. जनरल (निवृत्त) अब्दुल कय्यूम (पंजाब, पाकिस्तान मुस्लिम लीग, नवाझ) मिर हासिल खान बिझेन्जो (बलुचिस्तान, नॅशनल पार्टी), नौमन वझीर खट्टक (खैबर-पक्ख्तुनख्वा, पाकिस्तान हररिके इन्साफ), सौद माजीद (पंजाब, पीएमएल-एन), मुहम्मद अफजल खान, एमएनए (पंजाब, पीएमएल-एन), संसदीय सचिव वित्त मुनाझा हसन,एमएनए (पंजाब-पीटीआय), शहेरयार आफ्रिदी, एमएनए, कोहाट, केपी, पीटीआय. असद कैसर , एमपीए (केपी-पीटीआय),खैबर पुखतुन्व्खा प्रांतिय विधिमंडळाच्या सभापती मेहताब अकबर रश्दी, एमपीए (पाकिस्तान मुस्लिम लीग, फंक्शनल),मियाँ मेहमूद ऊर रशीद, एमपीए (पंजाब, पीटीआय), पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते, डॉ. नजमा अफजल खान, एमपीए (पंजाब, पीएमएल-एन), आरिफा नूर, निवासी संपादक, इस्लामाबाद, डॉन वृत्तपत्र, सिनेट सदस्य (निवृत्त) जावेद जबाबार, मादी संघीय माहिती मंत्री, सिनेटच्या पॉलिसी रीसर्च फोरमचे सदस्य, मुहम्मद अली नेकोकारा, माजी वरिष्ठ पोलीस अधीक्षक, पाकिस्तान पोलीस,, डॉ. मोहम्मद शोएब सुद्दल, माजी पोलीस महानिरीक्षक, सिंध-बलुचिस्तान, मुजीबूर रहमान शामी, एडिटर-इन-चीफ, डेली पाकिस्तान, अध्यक्ष, कौन्सिल आॅफ पाकिस्तान न्यूजपेपर एडिटर्स (सीपीएनई), सलीम शफी, टेलिव्हिजन अँकर व कॉलम्निस्ट, जिओ टीव्ही.सहभागी भारतीय सदस्य
मणि शंकर अय्यर, संसद सदस्य, पवन के. वर्मा, राज्यसभा सदस्य, जनता दल (यू) बिहार व विजय जवाहरलाल दर्डा, राज्यसभा सदस्य, दिल्ली विधानसभा सदस्य, आम आदमी पार्टी, मदन लाल, सौरभ भारद्वाज व सोमनाथ भारती, आशुतोष, प्रवक्ते, आम आदमी पार्टी, ए.एस. दुलाट, सदस्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ, ए.एस. पनीरसेल्वम, रीडर्स एडिटर, दि हिंदू, देवयानी श्रीवास्तव, सीनियर प्रोग्रॅम आॅफिस, कॉमनवेल्थ ह्युमन राईट्स इनिशिएटिव्ह, के. पी. नायर, वरिष्ठ पत्रकार व सल्लागार संपादक, दि टेलिग्राफ, डॉ. के. एस. सुब्रह्मणियन, माजी सनदी अधिकारी, डॉ. किरण बेदी, माजी आयपीएस अधिकारी, सिद्धार्थ भाटिया, संस्थापक संपादक, दि वायर, स्मिता गुप्ता, वरिष्ठ पत्रकार, दि हिंदू, सुनित टंडन, माजी संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशन, वंदना सेठ, रीसर्च स्कॉलर आणि वेद मारवा, माजी पोलीस आयुक्त, दिल्ली.